आईवेगळी मुलगी, ते पत्रकार भाग्यश्री

हे घे तुला कानातले, हे घे तुला नेलपेंट, हा घे तुला ड्रेस!! या सगळ्या गोष्टी शेजारपाजारच्यांना वापरून कंटाळा आलेला असायचा, म्हणून आमच्यावर ‘दया’ करण्याच्या भावनेतून देऊ केल्या जायच्या. आमचं वय लहान, मला माझ्याहून आणखी एक लहान बहिण, आणि मी अवघी तीन वर्षांची असताना आई हे जग सोडून गेलेली. त्यामुळे “बिना आईच्या बिचाऱ्या मुली!! जेवायला मिळतं का गं? अभ्यास घेतंय का कुणी? यांचं कसं व्हायचं बाई? काय शिकतील? कशा शिकतील? कशा मोठ्या होतील? लवकर लग्न करून द्यावं लागेल यांचं, (म्हणजे सुखी होतील?) त्यात दोघी बहिणीच  त्यात या काळ्या सावळ्या! लुकड्या सुकड्या! गोऱ्या असत्या तर पटकन चांगल्या घरी खपल्या असत्या” या सारखी हेटाळणीची, कधी क्वचित खरोखर काळजीची वाक्यं ऐकतच आम्ही बहिणी मोठ्या झालो.

भाग्यश्रीचे आई- वडील- बाळकृष्ण नाशिककर आणि आई लीलावती नाशिककर

आम्ही नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरचे. वडील बाळकृष्ण नाशिककर घरोघरी जाऊन सप्तशतीचे पाठ करायचे. त्यामुळे आर्थिक प्राप्ती अर्थातच जेमतेम व्हायची. त्यात मी तीन वर्षांची असताना अचानक आमची आई- लीलावती गेली. आम्हां दोघां बहिणीनंतर तिला पुन्हा दिवस गेले होते. गरोदरपणात एकदा पाय घसरून पडली आणि मग प्रसूतीसाठी गेली, तर तिचं बाळ पोटातच गेलेलं होतं. तात्काळ शस्त्रक्रिया करून पोटातलं बाळ काढून टाकण्याची गरज होती, पण त्याकाळी त्र्यंबकेश्वरला आधुनिक उपचार सुविधा अजिबात नसल्याने, ती सर्जरी होऊच शकली नाही. वडील आईला घेऊन नाशकातही गेले, पण तोवर उशीर झाला होता, दीड दिवसानंतर दगावलेल्या बाळाचं पोटात विष होऊन आमची आई गेली. ही आयुष्यातली सर्वाधिक कटू आठवण आहे, अर्थात तीन वर्षांच्या वयात हे सगळं कळण्याजोगं नव्हतं. बहिण तर माझ्यापेक्षाही लहान.

आई गेल्यानंतर वडिलांनी आमची सर्वतोपरी काळजी घेतली. अगदी स्वयंपाक करून खाऊ घालण्यापासून, आमचे कपडे धुण्यापासून, आम्हांला शाळेत पोहोचवेपर्यंत ते सगळं मायेनं करायचे. पण आधीच कमाई तुटपुंजी त्यात आमच्यातच इतका वेळ गेल्यानं फार कमी काम मिळायचं त्यांना. मग आपल्या लेकींना सांभाळण्यासाठी म्हणून वडिलांनी, मी सहा वर्षांची असताना दुसरं लग्न केलं. सुमन नाशिकककर- आमची दुसरी आई. ‘सावत्र’ हा शब्दही जिच्याबद्दल वापरावासा वाटू नये इतकी प्रेमळ, भोळीभाबडी आणि साधीसुधी गृहिणी. ती स्वत:च तिच्या घरातलं अकरावं अपत्य असल्याने काहीशी बुजलेलीच असायची, पण तिनं आम्हांला माया लावली, आमचं सगळं प्रेमानं केलं. आम्हांला या आईकडून एक भाऊही झाला.

दुसरी प्रेमळ आई सुमन नाशिककरसह भाग्यश्री आणि तिची बहीण

वडिलांना कामातून फारसा वेळ व्हायचा नाही, पण चांगला अभ्यास करा, भरपूर शिका, नाव कमवा, अभ्यासाचं काय साहित्य हवंय ते सांगा, हे ते आवर्जून विचारायचे. आमच्या सुमनआईचीही मुलांची आय़ुष्यात प्रगती व्हावी ही एकमेव इच्छा होती. आम्ही आमच्या परीने चांगलं शिकायचा प्रयत्न करायचो, पण आईवेगळ्या मुली, सावत्र आई, यांचं कसं व्हायचं सारखं सारखं हेच ऐकून स्वत:लाच आपण फार गरीब बिचारे आहोत हे वाटायला लागलं होतं. पहिली ते सातवी मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले. अभ्यासाऐवजी बाईंना चहा- वडे आणून दे, वर्ग सारवायला शेण गोळा करून आण, कुठं कुशावर्तातून पाणीच आणून दे असली कामं करावी लागायची. परिणामी पुढं आठवीत गेल्यावर मला आणि वर्गातल्या बहुतेक मुलींना एबीसीडी, पाढे, बाराखडी, व्याकरण काहीच विशेष येत नव्हतं.

सुरूवातीच्या दिवसांत आमची ही परिस्थिती पाहून हायस्कूलच्या वर्गशिक्षिका अवाक झाल्या पण त्यांनी पदर खोचून आम्हाला दोन महिन्यात शब्दशः ‘तयार’ करून घेतलं. शाळेची गाडी मग रूळावर आली. वर्गातल्या मुली खेळ आणि इतर गोष्टींमध्ये चमकत असताना मला अभ्यासाची आवड निर्माण झाली. वर्गात इंग्रजी, विज्ञान, इतिहास  विषयात सर्वाधिक गुण मिळवण्याची, पहिल्या पाचांत चमकण्याची संधी मिळू लागली. शिकण्या- शिकविण्याच्या बाबतीत मागास शाळा, अभ्यासात कच्च्या असलेल्या आम्ही मुली अशी पार्श्वभूमी असताना तीनच वर्षात यावर मात करत दहावी मध्ये ७५ टक्के गुण मिळवून शाळेत मी पहिली आले. तेंव्हाच आणखी शिकून मोठं व्हायचं, स्वतःला सिद्ध करायचं असा मनात पक्का निर्धार करूनच मी कॉलेजमध्ये प्रवेश केला.

पुढे कला क्षेत्राची आवड असल्याने बीएला प्रवेश घेतला. बी.ए.च्या अंतिम वर्षाला असताना मी ‘अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट’ या नाशकातील प्रसिद्ध सामाजिक संस्थेच्या ‘अनुभव शिक्षा’या युवकांसाठीच्या उपक्रमातही सहभागी झाले होते. या उपक्रमातंर्गत आमच्यासारख्या विचार करू शकणाऱ्या, नवं आत्मसात करण्याची तयारी असणाऱ्या तरूणांसाठी ‘मैत्री’ नावाचं मासिक प्रकाशित केलं जायचं. जाणत्या आणि अनुभवी पत्रकार दीप्ती राऊत या उपक्रमाच्या प्रमुख होत्या. मी पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असताना ‘मैत्री’साठी एक लेख लिहिला, तो प्रकाशित झाला. मग मी हळूहळू छोटे मोठे लेख लिहू लागले, त्यात मला रस निर्माण झाला. त्यांनी एकदा आम्हा युवक युवतींना एका लेखन कार्यशाळेत सहभागी करून घेतले. त्या कार्यशाळेसाठी पुण्या-मुंबईतून मार्गदर्शक आले होते.

कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी आम्हांला ‘देशदूत’ वृत्तपत्राच्या सातपूरच्या कार्यालयात नेण्यात आले. वृत्तपत्र कसे तयार होते, कसे छापले जाते ते सर्व विभाग दाखविले जात होते. दुपारची वेळ असल्याने तेथे त्या दैनिकाच्या युवकांसाठी असणाऱ्या ‘जोश’ या पुरवणीची छपाई सुरू होती. छापून आलेले ताजे अंक आम्ही हातात घेऊन पाहत होतो. आश्चर्य म्हणजे त्यात माझा एक लेख माझ्या नावासह छापलेला होता. मला ४४० का काय म्हणतात, तशा व्होल्टचा धक्का बसला! आनंद, आश्चर्य सगळंच एकदम. मग मी विचारलं माझा लेख कसा काय यात? त्यावर दैनिकाच्या मागणीवरून काही लेख अभिव्यक्तीनेच दिल्याचं समजलं. दुसऱ्या दिवशी मी पेपर खास विकत घेऊन मी माझ पहिलावहिला वृत्तपत्रात छापून आलेला लेख पाहत होते. माझ्या परिचितांकडून देखील त्याबद्दल मला कौतुकाची थाप मिळाली. त्या क्षणापासून मला लिहायला आवडू लागलं आणि आपण चांगलं लिहितो हा आत्मविश्वास आला.

आपण अधिकाधिक लिहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे याची जाणीव झाल्याने. पदवीनंतर मी वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रमाला अर्थात जर्नालिझमला प्रवेश घेतला. दोन वर्षात तो अभ्यासक्रम पूर्ण झाला. त्यानंतर एकीकडे एम. ए. च शिक्षण चालू होत. याच काळात काही दैनिकांत प्रशिक्षणार्थी उपसंपादक, वार्ताहर म्हणून काम करतच होते. त्यानंतर ५ वर्षांनी २००५ मध्ये मला खऱ्या अर्थाने पत्रकार म्हणून ‘दैनिक देशदूत’ मध्येच पहिली नोकरी मिळाली. मी पत्रकारितेचा कोर्स पूर्ण केला. थोडंफार बरवाईट लिहू लागले याचं माझ्या घरच्यांना, शेजारच्यांना, नातेवाईकांना यांना खूप कौतुक होत. आजही आहे. माझे वडील तर माझा एक लेख तर रोज स्वतःसोबत बाळगायचे आणि प्रत्येकाला कौतुकाने दाखवायचे. एका दैनिकाच्या पुरवणीत लेख लिहिला होता, तो मी नाशिक आवृत्तीला दिला होता, पण तो महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला. माझ्या औरंगाबादला राहणाऱ्या मामाने वाचल्या वाचल्या मला फोन करून शाबासकी दिली, आशीर्वाद दिले. बातम्या, लेख, बायलाईन छापून आली की परिचित, नातेवाईक यांचे फोन यायचे आणि कौतुक करायचे. त्यामुळे आणखी हुरूप यायचा.

पत्रकारितेत रूळून पुरस्कार मिळविणारी भाग्यश्री मुळे

२००५ ते २०११ अशी सात वर्षं मी त्या दैनिकात काम केलं. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. बातम्या संपादित करणे, त्यांचे पुनर्लेखन करणे, कार्यक्रमांना जाऊन बातम्यांचे रिपोर्टिंग करणे, स्वत: जाऊन माहिती घेऊन विशेष बातम्या तयार करणे, मुलाखती घेणे अश्या गोष्टीतीतून मी घडत गेले. त्या काळात तत्कालीन संपादक स्व. सुरेश अवधूत सर, नंदकुमार टेणी, सुधीर कावळे सर, दिलीप तिवारी सर, संपादकीय विभागातले वरिष्ठ आणि सर्वच सहकारी यांनी देखील खूप गोष्टी शिकवल्या. पत्रकारितेचे धडे गिरवता येत होते. याचदरम्यान लग्न होऊन त्र्यंबकेश्वरहून नाशिकला आले.

महिला पत्रकार म्हणून काम करताना जितकं समाधान मिळतं तितकीच मोठीं आव्हानं असतात. लग्नानंतर सासरच्या जबाबदाऱ्या आपसूक अंगावर येतात. कामावर सकाळी कितीही लवकर गेलं तरी, पत्रकाराला संध्याकाळी वेळेत घरी येता येईलच असं नसतं. काही काळ डेस्क जॉब होता तेव्हा मी बऱ्यापैकी वेळेत परत यायचे, पण रिपोर्टिंग सुरू झालं आणि मग कार्यक्रमाच्या वेळा, तिथं न टाळता येणारा उशीर, पुन्हा बातमी सबमिट केल्याशिवाय घरी न जाता आल्याने, घरी यायला हमखास उशीर व्हायचाच. त्यामुळे पत्रकारिता करताना घरी यायला होणारा उशीर आणि त्यामुळे सासरचे नातेवाईक, नवरा यांची होणारी चिडचिड ही बहुतांश महिला पत्रकारांसाठी कॉमन समस्या असी, असं वाटतंय. अर्थात घरचे बऱ्याचदा समजून घ्यायचे, पण काही गोष्टी माझ्याही हातात नसायच्या. तरीही कामाला प्राधान्य असल्याने समस्यांवर मार्ग काढत गेले.

पत्रकारितेत रोजचा दिवस नवीन असतो, आज कोणती बातमी करावी लागणार, कुणाला भेटावं लागणार याचे नित्य नवे अनुभव येत जातात. यात नुसत्या बातम्या न करता मुलाखती, रविवार पुरवणीसाठी लेखन, माहिती जमविणे या सगळ्या गोष्टी करण्यावर माझा भर होता. २०११ च्या सुमारास मी लोकमतला जॉईन झाले. २०१५-१६ च्या कुंभमेळ्यात वार्तांकनाची मिळालेली संधी मला खूप काही देऊन गेली. कुंभमेळ्यातली एका विषयाची बातमी करून मी परतले होते, तर चीफ रिपोर्टर संजय पाठक सरांचा फोन आला, तुम्हांला त्र्यंबकेश्वर मधल्या सर्व आखाड्यांची माहिती मिळवून आणायची आहे. प्रत्येक आखाड्याला ते नाव कसं पडलं, (उदा. अग्नी आखाडा, उदासीन आखाडा इ.) त्यांचा इतिहास काय, त्यांचे देव कोणते, संस्थापक कोण वैगरे. अरे बापरे!! आता पुन्हा एवढे दहा आखाडे फिरायचे या कल्पनेनंच टेन्शन आलं. पण सायंकाळपर्यंत सगळी माहिती त्या त्या आखाड्यात जाऊन घेऊन आले. त्या एका स्टोरी मुळे माझ्या ज्ञानात किती भर पडली होती, माहितीच्या खजिन्याने मी किती समृद्ध झाले होते त्याची कल्पना येऊ शकते. संपूर्ण कुंभमेळ्याचा कालखंड सुंदर अनुभव देणारा होता. रामदेव बाबा, दलाई लामा, मुरारी बापू, राजनाथ सिंह अशा कितीतरी मोठ्या व्यक्तिमत्वांना जवळून बघण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यानंतर चार वर्षं शहर वार्तांकनही केले.

आता सध्या संपर्क संस्थेसोबत ‘नवी उमेद’ साठी काम करतेय, हा अनुभवही सुंदर आहे. कॅन्सर, एड्स अशा जीवघेण्या आजारांवर सकारात्मक विचार ठेऊन लढणाऱ्या लोकांशी बोलून त्या त्या दिनविशेष अंतर्गत त्यांच्या स्टोऱ्या करताना, आपण सर्वसामान्य माणसं छोटंसं काहीतरी झालं तरी त्याचा उगाच बाऊ करतो, हे जाणवायचं. पैसा, पाठबळ, शिक्षण, संधी कशाचीच उपलब्धता नसताना प्रतिकूल परीस्थितीत जिद्दीने यश खेचून आणणाऱ्या युवक, युवती, पतीची साथ सुटल्याने एकट्या पडलेल्या महिला, गरीब मुले, वयाने ज्येष्ठ मात्र जिद्दीने तरुण माणसं यांच्या स्टोऱ्या केल्यानंतर वाचकांना प्रेरणा देण्याआधी आपल्यालाच आधी उमेद मिळते हा तर नेहमीचाच अनुभव. एकूणच माणसांसोबत राहून समृद्ध होत जाण्याची, त्यांच्या व्यथा- वेदनांना सुख- दु:खांना वाचा फोडण्याची संधी ही पत्रकारिता मला देते, याचं समाधान आहे.

 

लेखन: भाग्यश्री मुळे, नाशिक.

 

 

Leave a Reply