ही गोष्ट आहे मालेगाव तालुक्यातील वडगाव इथल्या संकेत आहिरे या छोट्याची. त्याचे वडील ज्ञानेश्वर हे नाशिक इथं विशेष सुरक्षा विभागात पोलीस तर आई सोनाली ही गृहिणी. संकेत वर्षाचा झाला तरी आवाजाला प्रतिसाद देत नाही हे लक्षात आल्यावर आईवडील चिंतेत पडले. हळूहळू होईल ठीक या आशेत चार वर्षं निघून गेली. परंतु संकेत ऐकूही शकत नव्हता आणि शब्दही उच्चारत नव्हता. यामुळे त्याचा भाषिक विकास थांबला होता. छोटया- मोठया वैद्यकीय तपासण्या झाल्या. त्यातून संकेत काहीच ऐकू शकत नाही हे कळलं. यावर एकच पर्याय सांगितला गेला. तो म्हणजे कॉकलिअर इंप्लान्ट शस्त्रक्रिया. खर्च होता एका कानासाठी आठ लाख आणि दोन्ही कानांसाठी १६ लाख रु. पण हा खर्च आहिरे कुटुंबाला न झेपणारा होता ना एवढा पैसा उभा करणं शक्य होतं. संकेतच्या वडिलांनी पोलीस कुटुंब कल्याण आरोग्य योजनेत विशेष बाब म्हणून संकेतच्या शस्त्रक्रियेसाठी प्रकरण दाखल केले, प्रयत्नांची पराकाष्टा केली. आणि अखेर या प्रयत्नांना यश आले. पोलिस महासंचालकानी विशेष बाब म्हणून या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत मंजूर करून दिली आणि संकेतच्या शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला.
गेल्या वर्षी संकेतवर मुंबईतील एस.आर.सी.सी. रुग्णालयात कानाचे प्रसिद्ध तज्ञ डॉ.मिलिंद कीर्तने आणि डॉ.श्रुती बन्सल यांनी तब्बल ७ तासांची कॉकलियर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. डोक्याच्या आत कानाजवळ सूक्ष्म यंत्रे बसविण्यात आली असून बाहेरून कानात घालण्यासाठी मशीन दिलं आहे. स्पीच थेरपीद्वारे एकेक शब्दाची हळूहळू ओळख करून देत अवघ्या वर्षभरात संकेतच्या आयुष्यात शब्द आले आहेत. संकेत आता प्रत्येक ध्वनी ऐकू शकतो. गेल्या चार-साडेचार वर्षात एकही शब्द ऐकू न शकलेल्या संकेतला आता ध्वनीसह शब्दांची ओळख होत आहे. यासाठी खास क्लास लावण्यात आला असून आईची मदत घेत तो आता सामान्य मुलांप्रमाणे बोलू लागला आहे. त्याचे बोल ऐकण्यासाठी कुटुंबीय उत्सुक असतात.
संकेतचे वडील ज्ञानेश्वर अहिरे म्हणतात, “कर्णबधिर मुलांची मानसिक अवस्था खूप नाजूक असते. वातावरणातले आवाज त्यांच्या कानावर पडत नाहीत. समोरचा काय बोलतो हे समजत नाही. वाचा असूनही केवळ ऐकायला येत नसल्याने काय बोलावे हे समजत नाही. बोलता येत नसल्याची कुचंबणा या मुलांना सहन करावी लागते. म्हणून अशा मुलांवर उपचार व्हायलाच हवेत.”
– प्राची उन्मेष, तालुका – माळेगाव, जिल्हा नाशिक