आधी झेंडा दर्ग्यावर, मग गुढी घरोघरी

सामाजिक सलोख्याचं उत्तम उदाहरण म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातलं मेंढा गावं. लोकसंख्या ३५००. निजामोद्दीन अवलिया यांचा दर्गा आणि विठ्ठल मंदिर हे गावाचं दैवत. दोन्ही धर्मातील भाविक दर्ग्यापुढे नतमस्तक होतात. ऊरुसानंतर येणारा पाडव्याचा सण म्हणजे दोन्ही धर्मासाठी आनंदाची पर्वणी. गुढी उभारण्यापूर्वी गावातील विठ्ठल मंदिरातून झेंड्याची वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. त्यापूर्वी दर्ग्याला पहाटेपासून पाणी घातले जाते. ऊद चढविला जातो. गावातील प्रत्येक कुटुंबातील नागरिक यात सहभागी होतो. पहाटे सुरु झालेली ही मिरवणूक सकाळी दर्ग्यापर्यंत येते. दर्ग्याच्या बाजूच्या चिंचेच्या झाडावर पांढरा, चंद्रकोर असलेला झेंडा बांधला जातो. हा झेंडा बांधण्याचा मान गावातील मुलाणी यांच्याकडे आहे. यानंतरच गावात घरोघरी गुढी उभारली जाते. गावाने अनेक पिढ्यांपासून ही परंपरा जपली आहे. कच्चीर बेग म्हणतात, ‘दोन्ही धर्मातील नागरिक आनंदाने एकमेकांच्या सणामध्ये भाग घेतात. अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे. गावात कधीही जातीय वाद निर्माण झालेला नाही. आम्ही दोन्ही समाजातील देवतांचा आदर करतो. सगळ्यांनी सामाजिक भान जपले आहे.’ 

गुढी पाडव्याचा सामाजिक गोडवा कायम टिकवण्यासाठी बाहेरगावी राहणारे अनेक चाकरमाने उत्सवाला गावी येतात. गावाने जपलेला हा सामाजिक एकोपा आदर्श आहे. निजामोद्दीन दर्गा आणि विठ्ठल मंदिर या दोन्ही देवतांचा गावकरी आदर करतात. अखंड हरिनाम सप्ताहासाठी प्रत्येक कुटुंब वर्गणी देतं. त्यासाठी कुणाला जबरदस्ती करण्याची गरज पडत नाही. सप्ताहातील सर्व कार्यक्रमाला मुस्लिम मंडळी मदत करतात. ऊरुसासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाकडून माणशी ५० रुपये वर्गणी दिली जाते. ऊरुसातील प्रत्येक कार्यक्रमही एकमेकांना मान देऊनच केले जातात. ‘ऊरुसामध्ये कंदुरीचा मोठा कार्यक्रम केला जातो. शाकाहारी नागरिकांसाठी मुस्लिम समाजातर्फे वरण भाकरीचा कार्यक्रम केला जातो. ऊरुसादरम्यान कुणीही भुकेला राहणार नाही,याची खबरदारी घेतली जाते, असं ग्रामस्थ गौतम कोचेटा यांनी सांगितलं. 
– चंद्रसेन देशमुख.