आपल्या आजूबाजूच्या राजवीर, हिंदवीला लवकरात लवकर आईबाबांच्या मिठीत शिरता यावं..

 

”मम्मा वाढदिवसाला ये .. लांबूनच हॅपी बर्थडे म्हण आणि परत जा .. पण तू ये.” राजवीर सांगत होता. त्याचा वाढदिवस होता.
त्याचं बोलणं ऐकून आईचे डोळे पाणावले पण फोनवरून शुभेच्छा देण्यापलीकडे ती काहीच करू शकत नव्हती. राजवीर ४ वर्षांचा. त्याची आई अमृता राऊत. अमृता बीड जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना कक्षात परिचारिका. खबरदारी म्हणून त्या कुटुंबापासून वेगळ्या राहत आहेत. राजवीरचे वडील जामखेडमध्ये डॉक्टर आहेत. त्यामुळे राजवीर सध्या मामा आणि आजीआजोबांसोबत राहतोय.


हिंदवी दीड वर्षांची. खेळताना पडली. हात फ्रॅक्चर झाला. प्लॅस्टर काढलं असलं तरी रडते. तिच्यासोबत दिवसभर आजी असते. हिंदवीची आई मीना तुपे. त्या बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक. बाबा औरंगाबादला कर निरीक्षक. मीना यांची ड्युटी सकाळी ६ ते रात्री १०. कधीकधी त्याहीपेक्षा उशीर. मीना कायद्याची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या. त्या ड्युटीसाठी निघतात तेव्हा हिंदवी झोपेत. रात्री घरी पोहोचतात तेव्हाही ती झोपलेलीच. त्यामुळे मीना दुपारी जेवायला घरी येतात. आईच्या स्कुटीचा आवाज आला की हिंदवी धावत येते. तिला आईला बिलगायचं असतं. पण आईला तिला लगेच जवळ घेता येत नाही. आई आंघोळ करून निर्जंतुक होऊन जवळ घेत नाही तोपर्यंत हिंदवीचं रडणं काही थांबत नाही.
अमृता, मीना यांच्यासारखे आईबाबा आपल्यासाठी, समाजासाठी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. आईबाबांची अत्यंतिक गरज असण्याच्या वयात त्यांची लेकरं त्यांचा विरह सहन करताहेत. त्यांचा विरह संपावा, या आईवडिलांना लेकरांना निःशंकपणे जवळ घेता यावं, यासाठी आपण त्यांच्या आजूबाजूचे त्यांना नक्की मदत करू शकतो. कशी तर.. गर्दी टाळून..
-अमोल मुळे,बीड

Leave a Reply