इथे लागले घडू,धनुर्विद्या खेळाडू

धनुर्विद्या हा खेळ महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खेळला जातो. पण सोलापूर जिल्ह्यात मात्र अगदी २००३ पर्यंत तो कुठेच खेळला जात नव्हता. क्रीडा शिक्षक हरिदास रणदिवे यांना या खेळाचे आकर्षण वाटू लागले. हा खेळ या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवला पाहिजे असे त्यांना वाटू लागले. मग माढा तालुक्यातील अरण येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या संत सावता माळी विद्यालय आणि विनायक विद्यालय, वरवड या शाळांमध्ये त्यांनी या खेळाची ओळख करून दिली. 
त्यांनी रणजीतसिंह मोहिते-पाटील यांना या खेळाची कल्पना देऊन संघटनेची स्थापना केली. धैर्यशील मोहिते-पाटील अध्यक्ष, भारत शिंदे उपाध्यक्ष तर रणदिवे यांनी सचिव पदाची जबाबदारी घेऊन या खेळाला पुढे नेण्याचे काम केले. या संघटनेच्या माध्यमातून सुरूवातीला अरण ता. माढा, सोलापूर येथे जिल्हा विभाग व राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा घेऊन या खेळाची प्रसिद्धी करण्यात आली. 

महाराष्ट्रातील निष्णात धनुर्धरांची नेमबाजी पाहून अरणचे खेळाडू असे बनले पाहिजेत असे त्यांनी मनोमन ठरवले. पुणे येथील धनुर्विद्या खेळाडू रणजीत चामले यांच्याकडून त्यांनी इथल्या खेळाडूंना मार्गदर्शन दिले. त्यानंतर मणीपूर इथल्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू ए. एस. मर्सी यांनी सलग तीन वर्षे या खेळाडूंना या खेळाचे प्रशिक्षण दिले. 
सुरूवातीच्या काळात सुप्रिया रणदिवे, अजिंक्य रणदिवे, रेश्मा कोळी या खेळाडूंनी राष्ट्रीय पातळी पर्यंत धडक मारली. याच वेळी २००४ पासून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंना मोफत प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबवण्यात आला. आज सोलापूर जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर दस्तक देत आहेत. अरणच्या खेळाडूंनी सोलापूर विद्यापीठाला पहिले राष्ट्रीय स्तरावरील सुवर्ण पदक मिळवून दिले.
धनुर्विद्या हा खेळ मुले व मुली वैयक्तिक व सांघिक स्वरूपात खेळला जातो. तो खुल्या मैदानात व इनडोअरसुध्दा खेळला जातो. या खेळासाठी धनुष्य व बाण तसेच टारगेट बट्रेस व टारगेट फेस ( face ) ची गरज असते. या खेळात इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड व कंपाऊंड राऊंड अशा प्रकारात ही स्पर्धा खेळली जाते. वेगवेगळ्या प्रकारात २० मीटर पासून ९० मीटर पर्यंत धनुर्धराला नेम धरावा लागतो. अंतरानुसार ३ ते ६ बाण मारावे लागतात. असे ६ किंवा १२ वेळा बाण मारावे लागतात. एका बाणाला दहा गुण असतात. एका अंतरावरून ३० बाण व प्रत्येक ० ते दहा गुण दिले जातात. म्हणजेच एका अंतरावरून ३६० गुणांची स्पर्धा असते. इंडियन राऊंड मध्ये दोन अंतरावर ७२० गुणांची स्पर्धा असते. तसेच कंपाऊड राऊंडमध्ये एकाच अंतरावरून ७२० गुणांची होते. रिकर्व्ह राऊंड मध्ये चार अंतरावरून १४४० गुणांची स्पर्धा होते. सर्वाधिक गुण मिळवणारा विजयी होतो. या विद्यालयांनीं या खेळात राष्ट्रीय स्तरावर शंभरच्या आसपास पारितोषिक मिळवली आहेत.
अॉलंपिक स्पर्धेत पारितोषिक मिळवण्यासाठी इथले खेळाडू कसून सराव करत आहेत. या खेळामुळे एकाग्रता व बुध्दीमत्ता यांचा विकास होतो. राष्ट्रीय स्तरावर या खेळामुळे महाराष्ट्राची ओळख निर्माण झाली आहे. या खेळातील कामगिरीसाठी रमेश शिरसट, हरिदास रणदिवे यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. तर गितांजली शिंदे, दीपक शितोळे, अजिंक्य रणदिवे, समृद्धी रणदिवे, अनुराधा पाटील या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श क्रिडापटू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

गणेश द.पोळ