महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी
जिल्हा उस्मानाबाद (महसूल विभाग औरंगाबाद) माविनि ०.६४९ मानवविकास स्थिती: अल्प
तक्ता १
आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या. माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८) त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.
क्र | आमदाराचे नाव /पक्ष / मतदारसंघ | एकूण प्रश्न | आरोग्य | शिक्षण | पाणी | शेती | बेरोजगारी | बालक | महिला | उपस्थितीची सरासरी % | |
१ | राहुल मोटे / राकॉ / परांडा | २५ | ० | ० | ३ | ६ | १ | १ | ० | ९३ | |
२ | राणा पाटील / राकॉ / उस्मानाबाद शहर | २२ | २ | १ | १ | २ | १ | २ | ० | ८२ | |
३ | ज्ञानराज चौघुले/शिवसेना/उमरगा | १८ | ० | ० | ० | २ | ० | ० | ० | ९२ | |
४ | मधुकरराव चव्हाण कॉ /तुळजापूर | १६ | ० | ० | १ | ० | ० | २ | ० | ८८ | |
उस्मानाबाद जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न | ८१ | २ | १ | ५ | ११ | २ | ५ | ० |
निरिक्षणे
- जिल्ह्यातून एकूण ८१ प्रश्न विचारले गेले. आमदार राहुल मोटे यांनी सर्वाधिक २५ प्रश्न विचारले. अभ्यासविषयांपैकी पाणी आणि शेती या विषयांसंबंधी प्रत्येकी ३ आणि ६ असे सर्वाधिक प्रश्नही त्यांनीच विचारले.
- धोरणविषयक एकमेव प्रश्न आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी उपस्थित केला. संजय गांधी निराधार अनुदान योजनेत लाभार्थ्यांसाठी असलेली २१ हजार रुपयांची उत्पनाची अट ४० हजार रुपये करण्याबात शासनाने कार्यवाही करावी, अशी ही लक्षवेधी सूचना आहे.
- पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा स्पष्ट उल्लेख आमदार मधुकर चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या एका तारांकित प्रश्नात आहे. अन्य पाणीविषयक प्रश्न पाझरतलावदुरुस्ती, कृष्णा खोर्यातून पाणी जिल्ह्यालामिळण्याबाबत आहेत.
- महिला या विषयावर एकही प्रश्न विचारला गेला नाही. घोटाळे – गैरव्यवहारासंबंधी एकूण १४ प्रश्न विचारले गेले. यात, मधुकरराव चव्हाण यांनी सर्वाधिक ६ प्रश्न उपस्थित केले आहेत. जिल्ह्यातून मुंबईविषयीचे ४ प्रश्न मांडले आहेत.
- वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: मनरेगाची कामे बंद, सिंचनप्रकल्पांसाठी निधीतरतूद, शेतकर्यांचे प्रलंबित अनुदान, रस्ते-पूल दुरुस्त्या, सहकारी पतसंस्था, दूध / खरेदी-विक्री सोसायट्या यांच्याकडून फसवणूक वगैरे.
- सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे आमदार राहुल मोटे.
तक्ता २
आमदारांची मतदारसंघातील कामगिरी
(संपर्क जिल्हा प्रतिनिधीची निरीक्षणे व त्याने जाणून घेतलेल्या नागरिकांच्या मतांवर आधारित)
क्र | आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ | भेटीसाठी सर्वसामान्यांना सुलभ प्रवेश | जिल्ह्यातील संकटप्रसंगी मदतीला धावणे | गेल्या ५ वर्षांत केलेले नाव घेण्याजोगे लोकहिताचे काम |
१ | राहुल मोटे / राकॉ / परांडा | हो | हो | विशेष असे नाही |
२ | राणा पाटील / राकॉ / उस्मानाबाद शहर | हो | हो | दोन कारखाने सुरु करून रोजगार/शेतकऱ्यांना पर्याय दिला. जिल्हा परिषदेतर्फे पोषणआहार, सुलभ प्रसूतीसाठी आशांना विशेष निधी, स्त्रीआरोग्याच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी. विद्यार्थ्यांना गणवेशवाटप हा पथदर्शी उपक्रम राबवला. |
३ | ज्ञानराज चौघुले/शिवसेना/उमरगा | हो | हो | विशेष असे नाही |
४ | मधुकरराव चव्हाण कॉ /तुळजापूर | हो | हो | विशेष असे नाही |
निरिक्षणे
उस्मानाबाद जिल्हा हा सातत्याने अवर्षणग्रस्त आहे. शेतकरी आत्महत्यांसाठीही जिल्हा चर्चेत असतो. इथे सिंचनप्रकल्प, जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात होण्याची आवश्यकता आहे. रोजगाराचा प्रश्नही जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा. प्रत्येक ठिकाणी एमआयडीसी व इतर उद्योगधंदे उभारून यावर पर्याय शोधणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील गाभ्याच्या सामाजिक समस्या (सरकारी माहितीअनुसार)
गरोदर मातांची अपुरी प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात काळजी, लोहगोळ्या सेवनाचे अल्प प्रमाण, ग्रामीण भागात पोलिओ लसीकरण अपूर्ण, ग्रामीण भागात जन्मावेळी अल्प वजन, महिला, पुरुष व बालके यांच्यात ॲनिमियाचे मोठे प्रमाण, ‘आशा’ असलेल्या गावांची अल्प संख्या; IHHLयुक्त घरांचे अल्प प्रमाण, मुलींचा शाळाप्रवेश कमी प्रमाणात, स्त्रीशिक्षकांची अनुपलब्धता, नव्या प्रा शाळा स्थापित न होणे, बालविवाह.