आम्हांला एकमेकींचा आणि कुटुंबाचा आधार.

धारावीतले रुग्ण वाढायला लागले तेव्हा, काम करताना माझ्याबरोबरच्या दोघींना कोरोनाची लागण झाली. भीतीने मी पाच दिवस कामावरच गेले नाही. माझ्या नवर्‍याने मला धीर दिला. “एवढ्या मोठ्या पोलिओ निर्मूलनाच्या कामात होतीस आणि आता का मागे हटतेस? मी तुझ्यासोबत आहे”. त्यांच्या शब्दांमुळं मला हिंमत आली. मी परत कामाला जायला सुरू केलं. नवरा, मुलगा, दीर-जाऊ असं आमचं एकत्र कुटुंब. कामावर निघायच्या आधी मी माझ्या वाटणीचं घरकाम पटकन आवरून निघते. कामावरून आल्यावर माझे पती दारातचं सॅनिटायझर ठेवतात. आंघोळीला गरम पाणी देतात. माझे स्वच्छ कपडे तयार ठेवतात. गरम जेवण वाढतात. आजही यात खंड नाही.
मी इथे धारावीतच राहते. गेली 25 वर्ष आशा (Accredited Social Health Activist – ASHA) वर्कर म्हणून काम करतेय. धारावीत कामाच्या सोयीसाठी पाच विभाग करण्यात आले आहेत. त्यातला शास्त्रीनगर 1 नंबर पोस्ट हा माझा विभाग. या विभागात आम्ही 17 आशा वर्कर्स आहोत. विभागातल्या साडेबारा हजार लोकसंख्येला कव्हर करायचं असतं. मुळात पोलिओ निर्मूलनाच्या कामाकरता आमची नेमणूक झाली. मुलांचं लसीकरण, गर्भवतींची माहिती, क्षयरोगी, त्यांचे उपचार, साथीचे आजार या सर्वांच्या नोंदी घेण्याचं आणि उपचारांकरता मदत करण्याचं काम आम्ही करतो.
मला मार्चमध्येच कोविडचा पहिला रुग्ण मिळाला. तो 70 वर्षाचा लकवा झालेला इसम होता. दुर्दैवानं त्याचं निधन झालं. त्यावेळी खूपच अस्वस्थ वाटलं. मार्चमध्येच कोरोनाच्या कामात आम्हाला रोज दोनशे-तिनशे घरांना भेटी द्याव्या लागायच्या. पन्नास वर्षावरील व्यक्तिंना मधुमेह, ह्रदयरोग, बीपी, दमा याचा त्रास आहे का? कोणाला ताप, सर्दी-खोकला झाला आहे का? ही माहिती घ्यायचो. पहिले 25 दिवस पीपीई किटशिवाय आम्ही काम केलं. कारण पीपीई किटचा पुरवठाच नव्हता. मास्क आणि ओढणीनं नाक-तोंड बांधायचो, हातात ग्लोव्हज. आम्हांला पाहून कित्येकदा लोक आमच्यावरच ओरडायचे. “यहाँ क्यों आए? किसीको बुखार नहीं. हमको क्यों तकलीफ देते हो”? असं म्हणत माहितीच द्यायचे नाहीत. काही महिला खूप बडबडायच्या. लोकं दारं बंद करायचे. आम्ही 15-20 मिनिटं एकेका घराबाहेर थांबून, लोकांना समजवायचो. हे सर्व तुमच्या भल्यासाठीच सुरू आहे. त्यांच्याशी शक्य तितक्या शांतपणे गोड बोलून, त्यांच्याच भाषेत संवाद साधायचो. विनंत्या करायचो, मागे नाही हटायचो. काही जणांनी तर पैशासाठी आम्ही हे करत असल्याचे आरोपही केले. आम्ही सांगायचो, “बायोंनो आम्हांला पगार मिळतो आमच्या कामाचा, तुम्ही सुखरूप राहायला हवं, म्हणून आमचा जीव धोक्यात घालून येतोय”. खूप कमी लोकांना या चौकशीचं गांभीर्य कळायचं. ते चटकन माहिती देत आम्हांला सहकार्य करायचे.


या चौकशीदरम्यान तापाचे रुग्ण सापडत होते, त्यांची माहिती आम्ही मुख्य ऑफिसला द्यायचो. या रुग्णांना क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केलं जायचं. सुरूवातीला तिथे पुरेशा सोयी नव्हत्या. काही महिला आम्हांला फोन करून त्यावरूनही ओरडायच्या. “कुठे आणून टाकलंत आम्हांला?” आम्ही त्यांना शांतपणे समजावायचो. आमच्या सिनियर नर्स मॅडम त्यांच्याशी बोलायच्या. एकतर या रोगाबद्दल नीट माहिती नसल्यामुळं गोंधळाचं वातावरण. त्यात लोकांची अशी वागणूक. मनात विचारांचं काहूर. पण आम्हांला आमच्यावरच्या जबाबदारीची पूर्ण जाणीव होती. घरच्यांच्या पाठिंब्यामुळे दिवस रेटत होतो. प्रत्येक राऊंडला आम्ही दोन-दोन आशा वर्कर्स सोबत असायचो. सकाळी नऊ ते दुपारी दोन आमची ड्युटी. एकीने माहिती विचारायची, दुसरीने लिहून घ्यायची. मार्चअखेरीस, मुकुंदनगरमधील अंबादेवी आणि शक्तीचाळ इथून मोठ्या प्रमाणात कोविडरुग्ण यायला सुरूवात झाली. आम्हांला वरिष्ठ सांगतील त्यानुसार कोणत्याही विभागात राऊंडला जावं लागायचं. अजूनही आमचं काम याच पद्धतीनं सुरू आहे.
एप्रिलमध्ये एका दिवसाला शंभर ते पाचशे असे रुग्ण मिळत होते. रुग्ण मिळण्याचं प्रमाण एवढं जास्त झाल्याने काही आशा वर्कर्सना रात्रपाळीही कारावी लागली. इथले महिला-पुरूष कामावर किंवा कुठे बाहेर गेल्यामुळं तपासणीतून सुटायला नको, म्हणून कसून काम करत होतो. मी रात्रपाळी केली नाही. पण माझ्याबरोबरच्या चारजणींनी केली. आम्ही काम संपवून पोस्टवर यायचो तेव्हा, असा दिवस नको अनुभवायला, असं वाटायचं मार्च-एप्रिल आणि आताही तणावात लोकांना सामोरं जाताना आम्हांला एकमेकींचा आधार असतो. आम्हीच एकमेकींना प्रोत्साहन देत असतो.
एप्रिलमध्ये डॉक्टरांच्या टीमसोबत आम्ही फिरू लागलो. त्यावेळी आम्हांला पीपीई किटही मिळाले. या रोगाबद्दल आणखी माहिती मिळू लागली. सगळे गल्ली-बोळ आम्ही परत परत पालथे घालू लागलो. लोकांना काय काळजी घ्यायची, याचीही माहिती सांगू लागलो. घाबरू नका असं सांगू लागलो. आता लोक गंभीर झाले होते, डॉक्टरांना प्रतिसाद देऊ लागले होते.
आमचं घर चाळीत आहे. एप्रिलमध्ये मी कामावरून परत येताना शेजारचे लोक माझ्याकडे बघत कुजबुजायचे, “ही व्हायरस घेऊन येते”. काहींनी तर थेटच विचारलं “काय गरज आहे कामाला जायची? आम्हाला तुझ्यामुळं त्रास होणार”. मी त्यांना शांतपणे उत्तर द्यायचे, “तुमच्या सर्वांच्या आरोग्यासाठीच मी कामावर जातेय”. मला मनातून खूप वाईट वाटायचं. पण माझ्या घरातले मला पाठिंबा देत होते. सुरूवातीला दीर-जावेनेही नको म्हटलं होतं. पण माझ्या पतीने त्यांची समजूत काढली.
आम्हांला आधी पाच हजार मानधन मिळायचं. आता नऊ हजार झालंय. मार्चमध्ये कामावर हजर झाल्यापासून आतापर्यंत मी फक्त दोनच दिवस सुट्टी घेतलीय. सध्या लोकांनी अंतर राखावं, मास्क लावावा, गरम पाणी प्यावं, स्वच्छता कशी राखावी याबद्दल आम्ही माहिती देतो. बरे होऊन आलेल्या रुग्णांचा आणि क्वारंटाईन केलेल्या लोकांचाही ट्रॅक रेकॉर्ड ठेवतोय. त्यांना काही त्रास होतोय का? याची माहिती घेतो. पण काही बऱ्या झालेल्या लोकांना ते आवडत नाही. कारण आजूबाजूचे लोक त्यांच्याकडं संशयानं पाहतात. त्यामुळं चौकशीला गेल्यावर हे लोक शिवीगाळ करतात. काही सरकारच्या नावानंही खडे फोडतात. काही दिलं नसल्याची तक्रार करतात. अशावेळी वाईट वाटतं. सरकार मदत करत आहे. आम्ही आशा वर्कर्सही एवढी जोखीम घेऊन कामावर येत आहेत. धारावीतली साथ आटोक्यात आली असली, तरी आमचं काम थांबलेलं नाही. कामावर असताना मी घरचा विचार करत नाही आणि घरी असताना कामाचा विचार करत नाही. आमची कुटुंबं खंबीरपणे आमच्यासोबत असल्यानं आम्ही सर्व आशा वर्कर्स हे काम करू शकतोय.

– कल्पना जगताप,आशा वर्कर
शब्दांकन: साधना तिप्पनाकजे

पुढचा भाग: सामूहिक कामाचा परिणाम