आम्ही चालवू हा पुढे वारसा…

 

 

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुका. इथली वसंतवाडी जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा. जून ते ऑगस्टमधली ही गोष्ट. अनलॉक सुरू झालेलं पण शाळा बंद. या गावातली मुलं मात्र शाळेत येऊ लागलेली. शिक्षक शासनाने नेमलेल्या कोरोना ड्युटीवर. शाळा कशी होणार?

मुलांना शिकवायचं, अभ्यास घ्यायचा तर वेळ देऊ शकणारे लोक हवेत. गावातल्या मोठ्या विद्यार्थ्यांना तेवढा वेळ नव्हता. रोही पिंपळगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या तीन मुली पुढे आल्या. ऋतूजा संभाजी शिंदे, सुजाता आनंदा शिंदे आणि तनुजा बालाजी शिंदे या तिघींनी 3 महिने शिक्षक मित्र म्हणून आघाडी सांभाळली. या तिघीही वसंतवाडी जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थींनी आहेत.

या अनुभवाबद्दल तनुजा म्हणाली, “आम्ही तिघींनी नियोजन केलं होतं. मी मराठी विषय, ऋतुजा परिसर अभ्यास, इंग्रजी तर सुजाता गणित विषय शिकवत होती. या आधीही वर्गात कधी सर नसले की, आम्हीच लक्ष ठेवायचो. त्यामुळे तो अनुभव होता. शिकवताना अडचण आली नाही. सकाळी नऊ वाजता आमच्या शाळेला सुरवात व्हायची. एक तास एका वर्गावर देत होतो. याकाळात मुलांचं वाचन घेतलं. धडा शिकवल्यानंतर त्यांना प्रश्न विचारायचो. मुलंही उत्तरं देत होती. त्यांना समजलं नसेल तर पुन्हा समजावून सांगत होतो.”

ऋतुजा म्हणाली, “आम्ही रोजच्या शिकवणी बरोबरच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या वरील भाषणाची विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेत होतो. ज्या पद्धतीने आम्हाला शिकवता येईल त्या पद्धतीने आम्ही शिकवत होतो. गुणाकार, भागाकार, जोड अक्षर लिहीण्यास सांगत होतो.”

सुजाता म्हणाली, “कोरोना नियमांचे पालन करून वर्ग घेत होतो. सुरक्षित अंतर ठेवून मुलं वर्गात बसत होती. अभ्यास सोबतच त्यांचे खेळही घेतले. घरी आल्यावर आम्ही आमचा अभ्यास करायचो. शाळेचे एम.व्ही. कदम व सहशिक्षक संजय खानसोळे सरांनी आम्हाला नेहमी मार्गदर्शन केलं.”

शरद काटकर, नांदेड

Leave a Reply