अनु आजीच्या गोष्टी

मी आणि माझ्या दोन लेकींकडे मिळून भरपूर पुस्तकं आहेत. तीन नातवंडांमुळे बालसाहित्याचा मुबलक साठा आणि तोही मुलांना सहज हाताला लागेल अशा ठिकाणी ठेवलेला. मुलं केव्हाही हक्काने कोणतंही पुस्तक घेऊन जवळ येतात आणि “आजी, हे वाचून दाखव ना.” असा हट्ट करतात. आजी नेहमीच हक्काची असते, कधी नाही म्हणत नाही, हेही त्यांना पक्कं ठाऊक असतं. मग काय! न कंटाळता मी गोष्टी आणि कविता वाचते आणि न कंटाळता तेही ऐकतात. वाचलेल्या गोष्टी पुन्हापुन्हा वाचल्या जातात. एखादी गोष्ट मुलांना खूप आवडते, मग त्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद हवा असतो. कधी कधी मी गोष्ट वाचायला लागले की ते दोघे एखाद्या खेळण्याशी खेळत बसतात. ते गोष्ट ऐकत नसतात, असं नाही. खरंतर गोष्ट ऐकताना त्यांची तंद्री लागलेली असते. हातातलं खेळणं हे नाममात्र असतं.
अरेच्चा! हे सगळं वर्णन झालं ते लॉकडाऊन सुरु व्हायच्या आधीचं. दोघं नातू जवळच राहणारे, शाळा सुटली की काहीवेळ येणारे. नात दुसऱ्या शहरातून कधी कधी भेटीसाठी येणारी. लॉकडाऊन सुरू झाला आणि आम्ही सगळे आपापल्या घरी अडकलो. भेटीगाठी, येणंजाणं बंद झालं. नातवंडं अचानक येईनाशी झाली. सुरवातीचे दोन-चार दिवस

बरे गेले, पण गोष्ट वाचन बंद पड.

मग मी एक नामी उपाय शोधून काढला. गोष्ट मोबाईलवर रेकॉर्ड करुन मुलींना व्हाट्सअपवर पाठवली. त्यासाठी पहिलं पुस्तक घेतलं जी. ए. कुलकर्णी यांचं “बखर बिम्मची”. नातवंडांना अशाप्रकारे आजीच्या तोंडून गोष्ट ऐकायला खूप आवडली. माझ्या लेकीने, वृषालीने कुटुंबातल्या, मित्र परिवारातल्या काहींना गोष्ट पाठवली. सगळ्यांनाच गोष्ट आणि अशा प्रकारे रेकॉर्ड करून पाठ्वण्याची कल्पना आवडली.
मग काय! आधीच उत्साही असलेली माझी लेक मला म्हणाली, “आपण एक गोष्टींचा ग्रुपच बनवुयात का?” आणि यातून ३ एप्रिल २०२० रोजी सुरु झाला आमचा “अनु आजी, वाचतेय गोष्टी” हा “मराठी बालकथा वाचन” करण्यासाठी असलेला व्हाट्सअप गट. पहिल्याच दिवशी गट पूर्ण भरला. जवळ जवळ २५०+ सदस्य या गटाला मिळाले. लहान मुलं घरात असणारे आमचे कुटुंबीय, मित्र परिवार, मुलांच्या शाळेतील विविध पालक, ओळखीचे इतर असे सदस्य गटावर गोष्टी ऐकायला जमले.


गोष्टी वाचण्याचा केवळ एकच हेतू होता, तो म्हणजे लॉकडाऊनमुळे घरात असलेल्या बालमित्रांचे रंजन. सुरुवात आमच्या खूप आवडत्या गोष्टी वाचून केली. गोष्टी निवडताना मुलांच्या भावविश्वातल्या गोष्टी आम्ही फार चोखंदळपणे निवडल्या. निसर्गाशी, झाडा-फुलांशी, पशु-पक्ष्यांशी, एकमेकांशी नातं सांगणाऱ्या गोष्टी सांगितल्या. थेट उपदेश करणाऱ्या किंवा हिंसा असणाऱ्या गोष्टी टाळल्या (त्यामुळे मग पंचतंत्र, हितोपदेश वगैरे गोष्टी घेतल्या नाहीत.) अशा गोष्टी निवडल्या ज्यात मुलांना हे करा किंवा ते करू नका असं सांगितलेलं नाही, पण तरीही गोष्ट ऐकल्यावर मुलांपर्यंत अपरोक्षपणे एखादा, त्यांच्या वयाला साजेसा संदेश पोहोचेल.
माधुरी पुरंदरे व अनिल अवचट यांच्या गोष्टींत रमलेली मुलं मंजुषा आमडेकर यांच्या सगळ्यांना मदत करणाऱ्या डिटेक्टिव्ह शेंडीवर तर एकदम खूष झाली. यासोबतच ज्योत्स्ना प्रकाशन व मेहता पब्लिकेशनच्या पुस्तकांचे वाचन केले. प्रथम बुक्स यांनी उपलब्ध करून दिलेल्या स्टोरीव्हीव्हर (Storyweaver.org.in) या खजिन्यातूनही भरपूर गोष्टी वाचल्या. कधी मुलांच्या परिसरात घडणाऱ्या तर कधी त्यांच्या नेहमीच्या परिघाबाहेर घडणाऱ्या या गोष्टी त्यांना खूप आवडल्याची पावतीही वेळोवेळी मिळाली. मराठीतील कथाकारांसोबत इतर भाषांतील मराठीत अनुवादित झालेल्या दर्जेदार लेखनाचेही वाचन केले. त्यात अनंत भावेंनी मराठीत आणलेली रोआल्ड डहलची गोष्ट, प्रसिद्ध जपानी गोष्ट तोत्तोचान, इंग्रजीतून मराठीत आलेल्या फ्रँकलिन कासवाच्या गोष्टी यासुद्धा मुलांना भावल्या.
कधीकधी गोष्ट सापडली नाही की माझ्यात आणि वृषालीमध्ये चर्चा व्हायची. तिचा दहा वर्षाचा मुलगा अंजोर बऱ्याचदा गोष्टीही सुचवायचा. एकदा तो म्हणाला, “मी गोष्ट देऊ का?” मग त्याने दोन इंग्रजी गोष्टीचं सुंदर मराठीत भाषांतर करून दिलं, तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला.
मुलांकडून येणाऱ्या फर्माइशीत भुतं, पऱ्या यांचा उल्लेख होताच. भूताची एक झकास गोष्ट मी वाचलीसुद्धा! पण परीची हवी तशी गोष्ट खूप शोधूनही मला काही सापडली नाही. शेवटी विचार करता करता माझ्या डोक्यात एक गोष्टीची कल्पना तयार झाली आणि गंमत म्हणजे एका बैठकीत ती लिहूनही झाली (साविला भेटली परी). मुलांना ही गोष्ट आवडलीच आणि मलाही शोध लागला की मी लहान मुलांसाठी त्यांना आवडेल असं काहीतरी लिहू शकते.
हळूहळू गट सदस्यांचे अभिप्राय येऊ लागले आणि त्यांनी आमचा उत्साह वाढू लागला. त्याचबरोबर या उपक्रमाचे बरेच नकळत होणारे फायदे लक्षात आले.
“जी. ए. कुलकर्णींच्या गोष्टींचं ‘एक्सपोजर’ आम्ही कदाचित दिलं नसतं, पण या गटामुळे ते मिळालं आणि पाच वर्षाच्या ओमला त्या आवडल्याही.” असा निर्वाळा ओमच्या आईने दिला. हा अभिप्राय वाचून फार आनंद झाला. आपण योग्य मार्गावर आहोत अशी खात्री पटली. जीएंची भाषा जुन्या वळणाची होती. मुलांना कळेल की नाही हा प्रश्न आम्हालाही पडला होताच. पण हेतू हाच होता की एखादा शब्द मुलांना कळला नाही तर तो त्यांनी घरातल्या मंडळींना विचारावा, त्यांनीही मुलांचं समाधान करावं. जुन्या इंग्रजी शेक्सपियरीन भाषेचं जसं एक सौंदर्य आहे तसंच आपल्या जुन्या मराठीचं आहे हीच भावना होती. बघता बघता बिम्म सगळ्या लहान मुलांचा लाडका झाला. साडे तीन वर्षाची मनवा घरच्यांना “हाडं सैल करून ठेवीन” अशी बिम्मच्या आईची गोड धमकीही द्यायला लागली. परीची गोष्ट ऐकून माझ्या मुलाने “तळहात’ या शब्दाचा अर्थ विचारला, असं पारूलने कळवलं. तर मला कधी कधी शब्द समजत नाहीत ते आई बाबा समजावून सांगतात, त्यामुळे मला खूप नवीन शब्द समजले, असं दुबईहून सात वर्षाच्या अर्चितने सांगितलं. अमेरिकेत राहणाऱ्या अन्वय आणि केयाच्या आईकडून समजलं की व्हिजुअलशिवाय गोष्ट ऐकण्याची ही मुलांची पहिलीच वेळ होती. आणि मुलांनी हा अनुभव फार मजेत घेतला.
गोष्ट गट हेतुपुरस्सर ऑडिओ ठेवला होता. “जंगल” असं म्हटल्यावर व्हिडिओमध्ये जंगल दिसतं. पण ऑडिओमध्ये मुलांना जंगल काय असेल, कसं असेल याची आपापली कल्पना करावी लागते. हेच आम्हाला हवं होतं आणि ते काही अंशी साध्य झालं. आमच्या मुलाची ऐकण्याची क्षमता (listening skills) वाढली आहे, असं बऱ्याच पालकांनी सांगितलं.
यशला यशची गोष्ट नामसाधर्म्यामुळे खूप आवडली, स्वतःचीच गोष्ट वाटली हेही नमूद करावेसे वाटते. मुलं स्वतःला गोष्टींशी कशी जोडून घेतात याचं हे बोलकं उदाहरण वाटलं. कधी कधी गोष्टीचा विषय किंवा स्वरूपानुसार मुलं स्वतःहून काही गंमती करायची. बऱ्याच मुलांनी त्या गोष्टीच्या विषयावर चित्रं काढली. त्यांना गोष्टीतील पात्रं कशी दिसली ती त्यांनी कागदावर उतरवली किंवा हस्तकलेतून काही बनवले.
सृजन, शर्व, आरोही, देवयानी, आत्रेय, समीर, अर्णव, राही, धवल, यश, मेघज, सार्थक, ब्रह्मास्मि, अन्वी, रुचिर, पूर्व हे दोस्त आणि मृण्मयी-शिवेंद्र व दुर्गा-वैष्णवी ही भावंडं यांनी त्यांच्या चित्र व हस्तकला कृतींचे फोटो पाठवून आमच्या गटावर एक छानसं प्रदर्शनच भरवले.
शाम्भवीने फ्रॅन्कलीन कासवावर एक गोष्ट लिहली, त्यावर चित्रे काढली, गोष्ट स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केली, आणि चक्क त्याचा एक व्हिडिओ बनवून पाठवला. एका गोष्टीत वेगवेगळी कोडी होती. ती ऐकून अन्वीने अजून वेगवेगळी मजेशीर कोडी तयार केली. मृण्मयी-शिवेंद्र ही भावंडं ऐकलेल्या गोष्टीचं नाट्य रूपांतर करून घरच्यांची करमणूक करू लागली.
या गोष्ट गटामुळे मुलं घरात रमली. स्क्रीन टाईमपेक्षा त्यांचा “ऐकण्याचा” वेळ वाढला. गोष्ट दहा पंधरा मिनिटाची असली तरी त्यानंतर एक ते दोन तास तरी मुलं त्याविषयी गप्पा मारण्यात, किंवा त्याप्रमाणे कृती करण्यात रमून जायची. हा एक मोठाच फायदा झाला.
लहानग्या दोस्तांविषयी लिहताना मला मोठ्या मंडळींबाबतही काही मुद्दे सांगायलाच हवे. माझ्या धाकट्या मुलीचा डोंबिवलीचा मित्र अक्षय (वय वर्ष ३५) रोज गोष्टी ऐकत होता. का माहितीये? त्याच्या पाच महिन्याच्या बाळासाठी तो आत्तापासून तयारी करतोय. माझे शाळेतील व महाविद्यालयातील मित्र मैत्रिणी, आणि मी ज्या बँकेत काम करायचे तेथील मैत्रिणी हे सर्व आता आजी आजोबा भूमिकेत आहेत. पण तेही लहान मूल होऊन गोष्टी ऐकायचे.
स्वान्तसुखाय सुरू केलेल्या उपक्रमाने एक फार सुंदर वळण घेतलं आणि विविध ठिकाणी राहणारे छोटे मित्र मैत्रिणी मला मिळाले. घरच्या घरी केलेले रेकॉर्डिंग असल्याने कधी कधी गोष्टीत कबुतरांची फडफड, कोकिळेची शीळ, कुत्र्याचे भुंकणे, पंख्याची घरघर याचे आवाज यायचेही. पण ते या बाल दोस्तांनी गोड मानून घेतले.
हा उपक्रम मी दोन महिने सुरू ठेवला (६५+ गोष्टी या काळात वाचल्या.) आणि ३ जून रोजी अल्पविराम घेतला आहे. या काळात मिळालेल्या अनुभवाने मनाची उभारी वाढली आहे. माझ्या बालदोस्तांनी गोष्टींचा खजिना लुटत राहावं आणि त्यात हरवून जावं, हीच सदिच्छा!
अनुराधा गटणे यांचे संपर्क क्र. – 9552009800
– अनुराधा गटणे

Leave a Reply