एका वाढदिवसाची गोष्ट

 

”आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतोय, पण सध्या लोकांना आमच्याविषयी आदर वाटण्यापेक्षा भीती वाटते, त्यामुळे खूप वाईट वाटतं. आजच्या सत्कारानं मात्र खूप धीर मिळाला.”आनंद आणि खंत अशा संमिश्र भावना शाहीन बानो यांनी व्यक्त केल्या.
शाहीन अमडापूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत काम करणाऱ्या कोरोना योद्धा. गावकऱ्यांच्या उपस्थितीत शाहीन यांचा सत्कार झाला. निमित्त होतं, बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या वाढदिवसाचं. श्वेताताईंचा वाढदिवस कार्यकर्ते, त्यांचा मित्रपरिवार नेहमीच उत्साहात साजरा करतात. यंदाही २७ मार्चला त्यांच्या वाढदिवसाचं नियोजन सुरू होतं. श्वेताताईंनी मात्र वेगळा विचार मांडला, कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्याचा.


”गेल्या वर्षभरात कोरोना योद्ध्यांनी आपलं घरदार,नातेवाईक, स्वतःच्या अडचणींपेक्षा आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलं आहे. आपला जीव पणाला लावून अहोरात्र सेवा दिली आहे. कठीण काळात लोकांची मानसिकता ढळत आहे. या परिस्थितीत कोरोना योद्ध्यांचं मनोबल जपणं महत्त्वाचं आहे. त्यांच्या योगदानाचं महत्त्व लोकांवर अधिक चांगल्या प्रकारे ठसणे, आवश्यक आहे.” श्वेताताई सांगतात. या विचारातून त्यांनी आपला यंदाचा वाढदिवस कोरोना योद्ध्यांना समर्पित केला. आपल्याला पुष्पहार, गुच्छ देण्याऐवजी आपल्या प्रभाग, परिसरातल्या, गावातल्या कोरोना सत्कार करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. त्यांचा सत्कार याच आपल्या शुभेच्छा असल्याचं सांगितलं.


या आवाहनाला प्रतिसाद देत चिखली विधानसभा मतदारसंधातील ३१२ बुथवर कोरोनायोध्दांचा सत्कार झाला. यात चिखली येथील उपजिल्हा रुग्णालय, एकलारा , उंद्री , अमडापूर, अंगडापूर, किन्होळा, चांडोळ,रायपूर इथली प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय धाड, अशा विविध ठिकाणच्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार झाला. मासरळ संवेलमध्ये पदाधिकारी सुनील देशमुख यांनी सुमारे ९५ आशासेविका आणि आरोग्यसेविकांना साडी देऊन सत्कार केला.
”कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी सर्वांनी नियम पाळायला पाहिजे. नियम पायदळी तुझबून कुणालाही लाभ होणार नाही उलट अडचणी वाढतीलच.” असं कळकळीचं आवाहन आमदार श्वेता महाले पाटील यांनी केलं आहे.

-दिनेश मुडे, ता. चिखली जि. बुलडाणा

Leave a Reply

Discover more from Navi Umed

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading