“एक गाव एक स्वच्छ-सुंदर स्मशानभूमी” चळवळ

 

परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातलं आसेगाव. इथल्या वैकुंठधामात कार्यक्रम सुरू होता. प्रमुख उपस्थिती चळवळीचे प्रणेते कृषिभूषण कांतराव काका देशमुख यांची. भीमराव पवार यांचा सेवानिवृत्तीचा दिवस. यानिमित्त ३१ जुलैला स्वखर्चाने आणि लोकसहभागातून आई जानकाबाई पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी दीड हजारावर रोपे लावून घनवनाची लागवड केली.


धड रस्ता नाही, अंत्यविधीच्या जागेवरून वाद, वेगवेगळ्या जातीपातींच्या समस्या, शोकाकुल नातलगांना बसायला धड जागा नाही, अस्वच्छता अशी अनेक गावातल्या स्मशानभूमीची विदारक अवस्था. पण परभणी जिल्ह्यातल्या स्मशानभूमींची स्थिती मात्र बदलू लागली आहे. कांतराव काका देशमुखांमुळे.
कांतराव प्रयोगशील शेतकरी. सलग २५ वर्षांपेक्षा अधिक काळ झरीचे सरपंच. त्यांच्या दिलदार व्यक्तिमत्वामुळे जिल्ह्यात त्यांना मोठा मान आहे.


२०१४ च्या सुमाराची गोष्ट आहे. झरीसारख्या १७ हजार लोकसंख्येच्या गावात स्मशानभूमीची सोय नव्हती. कांतरावांनी परभणी – जिंतूर रस्त्यावर दुधना नदीच्या काठावर झरी शिवारात स्वतःची जमीन स्मशानभूमीसाठी दिली. तिथे अंत्यसंस्कारासाठी दोन शेड उभारल्या. ग्रामस्थांना बसण्यासाठी सिमेंटची आसनव्यवस्था केली. स्मशानभूमीस संरक्षक भिंत बांधून आत मोठ्या प्रमाणावर झाडे लावली. स्मशानभूमीस सुंदर बागेचे स्वरूप आले आहे. पाणी वाचवा, बेटी बचाव, अंधश्रद्धा निर्मूलन, आईवडिलांची सेवा, असे संदेश आतल्या भितींवर आहेत. आई इंदिराबाई देशमुख यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या या स्मशानभूमीचा पॅटर्न अन्य गावांमध्येही राबवावा, असं कांतरावांना वाटलं. त्यातूनच गेल्या पाच वर्षांपासून चळवळ सुरू आहे.
तालुक्यातील जांब, पारवा, नृसिंह पोखर्णीपाठोपाठ पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे अशा अनेक गावांमध्ये स्वच्छ सुंदर स्मशानभूमी दिसते. जिल्ह्यात जवळपास 50 गावांमधून ही चळवळ यशस्वीरित्या मूर्त स्वरूप घेत असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
चळवळीअंतर्गत गेल्याच महिन्यात “एक गाव स्वच्छ-सुंदर स्मशानभूमी” स्पर्धा जाहीर झाली आहे. एक लाख रुपयांचं बक्षीस. जिल्ह्यातली अनेक गावं या चळवळीत सहभागी होत आहेत.

-बाळासाहेब काळे, परभणी

1 thought on ““एक गाव एक स्वच्छ-सुंदर स्मशानभूमी” चळवळ

  1. कांतराव काका व बाळासाहेब काळे, आपणा दोघांनाही नम्र विनंती कि, आपल्या उपरोक्त उल्लेखाप्रमाणे 2014 ला झरी येथील स्मशानभूमीला काकांनी जमीन दान देवून दोन शेड बांधले असा उल्लेख केलात परंतु खरी बाब अशी नसून 2002 मध्मे कांतराव काकांच्या पत्नी नामे सौ. गंगाताई कांतराव देशमुख ह्या परभणी जिल्हा परिषदेच्या शिवसेनेकडून शिक्षण व बांधकाम सभापती होत्या त्यावेळी 2002 ला कांतराव काकांनी एक एकर जमीन शासनाला दान देवून त्यावर जिप परभणी बांधकाम विभागाचा सहा लाख रूपये निधी घेवून सदर स्मशान भूमिचे बांधकाम केले असे स्वतः कांतराव काकाच वृत्तपत्राला मुलाखत देताना सांगतात. ते कात्रण मी जपून ठेवलेले आहेत आणि ती मुलाखत पत्रकार तथा जिल्हा प्रतीनिधी प्रविन देशपांडे यानी प्रकाशित केलेली आहे. हे जर चूक असेल तर कांतराव काकांनी माझ्यावर ह्या बाबतीत गुन्हा दाखल करावा मात्र कुणीही जनतेची दिशाभूल करू नये हीच नम्र विनंती.

Leave a Reply