अनेकांना केलं आत्महत्येपासून परावृत्त: ‘शिवार संसद’कडून शेतकऱ्यांना मिळतंय जगण्याचं बळ

 

 

शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या कित्येक वर्ष आपण पेपरमध्ये वाचतो आहोत. मात्र, या आत्महत्या थांबायला हव्यात हे एका तरूणानं मनावर घेतलं आणि ‘शिवार संसद’ या नावाचं समविचारी तरुणांचं व्यासपीठ उभारलं. त्याचीच ही गोष्ट.
विनायक हेगाणा हे त्याचं नाव. मूळचा कोल्हापूरचा. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात स्थायिक. बीएसस्सी अॅग्रीकल्चरचं शिक्षण घेतलेल्या विनायकला नोकरी-व्यवसायाऐवजी शेतकऱ्यांसाठी काहीतरी काम करावं असं वाटायचं. तो महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना, शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही मोठी समस्या बनली होती. महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांचं जीवनमान उंचवावं, त्यांच्या कुटुंबाला सन्मानाची वागणूक मिळावी, मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, हे त्याच्या मनाने घेतलं. तसंच, आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करायचा चंगच त्याने बांधला. त्यासाठी आपलं गाव सोडून तो उस्मानाबाद जिल्ह्यात स्थायिक झाला.

महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या का करतो, या प्रश्नांची उकल करण्यासाठी विनायक महाराष्ट्रभर फिरला. त्यानं शेतकऱ्यांशी बोलायला सुरूवात केली. त्यांच्या समस्या जाणून घेऊ लागला. यातून त्याने काही निरीक्षणं नोंदवली. शेतीला पाणी नाही, पिकाला हमीभाव नाही हेच या आत्महत्यांचं कारण. त्याचं काम बघून हळूहळू असे समविचारी तरुण-तरुणी सहभागी झाले. यातूनच ‘शिवार संसद’ची सुरूवात झाली.

‘शिवार संसद’शी आज महाराष्ट्रातले तीन हजारहून अधिक तरुण-तरुणी जोडले गेले आहेत. हे सगळे तरुण शेतकरी कुटुंबातील आहेत. ग्रामीण जीवन जवळून अनुभवलेले. उस्मानाबाद, लातूर, सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी विनायक आणि त्याचे सर्व सहकारी शेता-शिवारात जाऊन लघुपट, गोष्टी हे दाखवत, चर्चा करत शेतकर्‍यांचं प्रबोधन करतात. गप्पा-गोष्टीतून त्यांचं मनोबल वाढवायचा प्रयत्न करतात. गरजेनुसार आर्थिक मदतही करतात. मुलांना दत्तक घेऊन शिक्षणाला हातभार लावतात.

‘शिवार संसद’ने शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन सेवाही सुरू केली आहे. जूनपासून आजवर 2,277 शेतकऱ्यांचं त्यांनी फोनद्वारे समुपदेशन केलं आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून त्यावर तोडगा काढला जातो. यासाठी जिल्हा प्रशासन, सामाजिक संस्था, वैयक्तिक पातळीवर मदत केली जाते. शेतीविषयक, सामाजिक, शासकीय, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, घरगुती, मुलां-मुलीी लग्नं, व्यसनाधीनता, नोकरी, जोडधंदे अशा समस्या सोडवण्यासाठी समन्वयातून सल्ला आणि मार्गदर्शनाचं काम ‘शिवार संसद’ हेल्पलाइन करते आहे. हे काम किती महत्वाचं आहे, ते वेगळं सांगायलाच नको.

– अमोल वाघमारे, सोलापूर

Leave a Reply