कोल्हापूर जिल्ह्यातील कोदेबुद्रूक, ता. गगनबावडा इथल्या अजित दळवी या 26 वर्षीय युवकाच्या सायकलस्वारीची ही गोष्ट. त्याचे आई-वडील शेतकरी. दोन बहिणी. आयटीआयमधून वेल्डरचं प्रशिक्षण घेऊन मुंबईत माझगाव डॉक सीक बिल्डर लि. कंपनीत त्याने नोकरीला सुरूवात केली.
कोरोनाची साथ सुरू झाली. आणि याकाळात अमूल्य योगदान देणार्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्यांप्रती सन्मान, सद्भावना व्यक्त करण्याकरिता अजितने सायकलद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा गाठण्याचा संकल्प केला.
प्रवास सुरू झाला तो मुंबईतून 19 सप्टेंबर रोजी. गांधी जयंतीदिनी तो नांदेडला पोचला. यावेळी त्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वागत करण्यात आले. शहीद जवानांनाही या मोहीमेद्वारे श्रध्दांजली वाहत असल्याचेही अजितने सांगितले.
अजित सांगतो, मी चार वर्षापासून सायकल चालवत आहे. सायकलिंगच्या आवड़ीमुळे सुरवातीला मुंबईत सायकलवरून फेररफटका मारत असे. नंतर के.एम.सुरेश यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यासोबत सायकलिंग करू लागलो. मुंबई ते कोल्हापूर असा साडेचारशे किलोमीटरचा पहिला सायकल प्रवास केला. त्यानंतर मुंबई – गणपतीपुळे – कोल्हापूर असा सुमारे साडेपाचशे किलोमीटरचा प्रवास केला. पुढच्या एक हजार 200 किलोमीटरच्या टप्प्यात मुंबई – पंढरपूर – तुळजापूर – अक्कलकोट – गाणगापूर – विजापूर (कर्नाटक) आणि कोल्हापूर असा प्रवास होता.”
दररोज तो 11 तास सायकलिंग करतो. तरीही शरीराला कोणताही त्रास झाला नाही. सायकलिंगमुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. चांगल्या आरोग्यासाठी युवकांनी सायकलिंग करावं, अस आवाहनही अजित दळवीने केलं आहे.
सध्याच्या मोहिमेसाठी महाराष्ट्रातील संपूर्ण 36 जिल्ह्याचा हा प्रवास सुरू आहे. यातला नांदेड हा 24 वा जिल्हा असल्याचं अजितने सांगितलं. मुंबईहून सुरू झालेला सायकलवरचा चार हजार किलोमीटरचा प्रवास सिंधुदूर्गला थांबणार आहे. साधारण 13 ऑक्टोबरपर्यंत प्रवास चालेल. प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर तेथे अधिकार्यांना भेटून तो पुढे निघतो. त्या-त्या जिल्ह्याच्या विश्रामगृहात मुक्काम करतो. यासाठी जळगावचे जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी मदत केली. वेळोवेळी त्यांच्याशी संपर्कात असतो, असंही अजितने सांगितलं.
– शरद काटकर, नांदेड