नागपूर शहरातील श्रावण महिन्याचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे काळी- पिवळी मारबत आणि तान्ह्या पोळ्याची मिरवणूक उत्सव. नागपूर शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा म्हणजे मारबत आणि तान्हा पोळा महोत्सव. देशात फक्त नागपुरातच काळ्या- पिवळ्या मारबतीची मिरवणूक आणि सोबत देशात घडलेल्या भल्या-बुऱ्या घटनांवर भाष्य करणारे ‘बडगे’ही असतात. ‘मारबत’ म्हणजे वाईट रूढी परंपरांचं दहन आणि चांगल्या परंपरा तसेच विचारांचं स्वागत. काळ्या मारबतीला १४१ वर्षांची तर पिवळ्या मारबतीला १३७ वर्षांची परंपरा आहे.
काळी मारबत ही १८८१ सालापासून तर पिवळी मारबत ही १८८५ पासून स्थापन केली जाते. बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी येणारा ‘तान्हा पोळा’ हा त्याही पूर्वीचा म्हणजे १८०६ सालापासून रघूजी राजे द्वितीय यांनी सुरू केलेला उत्सव आहे. हा उत्सव नागपूर शहराच्या पूर्व भागात साजरा केला जातो. तान्ह्या पोळ्याच्या दिवशी काळ्या आणि पिवळ्या मारबतीची मिरवणूक निघते, ती पाहायला लाखोंच्या संख्येने लोक गर्दी करतात.
काळ्या मारबतीचा इतिहास तसा नक्की काय आहे, हे कोणीच सांगू शकत नाही. तरी तिची स्थापना करण्यामागे दोन कारणं होती, असं सांगण्यात येतं. अनिष्ट रूढी- परंपरा,चालीरिती आणि अंधश्रध्दांचा पराभव व्हावा, हा यामागचा उद्देश. तसेच महाभारतकालीन पुतनाचा संदर्भही याला दिला जातो. श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी आलेली पुतनामावशी म्हणजेच ‘काळी मारबत’ समजली जाते. तसंच इंग्रजांशी हातमिळवणी केलेली बांकाबाई, हिचं प्रतिक म्हणूनही या काळ्या मारबतीकडे पाहतात आणि तिचा निषेध करत नंतर तिचे दहन करतात.
तर ‘पिवळी मारबत’ स्थापन करण्यामागेही दोन कारणं सांगण्यात येतात. इंग्रजांना देशातून हाकलून लावण्यासाठी समाज एकत्र करण्यासाठी जसा पुण्यात लोकमान्य टिळकांनी जसा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, तसाच नागपुरात हा पिवळ्या मारबतीचा उत्सव सुरू झाल्याचे सांगितले जाते. त्याकाळी धार्मिक कार्यक्रमांवर इंग्रजांची बंदी नव्हती, धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज संघटन करून इंग्रजांना विरोध केला जायचा. याच संधीचा फायदा घेत नागपुरातील तऱ्हाणे- तेली समाजाच्या काही श्रेष्ठींनी पिवळ्या मारबतीची स्थापना केली. ही पिवळी मारबत म्हणजे लोकांचे रक्षण करणारी, शुभ सुचक समजली जाते. ही समाजातील चांगल्या बदलांचे, नव्या प्रथांचे स्वागत करते.
या मारबतींचे नागपूर शहरात मंदिर आहेत. पिवळ्या मारबतीचे मंदिर हे जवळपास ४० फूट उंच असलेल्या एका हॉलमध्ये आहे. तिथंच ही मारबत तयार केली जाते. या मारबतीची उंची ७० वर्षांपूर्वी ३० फुटांपर्यत होती. कालांतराने तिचा आकार कमी कमी होऊन आता ती १८ फुटांपर्यत आली आहे. या उत्सवाची तयारी अगदी चार महिने आधीपासून केली जाते. साडी तयार करायलाच ३/४ महिने लागतात. १२ फूट पन्ना असलेली, १२ बाय ४० फूट लांबीची आणि ३५ ते ४० किलो वजनाची साडी तयार केली जाते. काठ्या, बांबू, तरट, कापड वापरून या मारबती तयार करतात. काळ्या-पिवळ्या मारबतीजवळ लोक श्रद्धेने नवस करतात. पिवळीला साडी चोळीची ओटी भरून नवस फेडतात.
गोकुळ अष्टमीपासून या मारबतीजवळ विविध कार्यक्रम घेतले जातात. यात जागरण, भजन, पानसुपारी, प्रसादवितरण असे कार्यक्रम घेतले जातात. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तान्ह्या पोळ्याच्या दिवशी मात्र सकाळीच पूजाविधी उरकून सकाळी ९ वाजता मिरवणूक सुरू होते. काळ्या मारबतीला लाकडी फाट्यांवर ठेवून खांद्यावरून तिची मिरवणूक काढतात, तर पिवळ्या मारबतीला लोखंडी चाके असलेल्या गाड्यावर बसवून ओढत तिची मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक नेहरू पुतळा परिसरातील मुख्य रस्त्यावरील मध्यभागी येऊन थांबते.या ठिकाणी काळी मारबत आधीच येऊन थांबलेली असते, पिवळी मारबत येण्याची वाट बघितली जाते.
पण तत्पूर्वी शहरात गेल्या काही वर्षापासून नव्याने स्थापित झालेल्या लाल, भुरी, निळी, शेंदरी अश्या विविध रंगाच्या मारबती आणि विविध सामाजिक, राजकीय आणि चालू घडामोडींवर भाष्य करणारे फलक लावलेले ‘बडगे’ देखील इथं पोहोचतात. हे बडगे म्हणजे वर उल्लेख केलेल्या फितुर बांकाबाईचा नवरा. आणि त्यानेसुदधा इंग्रजांशी हातमिळवणी करण्याच्या कृत्याचा विरोध न करता, उलट तिला साथ दिली म्हणून त्याची बडग्याच्या रूपाने त्यांचीही निषेध म्हणून धिंड काढली जाते.
या इतर मारबती काळ्या मारबतीची गळाभेट घेऊन आणि फेरी घालून तिथून निघतात, तर मुख्य आकर्षण असलेली मानाची पिवळी मारबत येताच मात्र मोठ्या जल्लोषात लोक तिचं स्वागत करतात. काळी मारबत जागेवरून उठून पुढे येते आणि पिवळीची गळाभेट घेऊन जागेवरच ४/५ प्रदक्षिणा घालते. जेव्हा काळी-पिवळीची गळाभेट होताच ‘ईडा, पिडा, रोगराई घेऊन जा गे मारबत’ असं ओरडत आणि महादेवाची स्तुती करत लोक जल्लोष करतात. गळाभेट होताच काळी मारबत लागलीच माघारी परतते. त्यानंतर या दोन्ही मारबतींची विविध भागातून मिरवणूक होते आणि पाच वाजता त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाळलं जातं. काळीला नेहरू पुतळ्यामागे, तर पिवळीला तांडापेठ परिसरात असलेल्या जुन्या लेंडी तलावाजवळील ओट्यावर विधीवत पूजन करून तिचा अंत्यसंस्कार विधी पार पाडला जातो. त्यादिवशी आणि दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्काराचे सगळे सोपस्कार उरकले जातात. दुसऱ्या दिवशी राख विसर्जनाचा कार्यक्रम करून मुंडनही केलं जातं.
नागपूर जिल्ह्यात पोळ्याच्या दिवशी घरोघरी दारात ठेवलेल्या पळसाच्या फांदीचे हळदीकूंकू लावून पूजन केलं जातं, आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्ह्या पोळ्याला पहाटेच या फांद्या घराबाहेर एका चौकात ठेवून जाळल्या जातात आणि जाळताना ‘ईडा- पिडा,घेऊन जा गे मारबत’ म्हणत लगेच माघारी येवून दारातच पायावर पाणी घेऊन आपल्या घरात प्रवेश करतात. याच दिवशी सायंकाळी लहान मुलांचा तान्हा पोळा मिरवणूकही आकर्षक असते. छोट्या लाकडी बैलांसकट मुलं विविध वेशभूषा करून तान्ह्या पोळ्याच्या मिरवणुकीत सहभागी होतात.
लेखन: नीता सोनवणे, नागपूर
नवी उमेद कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक: https://naviumed.org/support/
#नवी_उमेद
#मारबत
#नागपूर
#बडगे
#विदर्भ
#तान्हापोळा