अंगणवाड्या म्हणजे चिमुकल्यांचा किलबिलाट. बीड जिल्ह्यातल्या शिरुर तालुक्यातल्या अंगणवाड्यांमध्ये सध्याही किलबिलाट ऐकायला मिळतो. पण हा किलबिलाट पक्ष्यांचा.
”घरून निघताना रोज सोबत थोडं धान्य घेऊन जाते. माझी पाखरं अंगणवाडी उघडण्याची वाटच बघत असतात. ”आशाताई सांगत होत्या.
तालुक्यात बहुतांश अंगणवाडीताईंनी उन्हाळ्यात पक्ष्यांच्या चारापाण्याची व्यवस्था केली आहे.आशा पाडळे (आर्वी), विजया सस्ते (हिंगेवाडी), अध्योध्या देवकर (हिवरसिंगा), हिरा मिसाळ (खोकरमोहा), अयोध्या बेद्रे (तांबे वस्ती) या अंगणवाडीताईंनी आपल्या अंगणवाडीत पत्र्याच्या डब्याला छानसा आकार दिला आहे. यातच पाणी आणि चारा यांची एकत्र व्यवस्था केली आहे.
उन्हाळ्यात पक्ष्यांच्या चारापाण्याचा प्रश्न निर्माण होतो यामुळे अंंगणवाड्यांमध्ये, यापूर्वी तयार केलेल्या परसबागांमध्ये पक्ष्यांसाठी चारापाण्याची व्यवस्था करावी असं आवाहन बीड जिल्हा परिषदेचे सीइओ अजित कुंभार आणि महिला बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामेश्वर मुंडे यांनी केलं होतं.
पक्ष्यांना असं खाऊपिऊ घालण्यात, त्यांना बघण्यात वेगळाच आनंद मिळत असल्याचं सगळ्या अंगणवाडीताई सांगतात.
– अमोल मुळे, ता. शिरुर , जि. बीड