उडदामाजी काळे गोरे- उडीद पिकाची माहिती

‘उडदामाजी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे?’ हे मराठी व्यंकटेश स्तोत्रातील प्रसिद्ध उद्धृत आहे. याचा अर्थ होतो, माणूस म्हणलं की त्यात बरे वाईट दोन्ही प्रकारचे गुण असतातच. माणूस म्हणून फक्त सदगुणांचा पुतळाच असतो असं नाही, पण म्हणूनच माणसाने आपल्यातले वाईट, नकारात्मक गोष्टी, वाईट सवयी दूर करण्याचा प्रयत्न करावा आणि चांगल्या गुणांची, चांगल्या स्वभावाची जोपासना करावी. या उद्धृतात उडदाची व्याख्या अगदी चपखल बसते. कारण उडीद हा काळाही असतो, आणि पांढराही. काळा अख्खा सालासह असलेला उडीद जास्त करून पंजाबी पद्धतीच्या जेवणात दाल माखनीसाठी वापरला जातो, तर पांढरा साल काढलेला उडीद – ज्याला गोटा उडीद असंही म्हणतात, दाक्षिणात्य पदार्थात उदा. इडली, दोसा यांच्यासाठी तांदळासोबत वापरला जातो, त्याने पदार्थ जास्त हलके होतात. आपण उडीद डाळ जास्त वापरतो, उडदाच्या सालासकटच्या डाळीचं उडदाचं घुटं हा सातारा स्पेशल झणझणीत पदार्थ बनवला जातो. बाकी उडीद डाळीचे पापड,  मिश्र डाळींचे वरण, चटणीपुडीत भाजून इतर डाळींसह अश्या वेगवेगळ्या प्रकारे उडीद आपल्या आहारात असतो. उडीद (अख्खे अथवा डाळ) हा शाकाहारींसाठी, प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे.

चला तर मग उडीद या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कडधान्य पिकाविषयी माहिती जाणून घेऊया.

खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या तूर पिकाच्या खालोखाल उडीद हे एक महत्वाचे कडधान्य पीक आहे. उडीद हे पीक रब्बी हंगामातही घेतले जाते. मात्र खरीप हंगामापेक्षा रब्बी हंगामातील उडीद पिकास उत्त्पन्न कमी मिळते. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांचा ओढा खरीप हंगामातच उडीद पीक घेण्याकडे असतो. राज्यात खरीप हंगामात दरवर्षी सुमारे 8 लाख हेक्टर क्षेत्रावर उडीदाचे उत्पन्न घेतले जाते. रब्बी हंगामात अतिशय अल्प प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. अहमदनगर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद , जळगाव, अहमदनगर, नाशिक, सांगली, पुणे यासह विदर्भातील काही जिल्ह्यातही खरीप हंगामात उडदाचे उत्पादन होते. उडीद हे पीक मिश्र पीक पद्धतीसाठी उत्तम पीक मानले जाते. साधारणपणे 75 ते 80 दिवसांमध्ये पीक काढणीस येते. अल्प प्रमाणात पाऊस झाला तरी त्याचे जोरावर चांगले उत्पन्न घेता येते.

प्रामुख्याने उडीद पिकासाठी मध्यम ते भारी, चांगल्या निचऱ्याची जमीन आवश्यक असते. चोपण, पाणथळ किंवा क्षारयुक्त जमिनीत उडीद चांगल्या प्रकारे येत नाही. मान्सूनचा पहिल्या पावसाच्या सरी कोसळल्यावर वाफसा बघून पेरणी केली जाते. थोडक्यात सर्वसाधारणपणे जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यातच पेरणी पूर्ण करावी लागते. अन्यथा उत्पन्नात घट होते. रब्बी हंगामात उडीदाचे पीक घ्यायचे झाल्यास साधारणपणे कडक थंडी ओसरल्यावर जानेवारीच्या दुसऱ्या पंधवरड्याच्या शेवटापर्यंत पेरणी वा टोकणी केली जाते.

आंतरपीक म्हणून टोकणी करावयाचे झाल्यास सर्वसाधारणपणे 7 x 15 सेमी अंतर राखतात. पिकाचे रोप अवस्थेत बुरशीजन्य रोग आणि किडींपासून संरक्षण होण्यासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया केली जाते. बीजप्रक्रिया केल्याने पिकाचे रोगांपासून संरक्षण होऊन पिकाची चांगली वाढ होते. शिवाय पिकाच्या मुळावरील नत्राच्या गाठी वाढून शेतात नत्राची नैसर्गिक उपलब्धता वाढते. उडीद आंतरपीक म्हणूनच जास्त प्रमाणात केला जातो. अल्प पावसाच्या क्षेत्रात आडसाली ऊसाच्या लागणीतही आंतरपीक घेतले जाते. उडीद पीकासाठी प्रामुख्याने बी.डी.यु-1, टि.ए.यु-1, टि.पी.यु-4, टि.ए.यु-1 हे वाण वापरले जातात. उडीद हे खरीप हंगामाचे पीक असल्याने त्याच्या रुजण्यासाठी व वाढीसाठी पावसाळ्याची हवा मानवते. खरीप हंगामातील पीक असल्याने पावसावर वाढते. पावसाने ओढ दिल्यास फुले येताना व शेंगा भरण्याच्या सुमाराच्या अवस्थेत पाऊस नसेल तर पाणी द्यावे लागते.

उडीद शेंगा स्वरूपात आणि कडधान्य स्वरूपात

उडीद पिकावर काळा मावा व रसशोषक अळ्यांचा प्रादुर्भाव जात प्रमाणात होऊ नये याची काळजी घ्यावी लागते.  पीक सरासरी 70 ते 75 दिवसांत काढणीसाठी येते. काही वाण 60 ते 75 दिवसांत निघतात. उडीदाच्या शेंगा असतात. सहसा त्याची तोडणी करावी लागत नाही. पीक कापून गोळा करुन त्याची मळणी केली जाते. यानंतर निघालेल्या उडीद धान्यास 4-5 विळा कडक ऊन देणे आवश्यक असते. उडीद साठवण करताना त्यामध्ये कडुलिंबाचा पाला घालतात. बियाण्यासाठी निवडलेल्या उडीद धान्यास चाळून स्वच्छ व बारीक केलेल्या राखेत घालून ठेवायची पारंपरिक पध्दत आहे. हल्ली या पध्दतीचा वापर फारसा होत नाही. त्यामुळे साठवणीत कीड लागत नाही. पुढे याच धान्यावर प्रक्रया करुन उडीद डाळ तयार केली जाते.

लेखन: तुषार गायकवाड

 

संदर्भ – सदरची माहिती महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2020-21, माहिती पुस्तिका – लागवड व तंत्रज्ञान यांनी दिलेल्या माहितीतून तसेच लेखकाच्या स्वानुभवातून तयार केली आहे.

Leave a Reply