“सहजच फेरफटका म्हणून शाळेतल्या एक दोन मुलांच्या घरी गेलो. त्यांच्या वह्या पाहिल्या. तेव्हा अक्षर, त्यातील चुका, आशय पाहिल्यावर मुलांना हे ऑनलाईन शिक्षण झेपत नसल्याचं लक्षात आलं. तर काही पालक मुलांपर्यंत हा अभ्यास पोहचू देत नाही हेही लक्षात आले. मुलांपर्यंत शिक्षण पोचायला हवं म्हणून मग मी विचार सुरु केला. आणि मला ‘आमची शाळा, आमचा अभ्यास’ हा उपक्रम सुचला,” सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळे माध्यमिक विद्याालयाचे मुख्याध्यापक साहेबराव कुटे बोलत होते.
करोनाच्या साथीमुळे आपण ‘ऑनलाईन’ शिक्षणाचा पर्याय स्वीकारला असला तरी त्यामुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरी भागात ज्या पालकांना शक्य आहे ते वेगवेगळी साधनसामुग्री विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहेत. ग्रामीण भागात मात्र मुलं या सगळ्यापासून दूर आहेत. इथं मोबाईलला रेंज नाही, काही ठिकाणी तर मोबाईलच नाही इथूनच अडथळ्यांना सुरूवात होते. ऑनलाईन अभ्यास आलाच तर तो कितपत समजतो हा ही प्रश्नच आहे. त्यातही पालक ऑनलाईन आलेला अभ्यास मुलांना देतातच असं नाही अशा काही तक्रारी समोर आल्या. शासनाच्या नियमाप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू होते पण अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. सर सांगतात, ऑनलाईन शिक्षणाला पाचवी ते दहावीतील २६५ विद्यार्थ्यांपैकी केवळ ५० टक्के विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. उर्वरीत विद्यार्थ्यांचे काय? हा प्रश्न सतावत होता. काही विद्याार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांनी केलेला अभ्यास चाळताना अक्षरे, काय लिहीले, विषय काय याचा कुठलाच अंदाज येत नव्हता. दुसरीकडे, शिक्षकांनाही घरी बसून मिळणाऱ्या रिकाम्या वेळाचं काय करायचं हा होता. हे सगळं पाहून, मला ‘आमची शाळा, आमचा अभ्यास’ उपक्रम सुचला. यामध्ये ऑनलाईन शिक्षण सुरूच आहे. मात्र ऑनलाईन पध्दतीने दिलेला अभ्यास विद्याार्थ्यांना कितपत समजला त्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देत आहेत.
कुटे व त्यांचे सहकारी राजाराम आव्हाड, जितेंद्र पाटील, देवीदास गर्जे, आर. के. शेळके, व्ही. एच. शेळके, कल्पना रासने, संगीता गिते, किशोर सरवार, रवी गीते, तानाजी मेंगाळ, राजू कर्डक हे कामाला लागले. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास दिल्यानंतर दोन दिवसांनी विषयानुसार शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जातात. त्यांना त्या विषयातील काय समजलं नाही हे विचारतात, वह्या तपासल्या जातात, अडचणी समजून घेतल्या जातात. यामुळे पालकांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे. आपल्यावर कुणाचातरी अंकुश आहे, लक्ष आहे हे त्यांच्या लक्षात आलं असून पालकांकडून शिक्षकांना तुम्ही कधी येणार अशी विचारणा होत आहे. दुसरीकडे, आदिवासी कुटुंबातील काही विद्यार्थ्यांकडे तर मोबईलही नाहीत. त्या मुलांना गावात एका ठिकाणी बोलवलं जातं आणि त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला जातो. यामुळे अभ्यासापासून, शिक्षणापासून कोणीही वंचित नाही याची काळजी घेत आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तर मुलांना थेट शाळेत पाचच्या समुहाने आणत त्यांना प्रयोग प्रत्यक्ष करून दाखविण्यात येणार आहेत. सध्या अभ्यासासोबत अवांतर वाचनाची पुस्तकं मुलांच्या हाती देत असल्याचं कुटे यांनी सांगितलं.
– प्राची उन्मेष, नाशिक