आईचा वसा जपण्यासाठी कावळे मामा बनले स्वच्छतादूत

परभणीतील कमळाजी किशनराव कावळे उर्फ कावळे मामा. वय 60 वर्ष. शहरातील खानापूर फाटा भागातील अंबाभवानी नगरात राहणारे कावळे मामा कटलरी वस्तूंचा हातगाडा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांची आई साळूबाई लोकांच्या घरी सकाळ-संध्याकाळ भांडी घासून कुटुंब चालवायची तर वडील किशनराव रोजमजुरी करत असत. उरलेल्या वेळात आई परिसरात रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी साफसफाई करायची. या बदल्यात ती कुणाकडूनही पैसे घेत नसे. 6 एप्रिल 1996 रोजी आईचं निधन झाल्यानंतर तिचं स्वच्छतेचं हे काम आपण पुढे सुरूच ठेवायचे हा संकल्प केला, असं कावळे मामा यांनी सांगितलं. त्यानुसार ते कटलरीचा गाडा सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 या वेळात चालवतात. त्यातून दररोज 200 ते 300 रूपये मिळतात. उरलेल्या वेळात ते अगदी निःस्वार्थपणे स्वच्छतेच्या माध्यमातून जनसेवा करत फिरत असतात. विशेष म्हणजे कुणी पैसे देऊ केले तरी घेत नाहीत, एवढेच नव्हे तर कुणाकडून ते चहादेखील पित नाहीत. कावळे मामांना एक मुलगा व एक विवाहित मुलगी आहे.

परभणीतील नूतन विद्या मंदीर शाळेत मामांचे शिक्षण इयत्‍ता आठवीपर्यंत झाले आहे. पुढे शिकायची इच्छा असूनही गरिबीमुळे ते शक्य झालं नाही. त्यांचं स्वच्छतेचं काम पाहून कुणीतरी त्यांना डे्रस शिवून दिला. त्याचा रंग केशरी असून ते त्यागाचे प्रतिक असल्याचे मामांनी सांगितले. केशरी रंगाची पॅन्ट, शर्ट व टोपी आणि तोंडाला मास्क बांधलेले कावळे मामा हातात झाडू घेऊन सायकलला दोन्ही बाजूने दोन गोण्या अडकवून शहरात निरनिराळ्या भागात फिरतात.

कचर्‍याने भरलेल्या दोन्ही गोण्या दिवसातून दोन वेळा त्यांना रिकाम्या कराव्या लागतात. एखादी मोठी कचराकुंडी अथवा घंटागाडी पाहून मामा हा कचरा खाली करतात. त्यांनी आतापर्यंत स्वखर्चाने परराज्यात तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाऊन जनसेवा केली आहे. वाराणसी, प्रयागराज कुंभमेळा. नाशिक, नागपूरच्या दीक्षाभुमीवर तसेच पंढरपूर यात्रा, सोलापूर आदी ठिकाणी ते अनेकदा गेलेले आहेत. ते जेव्हा बाहेरगावी जातात तेव्हा कटलरी व्यवसाय त्यांचा मुलगा मच्छिंद्र सांभाळतो.
परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तसेच विसावा कॉर्नर, नारायण चाळ, स्टेशन रोड, गांधी पार्क, नानलपेठ, जिल्हा सामान्य रूग्णालय आदी परिसरात कावळे मामा नित्यनेमाने साफसफाई करतात. संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा आदर्श घेऊन आईच्या स्मरणार्थ ही जनसेवा करत असून त्यात मला आनंद मिळतो, असे ते सांगतात. त्यांच्या या कामाची दखल घेऊन परभणी महानगरपालिकेने त्यांना स्वच्छ भारत मिशनअंतर्गत स्वच्छतादूत म्हणून ओळखपत्रही दिले आहे.
-बाळासाहेब काळे

Leave a Reply