आहे जोखीम तरीही…

आजच्या (1 जुलै) डॉक्टर्स दिनानिमित्त ही खास पोस्ट

रत्नागिरीचं जिल्हा शासकिय रुग्णालय. इथल्या डॉ. संघमित्रा फुले-गावडे यांची ही गोष्ट. नऊ वर्षांपासून त्या इथं ट्रेनिंग प्रशिक्षक आणि ईएनटी सर्जन म्हणून काम करत आहेत. गेल्या दीड महिन्यात एकही सुट्टी न घेता त्या कामावर हजर आहेत.
डॉ. फुले यांचं काम अत्यंत जोखमीचं. कोणताही संशयित रूग्ण आला की, त्याचे स्वॅब घेण्याचं पहिलं काम डॉ. फुले करतात. आतापर्यंत त्यांनी 800 रूग्णांचे स्वॅब घेतले आहे. स्वॅब घेताना रूग्णाच्या अगदी जवळ थांबून घ्यावे लागते अशावेळी पूर्णपणे खबरदारी घ्यावी लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर ते स्वॅब पुढील चाचणीसाठी पाठवले जातात.
डॉ. संघमित्रा सांगतात, “स्वॅब घेताना सगळेच रूग्ण सहकार्य करतात असं नाही. काही टाळाटाळ करतात. अशा रूग्णाची समजूत काढून स्वॅब घ्यावाच लागतो. सुरूवातीला गुहागर येथील रूग्णामध्ये कोरोनाचं कोणतंही लक्षण नव्हतं. रूग्ण अगदी नॉर्मल होता. त्यावेळी मुबलक पीपीई कीटही उपलब्ध नव्हते. मी फक्त मास्क आणि हॅण्डग्लोव्हज् घातले होते. स्वॅब घेऊन लॅबला पाठवला आणि दुसऱ्याच दिवशी त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. तेव्हा मात्र मी चांगलीच धास्तावले होते. त्यावेळी माझीदेखील टेस्ट केली गेली. सुदैवाने, रिपोर्ट निगेटीव्ह आला. हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की, रूग्ण तपासताना खूप काळजीपूर्वक राहावे लागते.”


डॉ. फुले यांना सहा वर्षांची मुलगी आहे. पण तिला सांभाळण्यासाठी घरी कुणीही नाही. पती महेंद्र गावडे तालुका वैद्यकीय अधिकारी असल्याने बहुतांश वेळ तेही रूग्ण सेवेत असतात. त्या सांगतात, “विदिशाला मी सकाळी 9 वाजता केअरटेकर मावशींच्या घरी सोडते तर रात्री 8 वाजता ती तिथून घरी येते. सकाळी केवळ तासभर आणि रात्रीचे दोन तास तिच्यासोबत घालवता येतात. असे दीड महिन्यातले काही मोजकेच तास आम्ही एकत्र घालवले असतील. तिला आता कोरोना साथीविषयी माहिती असल्याने तीही हट्ट करत नाही हे विशेष. हसतमुखाने मला हॉस्पीटलला जा म्हणून सांगते. तिचा हसरा चेहरा मला जगण्याची उमेद देतो.”
“विदिशा घरी येण्याआधी मला घर स्वच्छ करून घ्यावं लागतं. शिवाय मी हॉस्पीटलमधून फ्रेश होऊन आले तरी घरी आल्यानंतर पुन्हा स्नान करून योग्य ती काळजी घ्यावी लागते. हे सगळं करायला दररोज दोन तास द्यावे लागतात. त्यानंतर विदिशाला घरी बोलावते. पती डॉ. महेंद्र गावडे देखील दररोज अशाच पध्दतीने काळजी घेतात. सध्या दुसरा पर्याय नाही आणि आधी रूग्णांना प्राधान्य देणं महत्त्वाचं असल्याचंही” डॉ.फुले आवर्जून सांगतात.
डॉ. फुले या दिवसभर सिव्हीलमध्ये कार्यरत असतात. तसंच कोणी संशयित रात्री-अपरात्री आला तर पर्यायी डॉक्टर स्वॅब घेतात. दुसऱ्या दिवशी मात्र डॉ.फुले या कान, नाक, घसा तज्ञ असल्याने रूग्णालयात आल्या की संशयित रूग्णांची तपासणी करतात. यातून वेळ काढून नर्सिंग स्टाफ आणि इतर कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण देण्याचं कामही त्या करतात. तसंच इतर आजाराचा अत्यावश्यक रूग्ण आल्यास त्या रूग्णांचा अहवाल पाहून पाठपुरावा सुरू असतो.

– जान्हवी पाटील, रत्नागिरी

 

Leave a Reply