आम्ही माणुसकीचं आरोग्य सुरक्षित ठेवत आहोत

आंध्र प्रदेशातल्या नेल्लोर, विजयवाडा,प्रकाशाम, राजमहेंद्री इथून अनेक जण रोजगार, शिक्षणासाठी यवतमाळमध्ये येतात. भाड्याच्या जागेत ते राहतात.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीनं घरमालकांनी घराबाहेर काढलं. लॉकडाऊनची घोषणा. सर्वत्र भीतीची छाया. सर्वकाही बंद. परिचित कोणी नाही. अन्नपाणी नाही. मग घर खुणावू लागलं. घर ४००-५०० किलोमीटरवर…. २५ विद्यार्थ्राची वाट धरली.

गस्तीवर असलेल्या पोलिसांचं लक्ष गेलं. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवलं. सध्याच्या परिस्थितीत या विद्यार्थांनी प्रवास टाळून आहे तिथेच थांबणं आवश्यक होतं. त्यांची सुरक्षित सोय करण्यासाठी मग प्रशासन पावलं उचलू लागलं.
प्रशासन समाजसेवी संस्थांशी संपर्क साधू लागलं. आर्य वैश्य समाजानं या मुलांच्या राहण्याजेवणाची जबाबदारी उचलली. समाजाच्या समाजभवनात या मुलांची सोय करण्यात आली आहे. संस्थेनं १४ एप्रिलपर्यंत या मुलांचं पालकत्व स्वीकारलं आहे.
”संपूर्ण जगाचं आरोग्य धोक्यात आहे. आम्ही माणुसकीचं आरोग्य सुरक्षित ठेवत आहोत. आणखी कोणाला मदत हवी असेल तर आम्ही तयार आहोत.” आर्य वैश्य समाजाचे सचिव संदीप चिंतलवार सांगतात.

– निखिल परोपटे, यवतमाळ

Leave a Reply