‘आम्हाला पण शिकवा’

व्यवसायाने सॉफ्टवेअर सल्लागार. शिक्षण-नोकरीसाठी परदेशात वास्तव्य झालेलं. शेतीची आवड म्हणून मूळ गावी जाणंयेणं… अशी पार्श्वभूमी असलेल्या अमोद जोशी यांनी ३०-३५ शाळकरी मुलांच्या शिक्षणाचं पालकत्वच घेतलं आहे. त्यांनी सांगितलं, “अधनंमधनं आरजपाडा (तलासरी) इथं काकांकडे जात असतो. तिथं कामाला असणाऱया गावकरयांच्या मुलांची अभ्यासात गती नाही, हे बघितलं. मला गणिताची आवड. म्हणून मुलांना गणित शिकवायला सुरुवात केली. एका वर्षात दीप आणि सूरज दुबे या दोघांनी गणितात इतकी प्रगती केली की गावातली बरीच मुलंमुली ‘आम्हाला पण शिकवा’ म्हणू लागली…” 

बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार, संख्यासराव (३६ – ६३ सारख्या संख्यांमध्ये होणारी गल्लत आदी समस्या टाळण्यासाठी) आणि पाढे हे प्राथमिक शाळेच्या मुलांना शिकवण्यासाठी अमोदनी मोबाइल प्रोग्राम तयार केला आहे. एका मोबाइलवर एका वेळी चार मुलं उदाहरणं सोडवू शकतील अशी व्यवस्था यात केली आहे. खूप उदाहरणं सोडवायला मिळत असल्यामुळे सरावाचा हेतू साध्य होतो. तासाला १०० गणितं हा वेग मुलांनी गाठला आहे. दीप- सूरजच्या शाळांमित्रांचा ओढा जोशींच्या घराकडे वाढला आणि दोन वर्षांत त्यांच्याकडे शिकायला येणार्यांशची संख्या ३५वर गेली. या सगळ्यांना मोबाइल मिळवून देऊन अमोदनी अभ्यासाची व्यवस्था केली. गणित शिकणं आनंदाचं झालं.  पण विद्यार्थ्यांचे इतरही विषय कच्चे. कारण पालक अशिक्षित नि सामाजिक वातावरण मागास. अमोद यांच्या पत्नी तेजस्विनी आफळे शुद्धलेखन, इतिहास, भाषाविषयांचं आकलन वाढवण्यासाठी मुलांची शिकवणी घेऊ लागल्या. त्या व्यवसायानं आर्किऑलॉजिस्ट. अमोद यांच्यासारखंच त्याही महिन्यातले १५ दिवस गावी जाऊन शिकवतात. 

गावात शाळा दोन. जिल्हा परिषदेची शाळा पहिली ते सातवी. आठवी ते बारावीचं शिक्षण ‘बालकल्याण मंदिर’च्या शाळेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकबळ कमी. ४५० विद्यार्थ्यांना ५ शिक्षक हे प्रमाण. त्यामुळे जोशींच्या प्रयत्नांचा शिक्षकांना फायदाच झाला. निस्वार्थी हेतू, इनोव्हेटिव्ह कल्पना यामुळे शाळेनं त्यांच्या सहकार्याचं स्वागतच केलं. मित्रांच्या मदतीनं जुने मोबाइल मिळवून अमोदनी शाळेत ‘मोबाइल लायब्ररी’ सुरू केली. नोव्हेंबर २०१६ पासून सुरू केलेल्या या लायब्ररीला तुफान प्रतिसाद मिळाला. शिक्षकांच्या कमतरतेवर त्यांनी उपाय सुचवला. पहिली ते चौथीच्या मुलांचा संख्यावाचनाचा शिकवणीवर्ग शाळेच्याच वेळात घ्यायचा आणि तिथे वरच्या वर्गातल्या मुलांनी शिकवायचं. सहावी, सातवी, आठवीतल्या मुलांना तयार करण्यात आलं. आपल्या गावासाठी काहीतरी करणं, ही तुमची जबाबदारी आहे, असं त्यांना समजावलं. आज अभ्यासामध्ये गुणवत्ता वाढवण्याचं काम मुलं अतिशय उत्तमरीत्या करत आहेत. 

 अमोद सांगतात, “शाळा सुटल्यावर संध्याकाळी अभ्यासासाठी येतानाही मुलं उत्साही असतात. आणि यात मुली ७० टक्के आहेत. डेडिकेशन, चिकाटी म्हणजे काय, हे मुलींकडून शिकावं.” आता उभयतांनी ‘पालकत्व’ घेतलं म्हटल्यावर मुलांचा अभ्यासाचा कंटाळा घालवणंही आलंच. बसून गणितं करून फार वेळ झाला की सायकलवरून चक्कर मारून येता येतं. वीकएन्डला डोंगरांवर भ्रमंतीचा कार्यक्रम असतो. या वेळी मात्र निसर्गवाचनाची गुरू मुलं असतात!
तलासरी तालुक्यातल्या १५४ शाळांतल्या सर्वच मुलांना प्राथमिक स्तरावरचं गणित आलंच पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न झालेच पाहिजेत, अशी अमोद जोशींची तळमळ आहे. प्राथमिक स्तरावरचं गणित केवळ १७ ते १८ टक्के मुलांनाच जमतं, ही आकडेवारी किती वेदनादायक आहे, असं ते म्हणतात. मुलाला शाळेत घातलं की आपली जबाबदारी संपली, असं पालकांनी करू नये. अशिक्षित पालकही मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देऊ शकतात, असं त्यांचं सांगणं.
‘प्रथम’चं तलासरीमध्ये काम आधीपासून असल्यामुळे गणित क्षमताविकनसनाचं काम या संस्थेच्या साथीनं पुढं न्यायचं, असं आता ठरत आहे. 

प्रवास पालकत्वाचा – अमोद जोशी .
– सुलेखा नलिनी नागेश