अनवाणी पावलांना मिळाली सावली; पॉकेटमनीतून वाटल्या ५०० चप्पल

सोलापूर शहर कडक उन्हाळ्यासाठी प्रसिद्ध. शक्य असणारे लोक डोक्यावर छत्री आणि पायात चांगल्या चपलांचा वापर करून उन्हापासून आपलं संरक्षण करतात. अर्थात हे सगळ्यांनाच शक्य नसतं. जिथं दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते तिथं लोक चप्पल कुठून घेणार? अशा गरीब लोकांच्या सहवेदना सोलापुरातील काही तरूणांनी जाणल्या. कोमल मोरे, आर्या इंगळे, मंगेश सोनकांबळे, अंकित जेऊरे, ओंकार खासनीस, सारंग कुलकर्णी, ज्योत्स्ना सगर, अदिल जमादार, कस्तुरी महाजन, रितू माळगे, लावण्या मिठ्ठा, विराज गवळी, श्रीनिधी भोसले, मयूर बनसोडे, आकाश भूमकर, अजय मध्दली, जुबेर शाब्दी, रोहित उबाळे, उदयन गायकवाड, भैरवी काळे, ऋतिका पवार हीच ती मुलं. स्वराज या सामाजिक संस्थेसाठी काम करणारा हा तरूण-तरूणींचा गट. सगळेच महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी. आपल्या पॉकेटमनीमधून ते विविध उपक्रम राबवतात. एप्रिल महिन्यात त्यांनी गरीब लोकांना चपलांचे जोड देण्यासाठी ‘फूटवेअर डोनेशन’ ही मोहीम सोलापुरात राबवली होती. खर्च अर्थातच पॉकेटमनीतून. सोबतच सोशल मिडीयातून ‘फुटवेअर डोनेट’ करण्यासाठी दात्यांना आवाहन केलं होतं. संस्थेच्या आवाहनाला लोकांचा उत्तम प्रतिसादही मिळाला.


सोलापूर शहरातील रेल्वे स्थानक परिसर, एसटी स्टॅण्ड, मंदिरे, भाजी मंडई, बाळे आणि बाळीवेस या परिसरात अनवाणी फिरणारे गरीब, निराधार, मनोरुग्ण आणि भिक्षेकर्‍यांना चप्पल वाटप करण्यात आलं. युवकांनी दिलेल्या या चपला लोक आनंदाने स्वीकारत होते. अन्नाच्या शोधात भटकंती करत अनवाणी फिरल्याने उन्हाच्या चटक्यांनी अनेकांच्या पायाला फोड आले होते. त्यामुळे पायात घालण्यासाठी चप्पल मिळाली म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. जवळपास ५०० हून अधिक लोकांना चपलांचे वाटप करण्यात आले. सलग चार दिवस सोलापूर शहरात कडक उन्हात फिरून युवकांनी गरजूंपर्यंत चप्पल पोहोचवली. सर्वच वयोगटातील लोकांना चपला देण्यात आल्या. स्वराज संस्थेच्या अध्यक्ष स्वराली भोसले म्हणाल्या, “सोलापूर शहरातील गरीब लोकांना नेमकी कशाची गरज आहे याचा आम्ही शोध घेत होतो. हिवाळ्यात त्यांना स्वेटर दिले. सध्या उन्हापासून संरक्षण होण्यासाठी चपलांची गरज होती, म्हणून आम्ही त्यांना आमच्या पॉकेटमनीतून आणि काही दानशूरांच्या मदतीतून चपला दिल्या. चप्पल मिळाल्यानंतर गरिबांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून आम्हाला आनंद झाला. या उपक्रमामुळे अनेकांच्या पावलांना सावलीचा आधार मिळाला आहे.”

– अमोल सीताफळे, सोलापूर

Leave a Reply