आष्टीत किराणा, भाजीपाला घरपोच पोहोचतो

 

बीड जिल्ह्यातील आष्टी हे तालुक्याचं शहर. या शहरात लॉकडाऊनचं पालन होतंय.
तेही लोकांची कोणतीही गैरसोय न होता. किराणा, भाजीपाला सर्व काही त्यांना घरपोच मिळत आहे.
कोणामुळे? तर ..
सुनील रेडेकर , सचिन रानडे , पिंकू बळे , दुर्गेश कुलकर्णी , अशपाक आतार , प्रीतम बोगावत , बब्बू शेख , प्रमोद बोनदार्डे , तानाजी हंबर्डे , योगेश वांढरे , अय्याज सय्यद , श्रीकांत भोज , रविंद्र तांबे , विजय धोंडे , बाबू ढेंगे , विनय पटधरिया , आदेश निमोणकर , स्वप्नील सातपुते , सीताराम टेकाडे या सर्वांमुळे.


या सगळ्यांचं मिळून छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ आहे. शिवजयंतीसाठी दरवर्षी एकत्र येतायेता मंडळ स्थापन झालं. मंडळात कोणी अध्यक्ष, पदाधिकारी नाहीत. सगळेच कार्यकर्ते.
सध्याच्या परिस्थितीत खरं तर लोकांनी घरातच राहिलं पाहिजे. पण किराणा, भाजीपाला… याची गरज लागतेच. बऱ्याचदा सोशल डिस्टंसिंग आणि इतर नियमांचाही विसर पडतो. त्यावर मित्रमंडळानं मार्ग काढला.
‘सर्वांना घरपोच सामान मिळेल, कोणीही घराबाहेर पडू नये,’ असं आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं. कार्यकर्त्यांचे नंबर देण्यात आले.

आता लोक आपापल्या किराणा दुकानदारांना सामानाची यादी व्हाट्सअप करतात. दुकानदार त्याप्रमाणे सामान पॅक करतात. मग ते कार्यकर्त्यांना कळवतात. त्यानुसार कार्यकर्ते तो किराणा संबंधित ग्राहकाला घरपोच करतो. बिल ऑनलाइन द्यायचे किंवा सामान पोहोच करणाऱ्या कार्यकर्त्याकडे द्यायचे.
हीच पद्धत भाजीपाला विक्रीसाठी अवलंबली जाते. लोकांनी त्यांना पाहिजे त्या भाजीपाल्याची यादी या कार्यकर्त्यांना द्यायची. ते त्याचा एकत्रित आढावा घेऊन परिसरातील शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. ना नफा ना तोटा या तत्वावर लोकांना घरपोच करतात.
मित्रमंडळ शहरातील मनोरुग्ण आणि अत्यंत गरिबांनाही जेवण देत आहे. सुनील रेडेकर यांनी या भोजनाचा खर्च उचलला आहे . तर श्रीकांत भोज आणि सीताराम टेकाडे हे जेवण दोन वेळेला गरजूंपर्यंत पोहोचवत आहेत.
आष्टीकरांनी या युवकांच्या या परिश्रमाचे कौतुक केले आहे.

-राजेश राऊत

Leave a Reply