आपलं मुलं विशेषचं असतं

पनवेलच्या अर्चनाताई माझ्या फेसबुकमैत्रीण. पुढे प्रत्यक्ष भेटीत त्यांच्या पालकत्वाचा हृद्द्य प्रवास मला कळला. पालकांसाठी आपलं मुलं विशेषचं असतं. पण जेव्हा एक नाही, दोन्ही मुलं खरोखरच ‘विशेष – special’ असतील, तर? कर्णबधीर रश्मी आणि तिच्यानंतर अडीच वर्षांनी जन्मलेला ऑटिस्टीक जतिन – या भावंडांचं पालकत्व करणारे त्यांचे आई-बाप अर्चना आणि सुरेश पाटील हेही विशेषच.  लग्नानंतर वर्षभरात रश्मी जन्मली. सर्व आनंदात होते. अर्चनाताईंना तर मुलगीचं हवी होती. रश्मी ५-६ महिन्यांची असताना ती आवाजाला प्रतिसाद देत नाही, हे कळलं. कल्याणच्या तज्ञ डॉक्टरने सबुरीने घ्यायला सांगितलं. पुढे अलियावर जंग संस्थेत तपासण्या करून रश्मीला Hearing Aid दिलं, तेव्हा ती पावणे दोन वर्षांची होती. एक धक्का पचवून तिचं संगोपन सुरू केलं. जतिनच्या वेळेस मनात शंकाचं काहूर होतं. ऑटिझम हा शब्दही ऎकला नव्हता. दुसर्‍या मोठ्या धक्क्यातून सावरण्यापेक्षा ऑटिस्टिक जतीनला सांभाळायचं कसं, हा प्रश्न होता. तेव्हापासून पालक आणि मुलं एकमेकांसाठी, असं झालं. Pathologist अर्चनाताईंना लॅब सुरु करायची होती. परवान्यासाठी अर्ज करण्याच्या चार दिवस आधी जतिनच्या ऑटिझमबद्दल कळलं. त्याच्या संगोपनाला प्राधान्य देणं अटळ होतं. काम आणि मुलं दोन्ही सांभाळण्यासाठी सुरेशनेही आपल्या वकिलीचं कार्यालय घरीच थाटलं. नातेवाईकांना या मुलांची लाज वाटायची. मुलांमध्ये व्यंग आहे म्हणून सासर-माहेरच्यांनी अर्चना-सुरेशना कायमचं दूर लोटलं. आज सर्वदूर रश्मी-जतिनचं कौतुक होत असताना नातेवाईक एखादा फोन करण्याची तसदीदेखील घेत नाहीत. 

अर्चना-सुरेश यांनी एकच ध्यास घेतला – ज्या समाजाने नाकारलं, तिथेच मुलांना स्थान मिळवून देणं. रश्मीचं शिक्षण आग्रीपाड्याच्या Central school for the Deaf इथे सुरु झालं. अर्चनाताईंनी रश्मीसोबत Parent’s Guidance कोर्स केला. घरीच थेरपी देण्यासाठी कोर्सचा उपयोग झाला. रश्मी-जतिनसह अर्चनाताईंचा पनवेल-भायखळा असा दोन-अडीच तासांचा प्रवास व्हायचा. मुलांचे हाल, शाळेतले वाईट अनुभव… सगळ्यावर मात करत रश्मी बारावी झाली. आता पुढचं शिकते आहे. सहाव्या वर्षांपासून भरतनाट्यम् शिकली. सर्व परीक्षा प्राविण्यासह उत्तीर्ण झालेली विशीतली रश्मी आज भरतनाट्यम् शिक्षिका आहे. फोटोग्राफी, पेटिंग, स्केटिंग, पर्यटन या स्वतःच्या आवडी जपत क्राफ्ट जुलरीचा व्यवसाय उत्तमपणे संभाळत आहे जतिनसुद्धा बारावीनंतर पुण्याला Indian Institute of Science Education and Research इथे BS-MS करतो आहे. गणित हा त्याचा आवडीचा विषय. विशेष म्हणजे किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेच्या 2015-16 Persons with Disability (PWD) विभागात जतिन देशात पहिला आणि IIT JEE(Advanced) (PWD) मध्ये सोळावा आला. जतिनला वैज्ञानिक व्हायचं आहे. 

मुलांना आवडीचं शिक्षण घेऊ देणं, आपल्या इच्छा मुलांवर न लादणं, त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा सन्मान करणं याला पाटील दांपत्याने महत्त्व दिलं. अर्चनाताई सांगतात, “निराशेचे क्षण तर आयुष्यात असतातच. पण दोन्ही मुलांनी आम्हाला ‘रश्मी-जतिनचे आई-बाबा’ ही ओळख मिळवून दिली. यात सारं भरून पावलं.” त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडणारा अभिमान, डोळ्यांत दाटलेलं मुलांचं प्रेम, कौतुक खूप काही सांगून जातं.  आपल्या मुलांना समाजाने नाकारणं आणि आज कौतुकाने स्वीकारणं या दोहोतला प्रवास केवढा अवघड होता. पण प्रयत्न, जिद्द आणि चौघांनी एकमेकांना दिलेली साथ यामुळे प्रत्येक प्रसंग त्यांनी निभावून नेला. रश्मी-जतिनमध्ये काही कमी आहे, असं अर्चना-सुरेश यांनी मुलांना कधीच जाणवू दिलं नाही. मुलांना जसंच्या तसं स्वीकारलं. ‘Never give up’ ही वृत्ती त्यांच्या जगण्याची प्रेरणा ठरली. आपल्याच वाट्याला हे का… असा प्रश्नदेखील त्यांनी कधी स्वतःला विचारला नाही. आव्हानं हा आयुष्याचा भाग आहे असं मानणाऱ्या अर्चना-सुरेशचा प्रवास पालकत्वाचा खरोखर आदर्शवत आहे.

-अर्चना आणि सुरेश पाटील


– मेघना धर्मेश, मुंबई