एप्रिल महिन्याचा सुमार. कोरोनाविषयीची प्रचंड भीती तेव्हा होती. त्यामुळेच गीताताईंना सर्वच टाळत होते. गीताताई बीड शहरात धुणीभांडी करणाऱ्या. त्यांची मुलगी मुंबईला परिचारिका. कोरोना रुग्णांवर उपचार ती उपचार करत होती. सात दिवसांच्या सुट्टीसाठी ती आली होती. लोकांमधल्या भीतीमुळे रोजच्या व्यवहारात अनेक अडचणी येत होत्या. लॉकडाऊनमुळे गीताताईंचं काम तर आधीच बंद झालं होतं. विनोदनं त्यांना सामान आणून देण्यापासून लागेल ती सर्व मदत दिली.
माळीवेस भागातल्या सीताबाई. घरकाम करणाऱ्या सीताबाईंचे पती आजारी असतात. त्यांच्या औषधालाही पैसे नव्हते. मंगळसूत्र गहाण टाकून आलेल्या पाच हजारात कसंबसं घर त्या चालवत होत्या. विनोदला हे समजलं. किराणा, औषधं या मदतीबरोबरच सीताबाईंचं गहाण मंगळसूत्र त्यांनी सोडवलं.
विनोद चव्हाण सामाजिक कार्यकर्ता. राहायला मित्रनगरमध्ये. कुटुंबाची शेती आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यानं हातावर पोट असलेल्या ६०० वंचित कुटुंबांना मोफत किराणा, भाजीपाला देऊन आधार दिला आहे. अनेक कोरोनाबाधितांच्या मदतीला तो धावून गेला आहे. रुग्णाला रूग्णालयात भरती करणं, त्याचे औषधोपचार, उपचारासाठी आवश्यक ती मदत मिळवून देणं, कुटूंबातील अन्य लोकांची कोविड चाचणी करून घेणं. रक्ताची गरज असलेल्यांसाठी रक्त मिळवून देणं, एखाद्या रुग्णाचा मृत्यू झालाच तर पुढची सगळी व्यवस्था करणं यासाठी त्याची धडपड सुरूचअसते. ऑगस्टमध्ये विनोदच्या आजोबांचा वृद्धापकाळानं मृत्यू झाला. त्यावेळी कोणाच्या तरी संपर्कातून आधी वडिलांना, मोठ्या भावाला आणि मग त्याला स्वतःला कोरोना झाला. उपचारानंतर तो बरा झाला. विनोदच्या सामाजिक कामामुळे त्यांना मदत मिळाली. त्याच्या कुटुंबाला काही अडचणींना सामोरं जावं लागलंही. पण त्याबाबत कुठलीही कटुता त्याने ठेवली नाही. त्याचं काम अव्याहत सुरू आहे
-दिनेश लिंबेकर ,बीड