सकाळी आठची वेळ. धुळे जिल्ह्यातील नागाव इथं राहणाऱ्या आशा स्वयंसेविका प्रतिभा ठाकूर यांची घरातली कामं आटोपून घराबाहेर पडण्याची लगबग. सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत आणि दुपारी पुन्हा दोन ते तीन तास गावातील सर्व घरांची कोरोनाबाबत विचारपूस करणे. पुणे, मुंबई, सुरत अश्या मोठ्या शहरातून आलेल्या नागरिकांची माहिती जमा करणे. त्यांना अलगीकरण करण्याचा सल्ला देणे. ज्यांना अलगीकरणात राहायला सांगितलं आहे ते घरीच थांबले आहेत की नाही याची तपासणी करणे. असं अगदी शेवटच्या घटकापर्यंत जाऊन कोरोनाशी लढायचं काम ‘आशा’ स्वयंसेविका करीत आहेत. कुटुंबाची चिंता वाटते, मात्र आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत असल्याचे ‘आशा’ स्वयंसेविका प्रतिभा ठाकूर सांगतात.
प्रतिभा यांच्याप्रमाणे सीमादेखील ‘आशा’ आहेत. त्याही सकाळपासून ग्रामीण भागातील गल्लोगल्ली कोरोनाबाबत जनजागृती निर्माण करण्याचे काम करीत आहेत. घरात पती आणि मुलगा आहेत, घरात पुरेशी जागा आहे, त्यामुळे गावातून सर्वेक्षण करून घरी गेल्यावर वेगळं राहाणं शक्य होतं. वेळ अडचणीची आहे मात्र प्रयत्नांची शर्थ करायची आणि कोरोनापासून बचाव करायचा हे सीमा पाटील ठामपणे सांगतात.
तळागाळात, कोरोनाशी दोन हात करणाऱ्या या आशांना जीव धोक्यात घालून सुरु असलेले हे काम करून किती मानधन मिळेल हे माहीत नाही. तरीही त्या कामात कुठेही हातचं राखत नाहीत. एका ‘आशा’वर एक हजार लोकसंख्येची जबाबदारी आहे. या सर्व लोकांचं आरोग्यरक्षण त्या निष्ठेने पार पाडत आहेत.
एकट्या नागाव आरोग्यकेंद्रात १३ गावांसाठी २६ ‘आशा’ कार्यरत आहेत. २१ मार्च पासून त्या कोरोनाचं काम करत आहेत. बाहेरगावावरून आलेल्या ५०० जणांना त्यांनी शासनाच्या निदर्शनात आणून दिलं असून त्यांच्या आरोग्याची काळजी त्या घेत आहेत. एकाच वेळी बाहेरगावावरून आलेल्यांची नोंद घेणे आणि ज्याची नोंद आहे ते घरातच थांबत आहेत की नाही हे पाहण्याचं दुहेरी काम या आशा पार पाडत आहेत. एकट्या धुळे जिल्ह्यात चौदाशेहून अधिक ‘आशा’ दररोज एकूण एक गाव पालथं घालत आहेत.
अनेक जण या ‘आशा’ स्वयंसेविकांना दिशाभूल करणारी माहिती देतात, मात्र नाउमेद न होता या रणरागिणी गावागावात तळ ठोकून कोरोना विषाणूंचा समूहफैलाव होऊ नये यासाठी जीवावर उदार होऊन काम करीत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील या ‘आशा’ स्वयंसेविकांचा हा कोरोनाविरोधातला लढा अतुलनीय आहे. हजारो ‘आशा’सेविका या शासनाचे डोळे आणि हात बनल्या आहेत. त्यांचे प्रयत्न राज्यातील जनतेला दिलासा देणारे आहेत.