आजोबांच्या शेतीतंत्राची आठवण

उत्तम शेती :आजोबांच्या शेतीतंत्राची आठवण, पारंपरिक बियाणांचं जतन, कमी खर्चात शेतीउत्पादन


विडा (ता. केज, जि बीड) इथले रहिवासी पत्रकार अतुल अविनाश कुलकर्णी. सध्या ते ‘महाराष्ट्र टाइम्स’चे जिल्हा प्रतिनिधी आहेत. त्यांच्या बालपणच्या आजोळच्या (गौर, जि.उस्मानाबाद) आठवणींत आजोबांची पारंपरिक शेती, सेंद्रीय बियाणांचं त्यांनी शेतकऱ्यांना केलेलं वाटप आणि गावरान धान्याची चव हे मनावर कोरलं गेलेलं. खतं आणि बियाणं विकत घेताना शेतकर्‍याचं कंबरडं मोडतं, हे लक्षात आल्यावर त्यांनी आजोबा गणपतराव कुलकर्णी यांचं तंत्र अंमलात आणत स्वतःच्या शेतीत प्रयोग करून बळीराजासाठी बियाणं बँक सुरू केली आहे.पारंपरिक बियाणांचं वाण जतन करून केलेली सेंद्रीय शेतीच किफायतशीर असल्याचं त्यांनी दाखवून दिलं आहे.
अतुल कुलकर्णी सांगतात, “बीड जिल्ह्याचा गवगवा एक मागास जिल्हा आणि महाराष्ट्रातील बिहार असाच झाला आहे. महागडी बी-बियाणं आणि फवारणीसाठीची औषधं. आधी पाण्याचा बेसुमार वापर आणि मागील तीन वर्षांपासूनची दुष्काळी स्थिती…यामुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढच होत गेली. पारंपरिक कसब सोडून शेती कसणारा शेतकरी चोहोबाजूने संकटात सापडतो आहे”. पारंपरिक पद्धतीने (बियाणे आणि खतांवर खर्च न करता) शेती करण्याला शेतकरी फारसा धजावत नाही. दुकानातून कापूस, सोयाबीनच्या बियाणाच्या पिशव्या, खताचं पोतं उचलून शेतात न्यायचं. भरमसाठ खर्च करूनही पावसाने ताण देताच हताश व्हायचं. 
हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी अतुल यांनी आजोबांचा मार्ग निवडला. घाटावरच्या ‘काळीकुसळी’ या जातीलाच ‘बन्सी गहू’ या नावाने ओळखलं जात असल्याचं त्यांनी हेरलं. पूर्वी जोडगहू असायचा. तव्यावर पोळी टाकली, की भाजताना टर्र होऊन फुगायची. आज हाच गहू औषधांची थोडीफार मात्रा लावून पॅकबंद होऊन बियाणाच्या रूपात येतो. वीस रूपये किलोचा गहू शेतकऱ्याला मात्र पन्नास ते सहासष्ट रूपये किलोनं बियाणं म्हणून मिळतो. यातून पेरणीचा खर्च वाढत जातो. आजोबांच्या काळातल्या शेतीविषयी अतुल सांगतात, ‘पूर्वी अशा कंपन्या नव्हत्या. पाऊसकाळही दरवर्षी भरमसाठ नव्हता. तरीही निसर्गावर अवलंबून शेती केली जायची. शेतीत पिकलेल्या मालातून निवडक कणसं जतन केली जायची. त्यांना गोमूत्र, हस्त नक्षत्रात साठवून ठेवलेलं पावसाचं पाणी लावून बीजप्रक्रिया करत. हंगाम सुरू होताच पेरणी व्हायची. पेरणीखर्च शून्य. आता दुकानदाराकडे चकरा माराव्या लागतात. खेड्यात असं म्हणतात, बारा गावं बदलली की भाषा बदलते, मग मातीत नसेल का बदल होत? गावकूस, रचना, जमिनीचा प्रकार वेगळा नसेल का? मग एकाच कंपनीचं पिशवीबंद बियाणं सगळीकडे कसं चांगलं येईल? बियाण्यात आणि मातीत फरक पडणारच ना. माझे आजोबा ज्वारीचं वाण सगळ्या शेतकऱ्यांना देत. पाणी असो वा नसो.. त्यांच्या साडेचोवीस एकर शेतीत दोनशे पोती ज्वारी हमखास व्हायची’. 
2005 मध्ये अतुल शेती कसायला लागले. बियाणं, खतांचा 25 हजारांवर जाणारा खर्च परवडणार नाही हे लक्षात आलं आणि आजोबांची आठवण झाली. मग चांगलं बियाणं संकलित करायला सुरवात केली. बीड जिल्ह्यातील बालाघाट परिसरातून बन्सी गहू, कळंबकडून हुरड्याचे गुळभेंडी वाण, मधुमेही रूग्णांसाठी वरदान ठरणारी पिवळी ज्वारी, दगडी, शाळू ज्वारी तर मालदांडी ज्वारी बार्शीकडून आणली. विड्यातील शेतात झिपरी (पिवळी) ज्वारी तयार झाली. यासोबतच कळंबचा बन्सी गहू, लखनऊ येथून कुदरत जातीचा गहू उपलब्ध केला. हुरड्यासाठी सुरती, गुळभेंडी आदी प्रकार उपलब्ध झाले. मागील वर्षभरापासून त्यांनी पंचवीस – तीस शेतकऱ्यांना या बियाण्यांचं वाण दिलं, ते पुढील हंगामात दुपटीने बियाणं परत करण्याच्या अटीवर. त्यासाठी पैसे घेतले नाहीत. यातून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन ‘धान्य बँक’ कोठी पद्धतीने सुरू करणार असल्याचं ते म्हणाले. पारंपारिक बियाणं जतन करून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणं हा यामागचा हेतू. हा प्रयोग नक्कीच अनुकरणीय आहे. 
अतुल कुलकर्णी – मोबाईल 9422633300
– मुकुंद कुलकर्णी.