“कोरोना व्हायरसच्या संसर्गाची बाधा देशात, राज्यात सुरु झाली. मुंबई, दिल्लीतून आलेले नागरिक रुग्ण नगरला आढळू लागले. कोरोनाची लोकांत प्रचंड दहशत होती. नगरचं जिल्हा रुग्णालय. स्वॅब तपासणी, आणि संशयित व बाधित रुग्णासाठी काम सुरु होतं. तिथं काम करणाऱ्या आम्हां कर्मचाऱ्यांना मात्र सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. आम्ही दोघं पती-पत्नी जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णासाठी काम करणारे. खरं तर आम्ही जीवावर उदार होऊन चार महिन्यापासून काम करतोय. सात-आठ तास पीपीई कीट अंगावर घालून काम करणं म्हणजे सत्त्वपरिक्षाच. मात्र लोकांतून कौतुक होण्याऐवजी आम्हाला त्रास आणि हेळसांड सहन करावी लागली. अगदी गल्लीतून चाललो तर लोकं थेट ‘चालले कोरोना’ म्हणून आमचा उल्लेख करत. आम्ही आलेलो दिसलो की लोक रस्त्यातून बाजूला जायचे. अशी वागणूक मिळाली तरी आम्ही मात्र जनसेवा आणि जबाबदारी म्हणून काम करतो आहोत. सुदैवाने बाधित आणि संशयित रुग्णांसोबत काम करुनही सुरक्षित आहोत. रुग्णसेवा हीच इश्वरसेवा समजून काम सुरुच आहे.” कोरोना रुग्णांच्या वार्डात गेल्या चार महिन्यापासून म्हणून काम करणाऱ्या सोनाली सतीश आहिरे अनुभव सांगत होत्या.
नगर येथील जिल्हा रुग्णालयात सोनाली आहिरे या अनेक वर्षापासून परिचारिका म्हणून काम करतात. त्यांचे पती सतीश आहिरे हेही जिल्हा रुग्णालयाच्या नेत्रविभागात कर्मचारी आहेत. पहिल्या लॉकडाऊन नंतर साधारण आठ दिवसात नगरला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. पुणे, मुंबई येथे रुग्ण संख्या वाढू लागल्याने नगरलाही रुग्ण सापडतील असे गृहीत धरुन जिल्हा रुग्णालयात वार्ड तयार करण्यात आला. रुग्णांचे स्वॅब घेणे, स्वॅब घेतलेल्या संशयित रुग्णांच्या वॉर्डात सोनाली यांची डयुटी लागली. पती सतीशही चार महिन्यापासून तेथेच कार्यरत आहेत.
कोरोना रुग्णांसाठी काम करताना आलेले अनुभव मांडताना सोनाली म्हणाल्या, “आम्हाला दोन वर्षांची मुलगी. लहान मुले, वडीलधाऱ्यांना धोका आहे. आम्ही मात्र बाधित आणि संशयित रुग्णांच्या सतत संपर्कात असल्याने माझ्यासह अन्य सहकारी महिला कर्मचाऱ्यांची सुरवातीच्या काळात एका ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली. मुलगी लहान असल्याने तिला आई-वडीलांकडे सोडले. बरेच दिवस तिची भेट झाली नाही. आई म्हणून तिची भेट घेण्याची इच्छा असून भेट घेता येत नव्हती. संसर्गापासून धोका टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना पीपीई किट घालून काम करावे लागते. एकदा घातलेले किट सात-आठ तास काढता येत नाही. त्यामुळे ते घालण्याआधीच जेवण, इतर बाबी कराव्या लागत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने व प्लास्टीकची किट सलग सात-आठ तास घालून राहावं लागत असल्याने खूप त्रास सोसावा लागला.”
– सूर्यकांत नेटके, नगर