इम्पॅक्ट संपर्कसेतूचा – फायदा रोहयोचा

 

कोरोनाच्या अवघड काळात अडचणींचा सामना आपण सगळेचजण करत असलो, तरी समाजातील सर्वात दुर्बल घटकांवर त्याचा सर्वाधिक दुष्परिणाम झालाय. याच वंचित घटकांच्या कोविडकालीन समस्यांवर सरकारला उपाय सुचविण्यासाठी गेल्या महिन्यात, 12 आणि 13 जून 20 रोजी ‘संपर्क’ आणि ‘नवी उमेद’ने राज्यातील स्वयंसेवी संस्थांचं ऑनलाईन अधिवेशन आयोजलं – ‘संपर्कसेतू’. विधानपरिषदेच्या माजी उपसभापती आ. डॉ. नीलमताई गोऱ्हे अधिवेशनाच्या अध्यक्षपदी होत्या. महाराष्ट्राच्या सर्व प्रशासकीय विभागातून 192 स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या अधिवेशनाला ऑनलाईन हजर होते.
या अधिवेशनात सर्वाधिक चर्चा झाली ती रोजगार हमी योजनेची. कारण कोरोनामुळे रोजगार गेलेले लोक जास्त अडचणीत आहेत. लॉकडाऊनमुळे यांच्या हातातली कामं सुटली. बचत या लोकांकडे कुठून असणार? सुरूवातीचे दिवस कसेबसे लोकांच्या मदतीवर किंवा घरात असलेलं अन्नधान्य खाऊन काढले आणि मग पावलं आपसूकच वळली, त्यांच्या मूळ गावांकडे.


गावांची अर्थव्यवस्था कृषीप्रधान असली, तरी मुळात शेतकऱ्यांच्याच मालाला उठाव नसल्याने यांच्या हाताला काम कुठून मिळणार? या प्रश्नाचं एक उत्तर म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (रोहयो) आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा). या अत्यंत कसोटीच्या काळात या योजना सक्षमपणे राबवल्या, तर खूपच लाभ देणार्‍या. मात्र, त्यातल्या त्रुटी ताबडतोबीने दूर करणं गरजेचं. हीच सगळी चर्चा संपर्कसेतू अधिवेशनात झाली.
उदा. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कामाची मागणी वाढतेय. शहरातून गावात स्थलांतरित झालेल्यांना जगण्यासाठी काम हवंय. कामाची मजुरी वेळेवर दिली जायला हवी, मागणी केल्यावर 15 दिवसांत काम दिलं गेलं पाहिजे. ग्रामरोजगार सेवक गावात हजर नसणे, मजुरीचा दर अपुरा असणे, प्रशिक्षणाची गरज असे कितीतरी मुद्दे या अधिवेशनात सहभागी झालेल्या प्रमोद झिंजाडे, शुभदा देशमुख, अश्विनी कुलकर्णी रमेश भिसे यांनी मांडले होते. नीलमताईंचं पाठबळ होतंच.
संपर्कने सरकार आणि स्वयंसेवी संस्था यात संवादाचा सेतू बांधत घडवून आणलेली चांगली गोष्ट म्हणजे, अधिवेशनात रोहयोचे मुख्य आयुक्त रंगा नायक उपस्थित होते. त्यांनी सूचनांचा विचार करण्याचं आश्वासन दिलं आणि त्याची पूर्तताही काल दि. 7 जुलै 20 रोजी केली. महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कार्यक्रम समन्वयक यांना एक पत्र काढून संपर्कसेतू अधिवेशनाचा संदर्भ देत काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत. ते पत्र इथे जोडलं आहे.
याही पुढे आणखी एक चांगलं घडलं. आज रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्यासोबत झूम मिटिंग झाली. आम्हा सर्वांचे मुद्दे ऎकून घेत रोहयोच्या कामांना गती देणारे अनेक निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. आणि घेतलेदेखील. तेही सोबत जोडले आहेत.
आम्ही संस्थांनी एकत्र येणं, नीलमताईंनी पुढाकार घेणं आणि शासनाने प्रतिसाद देणं यातून हे घडू शकलं. हा संपर्कसेतू मजबूत राहो.
– स्नेहल बनसोडे- शेलुडकर

Leave a Reply