आई, जिद्द आणि मैत्रीच्या बळावर अंथरुणात पडलेले राजकुमार झाले संस्थाचालक

 

सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या नरखेडचे राजकुमार पाटील. वडिलांचं छत्र हरपलेलं, कठीण परिस्थितीतून मार्ग काढत ते एम.ए , बी. एड. झाले. नोकरी मिळाली. लग्न झालं.

सुखानं संसाराला जेमतेम वर्ष होत असतानाच २५ मे २००६ ला दुचाकीवरून गावाला जात असताना टेंभुर्णीजवळ कंटेनरनं त्यांना उडवलं. दोन तास ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर सोलापूर आणि पुण्यातल्या रुग्णालयात उपचाराचे प्रयत्न झाले. त्यांच्या कमरेखालचा भाग पूर्ण निकामी झाला होता. ते काहीच दिवसांचे सोबत असल्याचं सांगत रुग्णालयानं घरी पाठवलं. पत्नी बाळंतपणासाठी म्हणून माहेरी. घरी एकटी आईच. उपचार करताकरता पैसे संपले होते. परिस्थिती इतकी बिकट होती की भिक्षा मागायची वेळ आली होती. पाठीवर वाटीएवढ्या जखमा. तशा अवस्थेत राजकुमार यांनी पत्र्याच्या घरात तीन वर्ष काढली. आई हाच त्यांचा आधार होती.
कंटाळलेल्या पाटील यांनी जीवन संपवण्याचा प्रयत्नही केला. पण त्यातून ते वाचले आणि जगण्यासाठी पुन्हा मिळालेली संधी डोळे उघडणारी ठरली. मित्र आणि मुंबईचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे मदतीला आले. त्यांच्या सहकार्यामुळे लष्करी रुग्णालयात उपचार झाले. त्याला यश येऊ लागलं. मनही उभारी घेऊ लागलं. खाजगी शिकवणी सुरू केली. शिक्षण होतेच. शिकवणी चांगली चालू लागली. मग २०१२ मध्ये श्रेया मल्टिपर्पज संस्था तर २०१५ मध्ये डॉ.एस. बी. इंग्लिश मीडियम स्कूलची सुरुवात. मित्राप्रती कृतज्ञता म्हणून संस्थेला मित्राचं नाव दिलं आहे.

-अमोल सीताफळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर

Leave a Reply