आपले मूल सुखा-समाधानात, आनंदात वाढावे

रवास पालकत्वाचा – चेतन व प्रीती एरंडे आपले मूल सुखा-समाधानात, आनंदात वाढावे, असे सगळ्यांसारखेच आम्हालाही वाटत होते. आम्हाला जे मिळाले नाही, ते आमचा मुलगा स्नेह याला देणे हेच त्याचे सुख असे वाटायचे. महागडी खेळणी, खाऊ आणून लाड तर फटके देऊन ‘संस्कार’ करत होतो.
एक दिवस राजीव तांबे यांच्या टीव्हीवरच्या कार्यक्रमात प्रत्येक मूल वेगळे, त्याची गरज वेगळी, मुलाला बदलण्याच्या खटाटोपापेक्षा पालकांनी स्वतः बदलणं अवश्यक हे ऎकलं आणि आमच्या विचारप्रक्रियेत, संगोपनात मुळापासून बदल झाला. आपले मूल आपल्यापेक्षा वेगळे आहे, त्याचे व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे हे मान्य करत आम्ही बदलायला सुरुवात केली.
स्नेहने आनंदाने शिकावे यासाठी त्याला मातृभाषेतून शिकवायचे ठरवले. मुलांचे कुतूहल, गोष्टी प्रत्यक्ष हाताने करून शिकण्याकडे असलेला कल हे समजले. मग असे शिक्षण देण्यार्याट शाळांचा शोध सुरू झाला. स्नेह दुसरीत जाईपर्यंत चार शाळा बदलून बघितल्या. ‘खर्‍या’ शिक्षणासाठी शाळेच्या चौकटीबाहेर जाऊन विचार करावा लागेल, हे जाणवले. पुन्हा मार्गदर्शन घेतले. उत्तम शिक्षण हवे तर उत्तम गुरु आवश्यक, हे समजले. आणि आईशिवाय मुलाचा चांगला गुरु कोण बनू शकेल, असा विचार करून स्वशिक्षणाचा, होमस्कुलिंगचा निर्णय घेतला.

होमस्कुलिंगची सुरुवात केली आणि शिक्षणाने पुस्तक, घोकंपट्टी आणि परिक्षेच्या जाळ्यातून बाहेर पडून जीवनाला स्पर्श केला. स्नेह फक्त गणित, मराठी, इतिहास असे विषय शिकत नव्हता. तो स्वयंपाक करायला, घर स्वच्छ करायला, दुकानातून वस्तू आणायला, लोकांशी आत्मविश्वासाने बोलायला, प्रत्येक गोष्ट मुळातून समजून घ्यायला लागला. उत्साहाने नवीन मित्र गोळा करू लागला. वयाचे बंधन नसल्यामुळे त्याला सर्व क्षेत्रातले, सर्व वयाचे आणि काही भारताबाहेरचेसुद्धा मित्र मिळाले. स्नेह आता दहा वर्षाचा आहे. होमस्कुलिंगसाठी लोक आमचे कौतुक करतात, नावेही ठेवतात. आम्ही समविचारी पालकांच्या संपर्कात राहून ‘सर्जनशील पालक’च्या माध्यमातून विचारांची देव-घेव करतो. फेसबुकवर Surekha MondkarFaruk S. Kazi, Bhausaheb Chaskar, Shivaji ManeVasant KalpandeEknath AvhadVeena RaoteVeena GavankarManjusha JadhavManjusha Inamdar Jadhav वगैरेंच्या संपर्कात राहिल्यामुळे नवीन उर्जा मिळते.
स्नेहकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, त्यावेळी त्याचे काय चुकले याऎवजी आमचे काय चुकले याचा विचार करतो. आणि आम्हाला उत्तर मिळते! त्याने टीव्ही, मोबाईलवर जास्त वेळ घालवू नये, असे वाटत होते. पण मग त्या वेळात त्याने करायचे काय, हे समजत नव्हते. मग आम्ही राजीव तांबेंचे गंमतशाळा, arvindguptatoys.com व युटूबच्या मदतीने अनेक उपक्रम शोधून काढले. मागच्या दोन महिन्यांपासून आम्ही तिघांनी मिळून टीव्ही बंद करण्याचा निर्णय घेतला. तर मोबाईल वापरताना वस्वयंशिस्त आणण्यासाठी तिघांनी मिळून नियम बनवले. लिहायला कंटाळणारा स्नेह आता लेख, गोष्टी लिहितो. बोलायला घाबरणारा स्नेह शाळेत जाऊन मुलांसाठी कार्यक्रम घेतो. ऑफिस आणि घर एवढेच विश्व असलेला त्याचा बाबा मी आणि घरात अडकून राहिलेली त्याची आई होमस्कुलिंगच्या निमित्ताने जगाशी जोडले गेलो आहोत.
यशस्वी होण्याचे परिमाण जर आनंद असेल तर आमच्या होमस्कुलिंगचा प्रवास यशस्वीपणे सुरु आहे.
chetanerande@gmail.com

-हेमंत कर्णिक.