आदिवासी कलासंस्कृतीचे रंग -सातपुड्यातली होळी
सातपुडा पर्वतरांगांमध्ये दोन वर्षांनंतर होलिकाउत्सवात रंग भरत असून रोजगारानिमित्त बाहेरगावी असलेले आदिवासी यंदा मोठ्या संख्येनं गावपाड्याकडे आले आहेत. ढोल, बासरी, घुंगरू ,बिरीचा आवाज आता सातपुड्याच्या कुशीत गुंजू लागला आहे.
सातपुडा.. दक्षिण गुजरात ते महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगपर्यंत सुमारे ७५,००० चौ. किमी क्षेत्रावर पसरलेल्या पर्वतरांगा. या पर्वतरांगांमधल्या तापी खोऱ्यात वसलेला गुजरात व मध्य प्रदेशच्या सीमेलगतचा आमचा नंदुरबार जिल्हा. उत्तरेला नर्मदा.  आदिवासी बहुल आणि निसर्गाच्या वैविध्यानं परिपूर्ण. 

इथली होळी आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारी. १५ दिवस आधीपासूनच या सणाचे वेध लागतात. सुरुवात ‘नवाई ‘ पूजनाने. शेतातल्या नव्या धान्याचं पूजन यात करतात. मग ‘इंदल’चा सण. थोडक्यात सांगायचं तर मानवी जीवनाशी निगडित सजीव-न निर्जीव वस्तूंप्रतीही कृतज्ञतेचा हा सण. सुखशांती नांदावी ही यामागची भावना.  पावा, बासरी व घुंगरूंच्या निनादात हे दोन्ही सण साजरे होतात. 

इंदलनंतर होळीच्या दांड्याची निवड केली जाते. त्याला “दांडा” पूजन म्हणतात. सातपुड्याचा घनदाट अरण्यातून हा दांडा होळीसाठी निवडतात.  त्यानंतर प्रत्येक गावपाड्यात भरणाऱ्या आठवडे बाजारात पहिला बाजार “गुलाल्या” बाजार म्हणून साजरा केला जातो. या बाजारात गुलाल टाकून  उत्सवाचे आमंत्रण दिले जाते. या बाजारात अनेक आदिवासी युवकयुवती आपली लग्नही ठरवतात,बरं !

दुसरा आठवडा बाजार हा “भोंगऱ्या बाजार”. यात  होलिका पूजनासाठी साहित्य खरेदी करतात.   बांबूपासून तयार केलेली नवीन टोपली, हरभऱ्याच्या डाळ्या, गूळ, साखरेचं  हरकंगन, ओढणी, नारळ, नवीन कपडे व घरासाठी लागणाऱ्या इतर सामग्री खरेदी  केली जाते.  जिल्ह्यात सर्वात मोठा भोंगर्‍या बाजार धडगाव व फलई इथं भरतो.  त्यासोबतच जिल्ह्याच्या सीमेलगत नर्मदेजवळ वालपूर(मध्यप्रदेश) इथला भोंगर्‍या बाजार प्रसिद्ध आहे.  या बाजाराला महाराष्ट्र, मध्यप्रदेश, व राजस्थानमधले  अडीच ते तीन लाख लोक येतात.

त्यानंतर  राजा फांटा, देवगोई माता व देवमोगरा मातेचं  मंदिर असलेल्या डाब (ता. अक्कलकुवा) इथं सातपुडा पर्वतरांगेतली पहिली होळी प्रज्वलित केली जाते. त्यानंतर काठी(ता.अक्कलकुवा ) इथं  काठी संस्थानाची राजवाडी होळी,जी आज रात्री होईल.  शासकीय प्रतिनिधीही या होळीला येतात.  घुंगरू, टोप, ढोलकी, मोठा ढोल, मोरपिसांची बासरी, शस्त्र असा पारंपरिक साज परिधान केलेले  आदिवासी रात्रभर  एकाच तालावर ढोल, बिरी, पावा, घुंगरुच्या  सुमधुर आवाजात तालबद्ध पद्धतीने होळीच्या चुहूबाजूंनी गिरक्या मारत नृत्य सादर करतात.  हे नृत्य मंत्रमुग्ध करणारे.  साऱ्या वाद्यांचा आवाज  संपूर्ण शरीरात ऊर्जेची  कंपनं  तयार करणारा.  ढोल, जुलै ते सप्टेंबर या  तीन महिन्यात सातपुड्यातील एका विशिष्ठ प्रकाराच्या लाकडापासून घरीच तयार करण्यात येतो.  त्याचं  वजन साधारणतः ६० ते १०० किलो. या  ढोलाचा सुमधुर आवाज सातपुड्यातील पर्वतरांगेत अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू येतो हे विशेष.

याप्रकारे जिल्ह्याभरात टप्प्याटप्प्याने होलिका प्रज्वलित केली जाते, कारण इतर गावातल्या होळीला जाता यावं ! हा उत्सव पाहण्यासाठी आता परदेशी पर्यटकही येतात.  रंगपंचमीनंतर उत्सव समाप्त होतो.   सातपुडा पर्वतरांगेतील सर्व बांधव उत्सवाच्या आठवणी घेऊन परतीच्या प्रवासाला लागतात…

-रुपेश जाधव, नंदुरबार 

Leave a Reply