अनंत अमुची ध्येयासक्ती …

 

श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय,
कळसूबाई माता की जय,
हर हर महादेव
या घोषणांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला कळसूबाई दणाणून गेली होती. कळसूबाईसाठी या घोषणा नव्या नसल्या तरी आज खास होत्या. कारण या घोषणा देणाऱ्यांमध्ये लता पांचाळ आणि अनेक अपंग साथीदार होते.
लता जन्मतःच अंध आहे. परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यातल्या देऊळगाव दुधाटे गावचे उद्धवराव आणि अरुणाबाई यांची मुलगी. उद्धवरावांचा सुतारकीचा व्यवसाय. आई गृहिणी. लताला दोन विवाहित बहिणी आणि एक भाऊ. सर्वात धाकटी लता कुटुंबियांची लाडकी.


महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि चढाईला अतिशय कठीण असं, तब्बल 5 हजार 400 मीटर उंचीचं कळसूबाई शिखर तिनं सर केलं.
शिवार्जुन प्रतिष्ठान दरवर्षी अपंग युवक-युवतींसाठी कळसूबाई शिखरचढाईची मोहीम आखतं. यावर्षी 20 जिल्ह्यातील 70 अपंग युवांना 30 डिसेंबरच्या मध्यरात्री सह्याद्री पायथ्याशी असलेल्या जाहिंगीरदारवाडी गावात एकत्र जमले. यात लताही तिच्या मैत्रिणींसोबत होती.


दुसर्‍या दिवशी सकाळी मोहीम सुरू झाली. एकमेकांना आधार देत सगळे एकमेकांचे मनोबल वाढवत होते. कळसूबाई शिखर सर करताना शेवटी येणार्‍या चार लोखंडी शिड्या लतानं मोठ्या जिद्दीनं पार केल्या आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला तिने हे शिखर सर केलं. शिखराचा माथा गाठल्यावर सर्वांनी कडाक्याच्या थंडीत तंबूमध्ये मुक्काम केला. नववर्षाच्या पहाटे सह्याद्री पर्वताच्या माथ्यावर असलेल्या कळसूबाई मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं. उगवत्या सूर्याला नमस्कार करून सकाळी 10 वाजता परतीची वाट धरली. खाली उतरताना काळजीपूर्वक पावलं टाकावी लागत होती. संपूर्ण वाट निसरडी होती, असं लतानं सांगितलं.
मामा प्रभाकर यांच्या आग्रहामुळे लताला नांदेड इथल्या श्री गुरु गोविंदसिंग माध्यमिक अंध विद्यालयात पहिली ते आठवीपर्यंत दिव्यांगासाठीचं विशेष शिक्षण घेता आलं. त्यानंतर तिने बारावीपर्यंतचे शिक्षण नांदेडलाच पूर्ण केलं. पुण्यातल्या एस.पी.कॉलेजमधून बी.ए. आणि सध्या ती पुण्यातल्या आकुर्डी इथल्या रामकृष्ण मोरे महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयात एम.ए.करत आहे. विशेष म्हणजे ती एकटीनेच प्रवास करते. परभणी ते पुणे हा प्रवास तर नेहमीचाच पण एकदा ती डेहरादूनच्या केंद्रीय अंध विद्यालयात प्रशिक्षणासाठी गेली ती देखील एकटीनंच प्रवास करत. दोन-तीन वर्षांपूर्वी पुण्यात मैंत्रिणींकडून ट्रेकींगबद्दल ऐकल्यानं तिची उत्सुकता वाढली. इतर मुली करू शकतात; मग आपण का करु शकत नाही? या जिद्दीने तिने दोन वर्षांपूर्वी प्रतापगड सर केला. अत्यंत आव्हानात्मक कळसूबाई शिखर चढण्यापूर्वी अनेक दिवस सराव करावा लागतो. 5 ते 6 तासांच्या मोहिमेत लताने कळसूबाई शिखर सर करण्याबरोबरच परतीचा प्रवास पूर्ण करत आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा परिचय करून दिला आहे.

-बाळासाहेब काळे, ता. पूर्णा , जि. परभणी

Leave a Reply