आता चढाओढ लग्नसमारंभातला खर्च टाळण्यासाठी व्हावी …
ना वाजंत्री, ना पंगत, ना मानपान, केवळ पाहुण्यांना पेढा भरवत मंदिरात घंटेच्या साक्षीनं झालेल्या एका साध्या विवाहाची चर्चा सध्या खान्देशात होत आहे.
लग्न होतं सागर आणि अर्चना यांचं. अर्चना शहादा तालुक्यातल्या कवठळ इथली. रसायनशास्त्रात एम एस्सी. सागर मूळचा गोगापूरमधला. नोकरीनिमित्त आता बडोद्याला. तिथल्या एका कंपनीत मार्केटिंग मॅनेजर. या कंपनीचे मालक स्मिताबेन आणि संजय चौधरी. सागरच्याच नात्यातले.
चौधरी दांपत्य वेगळ्या विचारांचं. ‘चालीरीती, मानपान , दागदागिने , मंडप , जेवणावळ,थाटमाट यावर लग्नात विनाकारण भरमसाठ पैसा खर्च केला जातो. निव्वळ वाजंत्रीवरच लाख तरी खर्च होतात. जेवणावळीसाठी लाखो रुपये खर्च होतात. क्षमतेपेक्षा जास्त अन्न वाढल्यानं ते वाया जातं. युवा पिढीनं पुढाकार घेऊन या सर्वाला काळानुसार बगल दिली पाहिजे, ‘ असं त्यांना वाटतं. लग्नसमारंभावर होणारा खर्च टाळून हा पैसा मुलंमुली स्वतःच्या घरासाठी, त्यातल्या वस्तूंसाठी वापरू शकतात. भविष्याची सोय म्हणून बचत करू शकतात. त्यातून उद्योगधंदा सुरू करू शकतात.’
आपले हे विचार सागर आणि स्मिताबेन कंपनीतल्या, आजूबाजूच्या मुलांकडे व्यक्त करतात. सागरला ते पटले. चौधरी दांपत्याशी बोलल्यावर सागरचे आईवडील वंदना आणि गणेश पाटील, अर्चनाचे वडील अशोक पाटील यांनीही ते उचलून धरले.
शहादा तालुक्यातल्याच पिंगाणे इथल्या नागेश्वर मंदिरात दीड महिन्यापूर्वी लग्न झालं. लग्नाला फक्त ५० माणसं. आदल्या दिवशी हळदीसाठीही सागरकडे ४०-५० माणसं होती. लग्नसमारंभावरचा खर्च टाळल्यामुळे झालेल्या बचतीतून सागर आणि अर्चना बडोद्याच्या घरासाठी अनेक संसारोपयोगी वस्तू खरेदी करू शकले. या विवाहाची चर्चा समाजात आणि खान्देशात होत आहे.
लग्न आता अशीच झाली पाहिजेत. किमान सामुदायिक पद्धतीनं तरी झाली पाहिजेत, असं संजय आणि स्मिताबेनना वाटतं. त्यासाठी ते प्रबोधन करत आहेत.
– रुपेश जाधव, नंदुरबार

Leave a Reply