अखेर मी मुंबईची नोकरी सोडली

तुम्ही आई-बाबा होणार, म्हणजे तुमच्या समोर मोठं आव्हान आहे. अमूक-तमुक पुस्तक वाचा, मुलं कशी सांभाळायची, घडवायची?.. तयार मटेरियल वाचा आणि मुलांना त्या साच्यात ओतून घडवा… असे कितीतरी सल्ले आम्हाला गार्गी-गायत्रीच्या जन्मानंतर मिळाले. पालक होणं आव्हान वगैरे वाटलंच नाही. आव्हान संकटांचं असतं आणि गार्गी-गायत्री या चिमण्या तर आमचं काळीज आहेत. त्यांना घडविण्या सारखी दुसरी आनंददायी गोष्ट सध्यातरी असूच शकत नाही. खरं तर, गार्गी-गायत्रीच्या जन्मवेळेची परिस्थिती आमच्यासाठी आव्हानात्मक होती. गर्भात जुळं आहे, हे डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा आनंद, कुतूहल आणि चिंता असे भाव आमच्या चेहऱ्यावर उमटले होते. पत्नीला सक्तीची विश्रांती होती.
दिलेल्या वेळेआधी, सातव्या महिन्यातच (प्री-म्यॅच्युअर) दोघींचा जन्म झाला. वजन अनुक्रमे ९०० आणि १००० ग्रॅम! दोघींचीही जगण्याची शाश्वती शून्य! डॉक्टर म्हणाले, आम्ही प्रयत्न करतो, बाकी ईश्वराच्या हातात आहे. स्त्रियांमध्ये जबरदस्त ‘वील पॉवर’ असते, असं वाचलं होतं. स्वत:च मनाला बळं दिलं. आम्हाला पहिली मुलगीच हवी होती! निसर्गानं दोन मुली पदरात घातल्या होत्या. 

म्हटलं, “आता डॉक्टरांचे परिश्रम आणि चिमण्यांची इच्छाशक्तीच जिंकेल. त्यांना आमच्यापासून कोणीही हिरावू शकणार नाही!” काळजीचे ‘ते’ ७२ तास संपले आणि पुढच्या ४५ दिवसांत काचेच्या पेटीतल्या (इन्क्युबेटर) त्या दोघींसोबतचा आमचा प्रवास दवाखान्यातच सुरू झाला. गार्गी-गायत्री एक वर्षाच्या होण्याआधीच मला शासकीय सेवत, तर अर्चनाला शिक्षिकेची नोकरी लागली. त्यावेळी मुलींच्या भविष्याचा विचार करून आम्ही नोकरी स्वीकारलीही. पण मुलींच्या जडणघडणीचा आनंद हिरावून बसलो. आपण कायम घरात वडिलधाऱ्यांच्या हे करायचं नाही, ते करायचं नाही अशा कौटुंबिक दडपणात वावरलेलो. त्यामुळे हवा तसा विकास झाला नाही, याची खंत आजही वाटते. तशा नकारात्मक वातावरणात मुलींना घडवायचंच नाही, हा निश्चय आम्ही त्यांच्या जन्मवेळीच केलेला. पण या कल्पनेला आमच्या दोघांच्याही नोकरीने छेद दिला होता. मुलींचं खेळणं-बागडणंही बघता येत नाही, यासाठी दोघेही प्रचंड अस्वस्थ व्हायचो. मुलींच्या संगोपनासाठी वेळ देता यावा, त्यांच्यासोबत, त्यांच्या अवती-भवती राहता यावं यासाठी पत्नी किंवा मी, दोघांपैकी एकाने नोकरी सोडायचं ठरवलं. त्यावेळी मी मुंबईला माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘अधिपरिक्षक, पुस्तके व प्रकाशने’ या कार्यालयात होतो. अखेर मी मुंबईची नोकरी सोडली. पत्नी नोकरी करते आहे. आता घरी सर्वांसोबत राहून मी खाजगी व्यवसाय करतो. आमच्या मुली आमच्यासोबत आनंदाने वाढताहेत. आता त्यांच्याकडे पुरेसं लक्ष देता येतंय, याचा विशेष आनंद आहे. करिअर घडतंच; पण घडत्या वयात मुलांना आई-बाबांचीच अधिक गरज असते, हेच नोकरीनिमित्त गार्गी-गायत्रीचा सहवास तुटला, त्या काळात मनावर अधोरेखीत झालंय! पालकत्वाचा प्रवास मुलांसोबत त्यांच्या वयाचं होऊन केला, तर तो फार सोपा आहे, हे मला आणि पत्नी अर्चनाला आता-आता कळायला लागलं आहे.

– नितीन पखाले.