आगळीवेगळी भिशी
“एका नातेवाईकांकडे जेवणाचं आमंत्रण होतं. त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी मला वाचनाची आवड आहे म्हणून पुस्तकांनी भरलेला एक मोठा पेटारा उघडून दिला. त्यांच्याकडे एवढी पुस्तकं २० वर्षात जमा झाली होती ती केवळ ‘पुस्तक भिशी’ माध्यमातून. ही संकल्पना मला वेगळी वाटली. आपणही अशा ग्रुपला जॉईन व्हावं असं वाटलं पण नवीन सदस्यांना जुन्या पक्क्या ग्रुपमध्ये सहभागी करून घेणं त्यांना जमेना म्हणून समविचारी मैत्रीणींसोबत ‘वाचनानंद’ हा पुस्तक भिशी ग्रुप सुरू केला.” पुस्तक भिशीचा हा प्रवास यशश्री रहाळकर उलगडत होती. यशश्रीसह डॉ. सायली आचार्य, चारूलता केतकर, मृणाल कुलकर्णी, ज्योत्स्ना मोराणकर, स्मिता धामणे, रश्मी अंधारे, चारूशीला कुलकर्णी अशा आठजणी आहेत.
भिशी हा खरं तर महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. भिशीच्या माध्यमातून चार पैसे जमा होता, मैत्रीणींसोबत गप्पा होतात. यामुळे महिला भिशीसाठी उत्सुक असतात. मात्र पैशांची भिशी या संकल्पनेला छेद देत नाशिक शहरात पुस्तक भिशी चालविणारे १०-१५ ग्रुप आहेत. त्यापैकी एक ‘वाचनानंद’. भिशीमध्ये ३० पासून वयाची पासष्ठी गाठलेल्या ज्येष्ठा अशा आठ जणी आहेत. यातील काही नोकरदार, काही गृहिणी तर काही सेवानिवृत्ती. या सर्वांना ‘वाचन’ आणि ‘लेखन’ या धाग्याने बांधून ठेवलं आहे.
ग्रुपला आता दुसरं वर्ष सुरू असल्याचं यशश्री सांगते. या निमित्ताने विविध विषयांवरील पुस्तकं वाचली जातात शिवाय प्रत्यक्ष पुस्तक खरेदी होत असल्याने पुस्तक विकत घेऊन वाचायचं असा एक उत्तम पायंडा पडत आहे. या निमित्ताने वेगवेगळ्या विषयावर चर्चा तर होते. सर्वंकष वाचन होते याचा आनंद जास्त असल्याचे यशश्री सांगते. दरमहा विशिष्ट रक्कम जमा करायची. भिशीप्रमाणे एकीचा क्रमांक काढायचा. जिचा येईल तिने त्या रकमेची पुस्तक खरेदी करायची. त्या पुस्तकांची यादी किंमतीसह व्हॉटसअप ग्रुपवर टाकायची. पुढच्या भिशीच्या वेळी ती पुस्तके सर्वांना वाचनासाठी खुली करायची. प्रत्येकाची आवड वेगळी असल्याने पुस्तक भिशीत ‘राजा राक्षसांचा ‘रावण’, मैथिलीपासून कौस्तुभ केळकरांच्या ‘कथुली’ पर्यंत वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील पुस्तकं जमा झाली आहेत. इथंपर्यंत भिशीचा प्रवास थांबत नाही. जी पुस्तके आपण वाचत आहोत. त्याची वैशिष्टे, का आवडली, का आवडली नाही यावर व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा होते. तेही मराठीत. मराठी टंकलेखन हा ग्रुपचा नियम आहे. ग्रुप मधील चारूलता केतकर या सर्वांत ज्येष्ठ. त्यांना मराठी टंकलेखन जमत नव्हतं. तेव्हा त्या कागदावर लिहून त्याचा फोटो टाकायच्या. आता त्यांनीही टंकलेखन शिकून घेतल्याने कुठल्याही लेखावर, ब्लॉगवर किंवा कवितेवर त्या थेट अभिप्राय देतात.
या गृपमधल्या मृणाल कुलकर्णी सांगतात, “पुस्तक भिशी हा उपयुक्त आणि विचार प्रगल्भ करणारा उपक्रम आहे. यातून विचारांची देवाण घेवाण होते. वाचनाने विविध पैलू समजू लागतात. एक नवा विचार, नवी दृष्टी मिळते. पुस्तक देवघेव होतेच शिवाय आपल्या ज्ञानासह पुस्तक भांडार वाढीत अत्यल्प खर्चात मदत होते ती निराळीच.”
वाचनाबरोबर विचारांची देवाणघेवाण तर होते. संवादात्मक चर्चा होते ती महत्त्वाची असल्याचे ज्योत्सना मोराणकर यांनी सांगितलं. चारूलता केतकर म्हणतात, “आपल्या मनात निर्माण झालेल्या भावना विचार दुसऱ्याजवळ प्रगट करायला हक्काची जागा आणि संधी मिळतेच पण पुस्तकांसोबत आपण माणसांवरही प्रेम करू लागतो.”
– प्राची उन्मेष, नाशिक

Leave a Reply