आम्ही डॉक्टर्सनी आशा वर्कर्सबरोबर धारावी पिंजून काढली

आज, धारावीत कोविड होऊन बरे झालेले कितीतरी लोक आवर्जून भेटायला येतात. माझ्या तपासणीमुळे, समुपदेशनामुळे जिवंत असल्याचं सांगतात, तेव्हा मला विलक्षण समाधान वाटतं. धारावीत मार्चअखेरीलाच कोरोनाच्या धोक्याची घंटा वाजू लागल्यावर महापालिकेचा मास्टर प्लान तयार होऊ लागला. मुंबई महानगरपालिकेनं धारावीतला एक-एक माणूस तपासता यावा याकरता ‘स्क्रिनिंग टीम्स’ (तपास गट) बनवायचं ठरवलं. या स्क्रिनिंग टीममध्ये धारावीत प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांनाही सहभागी करण्यात आलं. कारण डॉक्टरांचा स्थानिक लोकांशी असणारा परिचय, परिसराची माहिती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांना त्यांच्याबद्दल असणारा विश्वास. या टीममध्ये स्वेच्छेनं सहभागी होण्याकरता पंचावन्न वर्षांपेक्षा कमी वय आणि मधुमेह, बीपीचा विकार नसलेल्या डॉक्टरांना विचारण्यात आलं. सत्तावीस डॉक्टर्स या स्क्रिनिंग टीममध्ये सामील झाले. त्यात मीही होते.

सुरुवातीला धारावीत कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यावर धारावीतल्या बऱ्याचशा डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद केले. त्यातच लॉकडाऊनही सुरू झालं. कोविडचे रुग्ण वाढू लागल्यावर सायन हॉस्पीटलमध्येही जागाच उपलब्ध नव्हत्या. “या परिस्थितीत लहानसहान काही झालं तरी माझे नेहमीचे रुग्ण कुठे जाणार”? हा विचार माझ्या मनात आला. आणि मी मुकुंदनगर आणि 90 फूट रोड या दोन्ही ठिकाणचे माझे दवाखाने सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. दवाखान्याच्या बाहेर दोन फुटाचं अंतर राखून मी रुग्णांना तपासायला सुरू केलं. रुग्णांना होणारा त्रास आणि लक्षणं याची माहिती घेऊन, त्याप्रमाणे औषधं देणं सुरू ठेवलं होतं. याच दरम्यान, स्क्रिनिंग टीममध्ये सहभागी होणार का असं महापालिकेनं विचारल्यावर मी लगेचच तयार झाले.
मुंबई महापालिकेनं प्राथमिक काम केल्यानं काही माहिती हाती आली होती. त्यानुसार मुकुंदनगर, सोशलनगर, कल्याणीनगर, मदिनानगर आणि मोहसीननगर हे पाच भाग रडारवर होते. या भागात कोरोना रुग्णांशी संपर्क, प्रवासाची पार्श्वभूमी या गोष्टी जास्त प्रमाणात होत्या. या पाच भागांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं. माझ्या टीमसोबत आणि आणखी तीन टीम्स धारावीच्या अतिशय आतल्या भागांमध्ये स्क्रिनिंगसाठी सज्ज झाल्या. प्रत्येक टीममध्ये एक डॉक्टर, 2 आशा वर्कर्स आणि महापालिकेचा कर्मचारी असायचे. आशा वर्कर्सना त्यांना नेमून दिलेल्या विभागातली प्रत्येक गल्ली, त्या गल्लीतलं प्रत्येक घर, त्या घरातील टीबीचा पेशंट, मुलांचं लसीकरण किंवा कोणताही आजार असणारी-नसणारी व्यक्ती असं सर्वच काही अगदी सविस्तर माहित असतं. आशा वर्कर्सचा त्यांच्या विभागातल्या लोकांशी रोजचा संपर्क असतो. त्यामुळं आशा वर्कर्सचा या टीममध्ये महत्त्वाचा सहभाग होता. त्या बऱ्याचदा डॉक्टर्सना संशयित रुग्ण कुठं असू शकतो याबद्दल सांगायच्या. आम्ही डॉक्टर्स आणि आशा वर्कर्सची टीम सकाळी नऊ वाजता गल्ल्यांमध्ये शिरायचे. एप्रिलच्या उन्हात संपूर्ण पीपीई किट घालून तपासणी साहित्य, रेकॉर्डस्, नोंदवह्या असं सर्व सामान सोबत घेऊन दुपारी तीनपर्यंत आम्ही लोकांना तपासत असू.. इथल्या अंधाऱ्या गल्ल्या, झोपडपट्ट्यांच्या आतल्या बोळांमध्ये एका वेळी एकच माणूस जाईल इतपतच जागा. इतक्या दाटीवाटीत पीपीई किटमध्ये हा परिसर पिंजून काढणं जिकिरीचं होतं. तरीही या परिसरातल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीला तपासणं भाग होतं. ते आमच्या टीम्सनी केलं.
लोकांची आमच्याशी कित्येक वर्षांची ओळख असल्याचा एक फायदा झाला की, लोकं आमच्यापासून काही लपवत नव्हते. आम्हाला सगळी माहिती सांगत होते. लोकांचं तापमान तपासून, पल्स ऑक्सीमीटरने ऑक्सिजनची पातळी तपासायची. लोकांना श्वास घ्यायला त्रास होतोय का, थकल्यासारखं वाटतंय का? याची चौकशी करायची. लक्षण आहेत का, गेल्या काही दिवसात त्यांचा कोणत्या कोविड रुग्णाशी संपर्क आला आहे का? शहराच्या बाहेर गेले होते का? प्रवास अशी सविस्तर माहिती आमच्या टीम्स प्रत्येक व्यक्तीला विचारत होत्या. या सर्वाची नोंद करत होत्या. ज्या लोकांबद्दल डॉक्टरांच्या टीमला संशय यायचा; त्या व्यक्तीच्या लक्षणांची संपूर्ण माहिती, तापमान, रक्तातली ऑक्सिजनची पातळी, त्याचा पत्ता आणि फोन नंबर लगेचच महापालिकेला दिली जात असे. महापालिकेची स्वॅब नमुना घेणारी टीम प्रत्येक भागात बसलेली असायची. तिथं या संशयित व्यक्तिंना स्वॅब तपासणीकरता पाठवलं जायचं. या व्यक्तींना क्वारंटाईन करायचं की हॉस्पीटलमध्ये दाखल करायचं, हे त्यांच्या लक्षणांच्या तीव्रतेवर अवलंबून असायचं. आम्ही फक्त माहिती नोंदवून घ्यायचं काम करत नव्हतो. लोकांचं समुपदेशनही करत होतो. कोविडचा संसर्ग होऊ नये म्हणून स्वच्छतेची काय काळजी घ्यायला हवी, यासोबतच त्यांचा आहार कसा असावा ही माहिती लोकांना सांगितली जायची. प्रत्येक झोपडपट्ट्यांकरता सार्वजनिक प्रसाधनगृह ठरलेली आहेत. या प्रसाधनगृहामध्ये संशयित रुग्णांकरता प्रसाधनगृह राखीव ठेवण्याचा निर्णय स्थानिक लोकांनी घेतला. यामुळं इतर व्यक्तींना असणारा संसर्गाचा धोका नियंत्रित करता येणं शक्य झालं.

 – डॉ अवनी वाळके
शब्दांकन:साधना तिप्पनाकजे

पुढचा भाग: आम्ही खंबीर आणि पेशंट्स धिराचे