असा गावकारभारी लाभला तर युवावर्ग शहराकडे धाव घेणार नाही

 

कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी अनेक ठिकाणी गावबंदी झाली. चांपा गाव मात्र याला अपवाद ठरलं.
नागपूर जिल्हयातील उमरेड तालुक्यातलं हे गाव. मुख्य रस्त्यावर. गावात येण्यासाठी बरेच मार्ग आहेत. त्यामुळे गावबंदी करणं अशक्य होतं. एक दोन रस्ते वगळता सगळेच रस्ते खुले होते. तरीही गावात कोरोनाचा शिरकाव झाला नाही. हे शक्य झालं, ते युवा सरपंच आतिष पवार यांच्या कुशल आणि नियोजनबद्ध कार्यशैलीमुळेच.
पवार एमए, बीएड आहेत. गावकऱ्यांचा विश्वास त्यांनी संपादन केला आहे. विकासकार्याचा सपाटा लावत 16 महिन्यात त्यांनी गावाचा कायापालट केला.


सोळाशे लोकवस्तीचं हे गाव. आतिष पवार यांनी गावात बॅनर लावून सभा घेऊन कोरोनाविषयी जनजागृती केली. गावात शेतकरीवर्ग तसा मोजकाच. इथे व्यावसायिक, ट्रकचालक, कंपनी कामगार आणि मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात. सरपंच पवार यानी लॉकडाऊनच्या काळात त्यांची उपासमार होऊ दिली नाही. काही संस्था आणि सदस्यांना हाताशी धरून गावोगावी ,घरोघरी जाऊन रेशनधान्य वाटप केलं. गावक-यांची रेशनकार्डची कामं करून दिली.
गावात कोणाला काय हवे – नको बघण्यासाठी, तक्रारनिवारणासाठी व्हॉट्सअँप ग्रुप बनवला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.


या काळात सरपंच आतिष यांनी खरिप हंगाम गावसभेचं आयोजन करून शेतकर्यांना मार्गदर्शन केलं. २३८ रूपये रोजीप्रमाणे अत्यंत गरजू अशा ५४ कुटुंबांना मनरेगामार्फत रोजगार उपलब्ध करून दिला. महिला प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. महिलांनी मास्क शिवून गावात मोफत वाटले. सँनीटायझर वाटले. सँनीटायझरची टाकीसुद्धा बसवली. आशा वर्करकडून सर्वे करून गरजूंना मदत पुरवली. आरोग्यकेंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर मिळवून दिला.

आजही गावात नित्यनियमाने जंतूनाशक फवारणी होते. या काळात गावात नियमांचं पालन करून पाच लग्नंसुद्धा झाली. बाहेरून आलेल्यांना त्यांच्या घरीच आशा वर्करच्या देखरेखीत क्वारंटाईन ठेवलं.
या काळातही सरपंचांनी गावातील विकासकामात अडथळा येऊ दिला नाही. प्लास्टीकबंदीवर भर देत ३५४ किलो प्लास्टीक जमा केलं. महिलांसाठी सॅनिटरी पॅड डिस्ट्रॉय मशीन आणली. बोअरवेल खोदली आणि पाईपलाईन टाकून पाणीसमस्या सोडवली. तसंच नवीन ट्रान्सफॉर्मर बसवले. आता स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करण्यासाठी गावात वाचनालयसुद्धा सुरू होत आहे. पक्ष्यांच्या दाणापाण्याची विशेष काळजी घेत घरटी बांधली.
चांपा ग्रामपंचायतीचं स्वत:चं मिशन स्मार्ट विलेज नावाचे फेसबुक पेज सुरू आहे. लायन्स क्लब ऑफ नागपूरने गावाला नुकतंच दत्तक घेतलं आहे.
या गावात शाळा, कॉलेज, रुग्णालय, कृषीकेंद्र, वनविभाग, होलसेल मार्केट अशा ब-याच सुविधा आहेत. गावाला दोन पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत.
असा गावकारभारी प्रत्येक गावाला लाभला तर युवा वर्ग शहराकडे धाव घेणार नाही हे नक्की..!!

।। सरपंचांचं गाव।।
गाव – चांपा, ता – उमरेड, जि – नागपूर
सरपंच – आतिष पवार

-नीता सोनवणे, नागपूर

Leave a Reply