आगळा व्यवसाय निवडणारी धनश्री

 

 

भंडारा जिल्हयातील साकोलीत राहणारी धनश्री प्रेमलाल हातझोडे. अवघ्या 22 वर्षाची ही तरुणी सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनली आहे. धनश्रीचे वडील मेकॅनीकल इंजिनीयर असून त्यांचा ‘मामा ट्रॅक्टर’ नावाचा ट्रॅक्टर दुरुस्तीचा व्यवसाय आहे. धनश्रीही नुकतीच बी.ई.मेकॅनिकल इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. तिने ट्रॅक्टर दुरूस्तीचे काम सुरू केलं; त्यामुळे सुरूवातीला गावकरी तिला टोमणे मारायचे, हिणवायचे. मात्र धनश्रीने जिद्दीने आपलं काम सुरू ठेवलं. तिने मेहनतीने गावकऱ्यांची मनं जिंकली. आज हेच गावकरी ‘तिच्या हातूनच ट्रॅक्टर दुरुस्त व्हावा’ असा आग्रह धरतात. ही तिच्यासाठी एक जमेचीच बाजू म्हणावी लागेल.

लॉकडाऊन सुरु झालं तेव्हा सगळंच काम ठप्प झालं होतं. धनश्री त्यावेळी बी.ई.च्या द्वितीय वर्षाला शिकत होती. परीक्षा व्हायची होती तेव्हा फावल्या वेळात तिने वडिलांना गॅरेजमध्ये काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. वडिलांनीही दुस-या दिवशीच तिला ट्रेनिंग द्यायला सुरूवात केली. बघता बघता अवघ्या तीन महिन्यात ती नट बोल्ड खोलणे, कसणे हे तर करू लागलीच. नंतर ट्रॅक्टरच्या मागच्या चाकापासून पुढचे चाकसुद्धा तिला काढता आणि लावता येऊ लागलं. आता ट्रॅक्टरच्या इंजिन दुरूस्तीपर्यंत तिची प्रगती झाली आहे.

या कामाचा मोबदला म्हणून धनश्रीला वडिलांकडून दरमहा 18 हजार रुपये पगार मिळतो. वर्कशॉपमधील इतर कारागिरांप्रमाणेच धनश्रीसुद्धा बांधून दिलेल्या वेळेत काम करते. शिवाय घरी आल्यावर घरकामात सुद्धा मदत कररते. ट्रॅक्टर विषयात पुढील प्रशिक्षण घ्यायची इच्छा आता धनश्री व्यक्त करते.

– निता सोनवणे, नागपूर

Leave a Reply