बीड जिल्ह्यातील केज तहसील. इथल्या नायब तहसीलदार आशा वाघ. जवळपास आठ वर्षं त्यांनी मराठवाड्यात काम केलं आहे. तर गेली सहा वर्ष त्या केजमध्येच कार्यरत आहेत. इथल्या दुष्काळी परिस्थितीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं जीवन त्यांनी पाहिलेलं होतं. एकट्या केज तालुक्यात 2009 ते 2019 या कालावधीतील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांची संख्या 130 एवढी आहे. अर्थातच अशा कुटुंबातील विधवांची संख्या तेवढीच आहे.
आत्त्महत्याग्रस्त कुटुंबाना मिळणाऱ्या एक लाख रुपयांच्या मदतीवर त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आयुष्यभर कसा पार पडत असेल असा प्रश्न त्यांना पडायचा. अशा कुटुंबातील महिलांना कायमस्वरूपी कोणता रोजगार उपलब्ध करून देता येईल याचा विचार त्यांच्या मनात येत राहायचा. अशा विधवा महिलांचे वयोमान आणि त्यांचे कौशल्य यावर आधारित मदत ही त्यांनी त्या महिलांना मिळवून दिली होती. अशिक्षित महिलांना शेळीपालन, कुक्कुटपालन यासारख्या व्यवसायात साह्य करण्यासाठी त्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे पाठविण्यात येतात. तर ज्या महिलांना हक्काची शेती व पाण्याची सोय आहे त्यांना औषधी व सेंद्रिय शेती प्रशिक्षण दिलं जातं. तसेच या महिलांचे समुपदेशन करून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय देखील महाराष्ट्रातील नामांकित शाळेत करण्यात आली आहे.
यावर्षी जागतिक महिला दिनाच्या दिवशी त्यांनी विधवा आणि एकल महिलांना सामाजिक, कायदेशीर, भावनिक, आर्थिक अशी सर्व प्रकारची मदत मिळवता यावी यासाठी केज तहसील कार्यालयात महिला सबलीकरण कक्ष स्थापन केला. महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्यासाठी वाहन चालकाचं काम योग्य राहिल असं वाघ मॅडम यांना वाटायचं. कक्षाचं उद्घाटन झालं. आणि वाहनचालक म्हणून प्रशिक्षण घेण्याची कुणाची तयारी आहे याची विचारणा केली. त्यावेळी 20 महिला त्यासाठी पुढे आल्या. त्यातील 10 महिला आणि एका तृतीय पंथियास 15 मार्चपासून प्रत्यक्ष वाहनचालक म्हणून ट्रेनिंग देण्यास सुरुवात झाली आहे. नंतर लॉकडाऊन झालं तरीही सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून ट्रेनिंग सुरू राहिलं. ट्रेनिंग पूर्ण झालं की, त्यांना प्रत्यक्ष रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं वाघ यांनी सांगितलं. अंकुर स्वयंसेवी संस्था आणि एकल महिला संघटनेचं त्यांना या उपक्रमात सहकार्य मिळालं. तर नाम फाउंडेशनने या प्रशिक्षणासाठी येणारा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली. शासकीय नियमाच्या चौकटीत राहूनही चांगलं काम करता येतं हे आशा वाघ यांनी दाखवून दिलं आहे.
– राजेश राऊत, बीड