लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या चिलवंतवाडीचा इंद्रजित येणगे. गरीब,शेतमजूर कुटुंबातला. इंद्रजित जन्मतःच कमरेपासून दोन्ही पायांनी विकलांग. त्याच्या अपंगत्वामुळे कुटुंबालाही वैफल्य आलेलं. न्यूनगंडामुळे एकटा राहणारा, चिडचिडा इंद्रजित गेल्या १० वर्षात पूर्णपणे बदलला. याचं श्रेय उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यातल्या सास्तूर इथल्या निवासी दिव्यांग शाळेला. आजीनं इंद्रजितला या शाळेत घातलं आणि इंद्रजित बदलू लागला. आपल्यासारखीच धडपडणारी मुलं, मुलांसाठी जीव तोडून काम करणारे शिक्षक
आणि आत्मविश्वास, उमेद देणारे मुख्याध्यापक नादरगे सर. ध्येय निश्चित झालं. इंद्रजितला यंदा १० वीला ९३.६०% मिळाले आहेत. त्याच्याप्रमाणेच शाळेतल्या सोनालीला ९२.८०, दीपाला ९२. २० % आणि आणखी तिघांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. शाळेचा निकाल गेल्या ८ वर्षांप्रमाणेच यंदाही १००%.
अनेकांना अवघड वाटणाऱ्या गणित विषयात दीपा घोसले हिनं १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. तीही निलंगा तालुक्यातल्याच नेलवाडची. दीपासह ४ भावंडांपैकी तिघे अपंग. वडील व्यसनाधीन. आई मोलमजुरी करणारी. दीपा आणि तिची भावंड सास्तूरच्या शाळेत आली. दीपा, अतिशय गुणी, हस्ताक्षर तर अगदी मोत्यासारखं. चित्रकारीही अभिजात. अभ्यासातही खूप चुणचुणीत. तिने जिद्दीने प्रचंड अभ्यास केला. शिक्षकांनीही आवश्यक ते मार्गदर्शन केले. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीच्या परीक्षेत तिनं यंदा घवघवीत यश मिळवलं.
सोनाली शेखर बेळे जन्मतःच कमरेपासून खालील भागात अपंग. परिस्थिती हलाखीची. आईवडील दोघेही मोलमजुरीसाठी गुजरातमधल्या नवसारी इथं. सोनाली सुट्टीत आजीकडे राहते. गेली १० वर्ष प्रत्येक सुट्टीत शाळाच तिला आजीकडे सोडते आणि परत आणते. आईवडील वर्षातून एकदा कधीतरी भेटतात. कोविडची संपूर्ण दोन वर्ष ती शाळेतच होती. नेहमी आनंदी,हसतमुख सोनालीनं १० वीला तर भरपूर मेहनत घेतली.
”आमच्या मुलांनी कठोर परिश्रम घेतले.”मुख्याध्यापक बालाजी नादरगे सांगत होते. १९९५ मध्ये सुरु झालेल्या या निवासी शाळेचे नादरगे सरच सुरुवातीपासून मुख्याध्यापक राहिले आहेत. ” गेली दोन वर्ष आमच्यासाठीही आव्हानांची होती. पण आमच्या शिक्षकांनी प्रत्येक वेळी तोडगा काढला. जिथे काहीच सुविधा नव्हती तिथे शिक्षकांनी घरी जाऊन मुलांना मार्गदर्शन केलं. ऑनलाइनच्या माध्यमातून शिकवलेलं अनेकदा मुलांना कळायचंच नाही, अशा वेळी शिक्षकांनी प्रसंगी मुलांना आपल्या घरी ठेवून अभ्यास करून घेतला. प्रत्येक घटकांवर वेळोवेळी परीक्षा घेऊन शिक्षकांनी मार्गदर्शन करून अंतिम परीक्षेची नियोजनबद्ध तयारी करून घेतली. पालकांची चांगली साथ लाभली.”
भविष्यात इंद्रजितला कॉम्प्युटर इंजिनिअर, सोनालीला जिल्हाधिकारी, तर दीपाला अस्थिरोग तज्ज्ञ व्हायचं आहे. इंद्रजित, सोनाली,दीपा, शाळेतली सर्व मुलं आणि शाळेला नवी उमेदकडून शुभेच्छा !
-गिरीश भगत