इंटरनेट साथी…

“….मुलाला शाळेत काही प्रकल्प सांगितला होता. त्याविषयी मला फारसं माहीत नव्हतं. पण मुलगा म्हणाला, “आई, तुझ्या या मोबाईल आणि टॅबच्या मदतीने हवी ती माहिती सहज मिळेल. भरकन त्याने गुगलवर काही लिहिलं. क्षणात ती माहिती मोबाईलवर उमटली. ती त्यानं वहीत लिहून घेतली आणि निघूनही गेला. मी विचारच करत राहिले… खरंच, याचा असा उपयोग होऊ शकतो? मग सहज म्हणून शेळीपालनाविषयी काही माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर एका क्षणात माहिती हजर. मी पुन्हा एकदा अवाक ! पण त्या यंत्रामुळे माझ्यात आत्मविश्वास आला, मी जगाशी जोडलेली आहे, ही भावना माझ्यात निर्माण झाली….” लासलगांव तालुक्यातल्या खडकेमळा इथल्या पुष्पा शिंदे हिने सांगितलं.  पुष्पाने नुकतंच महिला आर्थिक विकास महामंडळाचं (माविम) ‘इंटरनेट साथी’ प्रशिक्षण पुरं केलं. तिला मोबाईल आणि टॅब मिळाला. ‘ई -गव्हर्नस’चे प्रयत्न करणार्‍या सरकारला या उपक्रमासाठी माविम आणि टाटा सामाजिक संस्था यांचं सहकार्य आहे. ‘इंटरनेट साथी’ उपक्रम राज्यातील २८ जिल्ह्यांतल्या १८३ तालुक्यातल्या ३५,३६८ गावांमध्ये एकाच वेळी सुरू असून हजाराहून अधिक महिलांना टॅब, मोबाईल, ते ठेवण्याचं साहित्य मोफत दिलं जात आहे. महिलांमध्ये ई-साक्षरतेचं प्रमाण वाढवण्यासाठी हे प्रयत्न आहेत.


प्रशिक्षणात टॅब आणि मोबाईल कसं वापरायचं, त्यात सरकारी योजना, महिलांचे अधिकार, आरोग्य, बचतगट, लघु उद्योग, बाजारपेठ अशी आवश्यक माहिती कशी शोधायची ते शिकवलं जातं. यासाठी, मोबाईल आणि टॅब वापरण्यात माहीतगार महिलेला समन्वयक करण्यात येतं.
 उपक्रमातून राज्यातील चार लाखांहून अधिक महिला ई-साक्षर होणार आहेत. नाशिकमधल्या प्रशिक्षणादरम्यान समन्वयक निकीता वानखेडे म्हणाली, “अनपेक्षितपणे हातात आलेल्या मोबाईल आणि टॅबमुळे लोकांचा आमच्याकडे आणि आमचाही आमच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आता कुठल्याही कामासाठी क्षणात माहिती मिळते. अडवणूक, परावलंबित्व कमी झालं. विचारांची देवाण-घेवाण सोपी झाली. व्हॉट्स अप ग्रुपमध्ये आम्ही दिवसभरात काय कामं केली, बचतगटात काम करतांना काय अडचणी आल्या याविषयी बोलतो.” कामाचा वेग आणि गुणवत्ता वाढली असल्याचं निकिताने सांगितलं. – प्राची उन्मेष.