उत्तम शेती – शेतीत ’राम’ आहे!

शोध सीताफळांच्या नव्या जातींचा -एकरी पाच लाख रुपयांचे उत्पन्न 

बार्शी तालुक्यातलं गोरमाळे गाव. नवनाथ मल्हारी कसपटे यांची गोरमाळेत पडीक जमीन. चाकोरीबध्द पारंपारिक शेतीतून हाती काहीच लागत नव्हते. दमछाक झालेले कसपटे नव्या शेतीच्या प्रयत्नात होते. त्यांना वेगळ्या आकाराच्या सीताफळांनी भुरळ घातली. नवनाथरावांनी या सीताफळाला वाढवले. त्यानंतर त्याच्यापासून काही नवीन जाती विकसित करण्यास सुरुवात केली. बांधावर, विहीरीच्या काठावर, नदी-ओढ्याच्या किनारी आढळणारे, शेतकऱ्यांकडून कायम दुर्लक्षित असलेले सीताफळ आज काळ्याभोर रानात डौलाने उभे आहे. गेल्या १० वर्षात संशोधन करून त्यांनी सीताफळाच्या ४ जाती विकसित केल्या आहेत. तर ३२ जातींचं संकलन त्यांच्याकडे आहे. यापैकी बहुतांश जातीची सीताफळे परदेशात पोचली आहेत.

विकसित केलेल्या जातीमुळे उत्पादकता वाढली. आणि सीताफळांचा आकारही मोठा, चवीला मिठासदार आणि अधिक गर असल्याचे लक्षात आले. यशस्वी जातींना नवनाथरावांनी स्वत:च्याच नावाची एनएमके-१ पासून एनएमके-३ अशी ओळख दिली. चौथ्या जातीचे नाव फिंगर प्रिंट. कारण हे दिसते बोटांच्या ठशासारखे. प्रत्येक जातीची वेगळी वैशिष्ट्ये. काहींना अधिक गर तर काहींचा रंग आतून गुलाबी. काही रानटी सीताफळांचा हंगाम संपल्यानंतर येतात. काहींचे वजन प्रत्येकी चक्क दीड ते अडीच किलो. प्रयत्नाची पराकाष्ठा, जिज्ञासू वृत्ती आणि सीताफळाला मिळवून दिलेली स्वतंत्र बाजारपेठ यामुळे नवनाथ कसपटे आज अखिल भारतीय सीताफळ महासंघाचे अध्यक्ष बनले आहेत. 
सध्या कसपटे यांच्या शेतात २५ एकरवर सीताफळांची बाग असून, ५ ते ७ एकरवर सीताफळांची रोपवाटिका आहे. वर्षभर आधीच रोपांची आगाऊ नोंदणी झालेली असते. शेकडो कामगार शेतात काम करतात. अत्यल्प पाण्यावर, खडकाळ-माळरानावर फुलणारे सीताफळ कुठल्याही किडीला बळी पडत नाही. शेतीत ‘राम’ नाही म्हणणाऱ्यांनी कसपटे यांच्या सीताफळ शेतीचे निरीक्षण करायला हवे.


काही मिठास जातींना मुंबई-पुण्यात मोठी मागणी आहे. या सीताफळातून ७ ते १० टन उत्पादन मिळते. सीताफळ विक्रीतून एकरी ५ लाख रुपयांपर्यंत, तर २५ एकरात १ कोटी १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे ते सांगतात.
गोरमाळे येथे सिताफळाच्या संशोधनासाठी छोटी पण अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारली आहे. त्यांच्या मधुबन नर्सरीमध्ये जागतिक पातळीवरील ३२ प्रकारचे सीताफळ वाण उपलब्ध असून पैकी २१ प्रकारांवर प्रयोग सुरू आहेत. त्यांच्या एनएमके-१ तथा गोल्डन वाणाला चांगली चव, टिकवण क्षमता, कमी बिया, देखणेपणा, आकार आणि मिळणारी किंमत चांगली असल्याने या रोपांना चांगली मागणी आहे. या सिताफळाची मुंबई, पुणे, दिल्ली आणि कुवेतमधील बाजारात चांगल्या दरात विक्री होत आहे. कसपटे यांच्या ‘एनएमके वाणांचं संशोधन’ यावर पंजाब विद्यापिठातील योगेश गुप्ता यांनी पीएचडी मिळविली आहे. विकसित केलेल्या सीताफळांच्या पेटंटसाठीही आता त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
नवनाथ कसपटे यांचा संपर्क क्र. 9822669727

– चंद्रसेन देशमुख, उस्मानाबाद