आणि हक्काचे तीन लाख मिळाले

 

 

धुळे जिल्ह्यातील भटाणे गाव. इथल्या जितेंद्र भोई या शेतकऱ्याच्या लढ्याची ही गोष्ट. जितेंद्र यांनी त्यांच्या 18 एकर शेतामध्ये मका या पिकाची लागवड केली होती. कोरोनाकाळात लॉक डाऊनमुळे सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होत्या. त्यामुळे उत्पादित मका कुठे विकावा असा प्रश्न त्यांना पडला. अशातच मध्यप्रदेश राज्यातील पानसेमल येथील दोन व्यापारी त्यांच्याकडे मका खरेदीसाठी आले. त्यांनी १२४० रुपये प्रति क्विंटल या भावाने जितेंद्र यांच्या मक्याची खरेदी केली. आठ दिवसात पैसे आरटीजीएस करतो असं त्यांना सांगण्यात आलं. मात्र संबंधित व्यापारी पैसा द्यायला चालढकल करायला लागले, असल्याचे जितेंद्र सांगतात. हा काळ वेदनादायी आणि प्रचंड तणावाचे असल्याचेही जितेंद्र सांगतात.

सुरुवातीला आठ दिवस… नंतर पंधरा दिवस… असं करत तब्बल तीन महिन्यांचा कालावधी लोटला. जितेंद्र यांनी हक्काचे तीन लाख 32 हजार रुपये मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यश मिळत नव्हतं. पैसे बुडाले या चिंतेने जितेंद्र यांना ग्रासलं. काय करावं? कसं करावं? याचं विचारात ते अडकले. तब्बल दीड महिना ते घराबाहेर पडले नाहीत. तीन महिने संघर्ष सुरू होता. अशातच त्यांना एका शेतकरी मित्राने नवीन कृषी कायद्याची माहिती दिली. या कायद्याअंतर्गत कृषिमाल घेणाऱ्या व्यापाऱ्याने वेळेच्या आत पैसे न दिल्यास त्याविरोधात प्रशासनाकडे दाद मागता येते असं जितेंद्र यांना कळलं. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मध्यप्रदेश राज्यातील पानसेमल येथील प्रांताधिकार्‍यांना आपल्या फसवणुकी संदर्भातली लेखी तक्रार दिली. नवीन कायद्यांतर्गत ही तक्रार प्रांताधिकार्‍यांनी तात्काळ सुनावणीला घेतली. दोन व्यापाऱ्यांनी जितेंद्र यांची फसवणूक केली होती. त्यांना बोलावण्यात आले. त्या व्यापाऱ्यांनी दोन टप्प्यांमध्ये जितेंद्र यांचे पैसे देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर जितेंद्र यांना आपल्या हक्काचे तीन लाख 32 हजार रुपये मिळाले.

– कावेरी परदेशी, शिरपूर, धुळे

Leave a Reply