इंग्रजीच नाही तर जपानीमधूनही बोलणारे जि.प. शाळेचे विद्यार्थी!

Konnichiwa, ohayyogejimassu, Gonkidesuka, yoitsuitachi,Ananta mo ne, म्हणजे Hello, How are you? Good day, Good Morning. यासारखे जपानी भाषेतील शब्द रोज कानी पडतात ते ही, जपानमध्ये नव्हे तर नागपुरातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत…! एकीकडे सामान्य विद्यार्थ्यांना इंग्रजीची भीती वाटते, त्यात संभाषण करणं अवघड वाटतं, तिथं या शाळेतले विद्यार्थी मात्र इंग्रजी आणि जपानी भाषेत संभाषण, संवाद, परिपाठ, संख्यावाचन या गोष्टी लीलया करतात.
हे सगळं करणारे विद्यार्थी वयाने मोठे असतील असं मनात आलं का तुमच्या? नाही हो, हे विद्यार्थी अगदी पहिलीपासून ते आठवीपर्यंतचेच आहेत. ही शाळाच वेगळी आहे. कारण एवढंच नाही तर इथले विद्यार्थी शाळेत ‘उन्नती’ नावाची बचत बँक सुद्धा चालवतात, याशिवाय दिवाळीत पणत्या बनवून विकतात. याहूनही विशेष म्हणजे हे विद्यार्थी ‘ग्रेट भेट-एक मुलाखत’ उपक्रमातंर्गत वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेतात, ते सुद्धा इंग्लिशमधून. नुकतीच त्यांनी नागपूरच्या सीईओंची घेतलेली मुलाखत फारच गाजतेय.
आता इतका सस्पेन्स ठेवल्यावर तुम्हांला शाळेचं नाव जाणून घेण्याची उत्सुकता असेलच. या शाळेचं नाव आहे- थुगांव निपाणी जिल्हा परिषद शाळा, ता. नरखेड, जि. नागपूर. या शाळेचं अजून एक वैशिष्टय म्हणजे ही जिल्ह्यातली पहिली शाळा आहे की, जिथं विद्यार्थी स्वकमाईतून घेतलेले ब्लेझर घालून शाळेत येतात. शाळा पहिली ते आठवी असून, पटसंख्या १०० आहे. शाळेची वेळ मात्र इतर शाळांप्रमाणे सकाळी १० ते संध्याकाळी ५ अशी नसून, इथं सकाळी १० ते संध्याकाळी ७.३० अशी शाळा चालते. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर विद्यार्थी शाळेच्या पटांगणात बसून ‘घरचा अभ्यास’ करतात. यासाठी ग्रामपंचायतीने हँलोजन लॅम्प्स लावून दिलाय. मुलांनी शाळेतच थांबून गृहपाठ करण्यास, पालकांची संमती आहे. आणि मजा म्हणजे विद्यार्थी सुद्धा आनंदाने अभ्यास करतात. त्यांना घरी जाण्याची कसलीच घाई नसते, इतकी ही शाळा मुलांना आवडते.
या शाळेतील दोन मुलींची नवोदय विद्यालयाकरिता तर, दोन मुलींची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. या शाळेत अभ्यासात काहीश्या मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘सुपरएट’ नावानं विशेष वर्ग भरवला जातो. ९०० लोकसंख्या असलेल्या या गावातील शाळेची पटसंख्या २०१८ मध्ये ५६ इतकीच होती. परंतु मुख्याध्यापक धनंजय पकडे सर रूजू झाल्यानंतर त्यांनी ही पटसंख्या १०० वर आणली आहे. ते शाळेत नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्याना जिल्हा परिषद शाळेकडे आकर्षित करण्याचे कार्य करीत आहेत. त्यामुळेच बाहेरगावातील आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनीसुद्धा या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतला आहे. शिक्षणाचा, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा वाढता दर्जा आणि शिक्षकांची मेहनत यामुळेच आज ही शाळा पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय ठरतीये.
सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून शैक्षणिक सत्राच्या शेवटी मोफत उन्हाळी बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले जाते. ज्यात दिवसभरात शारीरिक आणि बौद्धिक कौशल्यांसाठी वेगवेगळी सत्रं असतात. ज्यात मार्शल आर्ट, योगासनं, प्राणायाम तसेच कॅलिग्राफी, हस्तकला, नृत्य, नाट्य, रांगोळी, मातीकाम,चित्रकला शिकवली जाते. यामुळे विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना चालना मिळते. शिवाय पटसंख्येत सुद्धा वाढ होताना दिसतेय. मागच्यावेळी बालसंस्कार शिबिरातून तयार केलेल्या वस्तूंची विक्री करून दोन लाख पस्तीस हजार रूपये जमा झाले आहेत. यातून विद्यार्थ्यांकरिता ब्लेझर,शाळेसाठी साऊंड सिस्टीम, शाळेची रंगरंगोटी तसेच इतर पूरक गोष्टींवर खर्च झाला. उरलेल्या पैशांतून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत व्यवहार ज्ञान मिळावं म्हणून पणती विक्रीचा उपक्रम राबविला. यंदा दिवाळीत पणत्यांची विक्री करून यातून मिळालेला काही पैसा मुलांना तर, काही वृद्धाश्रमाला दान दिला.
मुख्याध्यापक पकडे यांनी विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी म्हणून शाळेतच ‘उन्नती बचत बँक’ सुरू केलीये. विद्यार्थी त्यांच्या खाऊचे पैसे यात जमा करतात. या बँकेत सध्या ४१ हजार ५२० रूपये जमा आहेत. या बँकेचा व्यवहार मुख्याध्यापक पकडे यांच्या देखरेखीत विद्यार्थी बघतात. लेजर बुक, स्लिप भरणे, पासबुक भरणे, इतकंच नाही तर त्रैमासिक व्याज आकारणी सुद्धा विद्यार्थी करतात. प्रत्येक विद्यार्थ्याचे या बँकेत स्वतंत्र पासबुक आहे. लॉकडाऊनच्या आर्थिक अडचणीच्या काळात, विद्यार्थ्यांनी आपली ही जमापुंजी पालकांना खर्चायला दिली होती हे विशेष! या विद्यार्थ्यांनी भारतीय सेनेच्या जवानांकरिता स्वत: बनवून राख्याही पाठवल्या आहेत
या शाळेत ‘ग्रेट भेट- एक मुलाखत’ नावाचा उपक्रम सुद्धा राबवला जातो. यात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, तथा प्रशासकीय क्षेत्रातील अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाशी चक्क इंग्रजीतून विद्यार्थी संवाद साधतात. ग्रामीण भागातील सरपंच ते थेट जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्या मुलाखती घेऊन, शाळेतील तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी माध्यमांनाही शाळेची दखल घेण्यास भाग पाडलंय.
या शाळेत पहिलीपासूनचा विद्यार्थीसुद्धा जपानी भाषेतील साधासोपा संवाद साधणं, आणि संख्यावाचन हे सहज करतो. पाचवी पासूनचे विद्यार्थी तर उत्तम जपानीतून बोलू शकतात. आठवड्यातील एक दिवस परिपाठातील संपूर्ण आदेश हे जपानी भाषेतून दिले जातात. शाळेतील विद्यार्थी भविष्यात जर्मन भाषाही अवगत करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
विशेष म्हणजे या शाळेत पहिली ते आठवीसाठी मुख्याध्यापक धनंजय पकडे यांच्या व्यतिरिक्त फक्त निलेश शहाकार आणि संदीप बागडे हे सहकारी शिक्षक आहेत. तरीसुद्धा या शाळेने आपली स्वत:ची ओळख निर्माण करून, इतर शाळांकरिता आदर्श निर्माण केला आहे. आणि हे विद्यार्थ्याच्या मदतीमुळेच शक्य झाल्याचे पकडे सर सांगतात. ‘विषयमित्र’ अभ्यास पध्दतीचा अवलंब करून वरच्या वर्गातील विद्यार्थी, खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा आणि अभ्यासात मागे असलेल्यांचा सहजपणे अभ्यास घेतात.यामुळे त्यांचाही स्वत:चा अभ्यास होतो.
मुलांची प्रगती पाहून आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्तांनी आणि सहाही विभागातील प्रकल्प अधिकाऱ्यांनी मास्टर ट्रेनर म्हणून मुख्याध्यापक पकडे सरांची निवड केलीये. शाळेच्या विकासासाठी गावकऱ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देणाऱ्या या शाळेला आणि शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा.
लेखन- नीता सोनवणे, नागपूर
नवी उमेद कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक: https://naviumed.org/support/

Leave a Reply