अक्षय आणि प्रतीक आता शेती करणार आहेत

अक्षय वाघ, नवी मुंबईतल्या कोपरखैराणेत डाबर कंपनीत सेल्सचं काम करतो. मुंबईत राहत असला तरी गावाची अन् शेतीची त्याला ओढ. त्याचं गाव बिबवी. सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातलं.
अक्षय लॉकडाऊनमध्ये गावी आला. आपल्या लहान जागेत पालक, मेथी, दोडका, दुधी, कारले,काकडी असा भाजीपाला घरच्यासाठी लावला. वर्षभर लागणारा भुईमुग, तांदूळ, बटाटा, मूग, उडीद ही कडधान्ये शेतात पेरली. दरवर्षी एकटीच शेती करणाऱ्या आजीला यंदा लावणी, कोळपणी, टोकणी, सरी पाडणे अशा कामात अक्षयचा चांगला हातभार लागला. शेतीच्या कामातून समाधान मिळत असल्याचं त्याला जाणवू लागलं. योग्य व्यवस्थापनातून खात्रीशीर उत्पादन मिळवता येतं. सध्या काम सांभाळून तो शेती करणार आहे . मात्र काही वर्षांनी अक्षय पूर्णवेळ शेती करणार आहे.
सातारा जिल्ह्यातल्याच पाटण तालुक्यातल्या जावधवाडी गावचा प्रतीक बोबडे. कामानिमित्त गेली तीन वर्ष मुंबईतल्या विक्रोळी उपनगरात रिक्षा चालवायचा. लहानणापासूनच प्रतीकला शेतीची आवड. पण शेतीतून पुरेसं उत्पन्न नाही म्हणून त्यानं शहराची वाट धरली. लॉकडाऊनमध्ये तो गावाला आला. गाव ओसाड पडू लागल्यानं कोणतीच पाळीव जनावरं उरली नव्हती. शेतीची सगळी कामे यंत्रानेच. लॉकडाऊनमध्ये प्रतीकनं बैलजोडी विकत घेतली. स्वतःच्या तसंच इतरांच्या शेतीतली नांगरणी, पेरणी, वखरणी अशी सगळी प्रतीकनं गावातील अजून एका तरुणाच्या सोबतीनं केली. त्यामुळे त्याची आर्थिक बाजू भक्कम झाली. पुन्हा शहरात न जाता पूर्ण वेळ शेती करण्याचा निर्णय प्रतीकनं घेतला आहे.
त्याचा आदर्श ठेवून गावातील इतर तरुणही शेतीकडे वळत आहेत.
कोरोना, लॉकडाऊन यामुळे शहरी मंडळी गावी जाऊ लागली. कोरोना संपण्याची चिन्हे दिसेनात. शहरात पुन्हा जाणं शक्य नाही म्हणून कमीत कमी पोटासाठी धान्य पिकवावं या हेतूनं काही मंडळी पुन्हा शेतीत लक्ष घालू लागली.
-संतोष बोबडे, जि.सातारा.
#नवीउमेद #सातारा #पाटण #जावळी #मुंबई #विक्रोळी #नवीमुंबई #कोपरखैरणे
Santosh Bobade