आठवीतल्या गायत्रीने केलं केसांचं दान

 

गायत्री गजानन काळे. जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातल्या माहोरा इथली. सध्या 8 वीत आहे आणि तिच्या आईबाबांसोबत तीही कर्करोगग्रस्तांना धीर देते. गेल्या वर्षी तिनं आपले केस दान केले.
गायत्रीच्या आजीला तोंडाचा कर्करोग झाला होता. तिचे वडील गजानन सैन्यात. या काळात आई सरलानं केलेली आजीची सेवा तिनं पाहिली आणि आजी गेल्यावर वडील 2018 पासून कर्करोगग्रस्तांसाठी करत असलेलं कामही ती पाहत आहे.
”भीती आणि लाजेपोटी आई अलिप्त राहत होती.” गजानन सांगतात. ” भीतीपोटी ती औषधोपचाराला प्रतिसाद देऊ शकली नाही. शरीरात कुठलीही गाठ असली तरी माणसानं, विशेषतः स्त्रियांनी न लाजता डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. वेळीच माहिती मिळाली तर कॅन्सरशी दोन हात करणं सोपं जातं.”
आईला वाचवू न शकल्याचं शल्य बोचत असलेल्या गजानन यांनी जनजागृतीसाठी मित्रांच्या साथीनं कलाबाई फाउंडेशनची स्थापना केली. माहिती, तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि मुख्य म्हणजे औषधोपचारानं कँसर बरा होऊ शकतो, असा धीर देण्याचं काम.
सेवानिवृत्त झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी 2 डिसेंबर 2018 पासून त्यांनी गुवाहाटी ते पुणे हा 1481 किलोमीटरचा 5 राज्यातल्या 13 जिल्ह्यात सायकल प्रवास करत गावागावात जनजागृती केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांनी त्यांना पाठबळ दिले. अभिनेत्री मनीषा कोईराला यांनी रॅलीचं स्वागत केलं. 2019 मधेही त्यांनी अशी रॅली काढली होती. या रॅलीत शरद पवार,मनीषा कोईराला,युवराजसिंह यांनी कॅन्सरशी कसा लढा दिला, मनोधैर्य कसं टिकवून ठेवलं याचे व्हिडिओ दाखवले. त्यातून अनेकांना धीर मिळाला.
गेल्या वर्षी कोरोनामुळे कामावर बरीच बंधनं आली. सध्या स्थानिक स्तरावर काळे कुटुंबाचं काम सुरू आहे. गावातली एक कर्करोगग्रस्त महिलाही आता त्यांच्यासोबत जनजागृती करत आहे.

Leave a Reply