एक मित्र, एक झाड; डोंगर झाला हिरवागार

“पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया” आबालवृद्धांच्या ओठांवर असणारं हे गाणं. कुठल्याही गावाला जाताना, मागे पडणारी झाडं पाहण्याचा मोह लहानांनाच काय, मोठ्यांनाही आवरत नाही. ती हिरवाई डोळ्यांना सुख देते. पण जेंव्हा नवनवीन रस्ते बांधले जातात, तेंव्हा सर्वात पहिला बळी जातो तो याच झाडांचाच. आणि जी झाडं बघत आपण लहानाचे मोठे झालोयत, ती माळरानं एका रात्रीत ओकीबोकी होऊन जातात.

असंच आमच्याकडे जिंतूर ते परभणी रस्त्याचं काम सुरू झालं,  रस्ता रूंदीकरणात आजूबाजूची झाडं तोडण्यात आली, आणि हे भकास रस्ते डोळ्यात खुपायला लागले. त्यातून तरूणांच्या चर्चा रंगायला लागल्या, विकास तर हवाच आहे, पण त्यासाठी निसर्गाची कत्तल करणं खरंच गरजेचं आहे का? हा लंगडा विकास काय कामाचा? आपण या तोडलेल्या झाडांची काही भरपाई करू शकतो का?  यातूनच एक संकल्पना पुढे आली ती झाडांसाठी एक फाऊंडेशन उभं करण्याची. परभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या वेगवेगळ्या महाविद्यालातील तरूणांनी पुढे येऊन 28 एप्रिल 2019 रोजी एका अनौपचारिक गटाची स्थापना केली, त्याचं नाव ‘झाड फाउंडेशन’.

झाड फाऊंडेशन, जिंतूर, परभणी

रस्त्याकडेची झाडं कापली गेली तरी, कुठंही का होईना पण झाडं वाढली पाहिजेत, या उद्देशानं निर्माण झालेल्या या गटानं जिंतूर- परभणी रस्त्यावर असलेल्या मैनपुरी डोंगराच्या, वाटेच्या दुतर्फा झाडं लावायला सुरूवात केली. सुरूवातीला फक्त 8 – 9 तरूण काम करायला लागले. या काम करणाऱ्यांमध्ये कल्याण आणि आश्विन सोनवणे हे दोघं भाऊ, गजानन घनवटे, तेजस कडे, गजानन वाघमारे- खैरीकर, अनिकेत कानडे, रोहित जोशी, राहुल जोगवाडकर ही मित्रमंडळी होती. पण प्रत्येक चांगल्या कामात येतो तसा, झाडं लावण्याच्या या कामात अडथळा आलाच. काही लोकांनी झाड फाऊंडेशनच्या मैनपुरी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यावर आक्षेप घेतला.

आली का पंचाईत? मग ही तरुण पोरं गेली चांगल्या कामांना पाठिंबा देणाऱ्या, मुलांना प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या सरांकडे. ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे प्राचार्य श्रीधर भोंबे यांनी तरूणांचे नियोजन ऐकून घेतलं आणि मदतीचं आश्वासन दिलं. मग सरांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू झालं. त्यांच्याच मार्गदर्शनात तहसीलदारांशी बोलून मैनपुरी डोंगरावरचा महसूल विभागाचा एक हेक्टरचा परिसर फक्त झाडे लावण्यासाठी झाड फाऊंडेशनने मागून घेतला. नागरिकांना श्रमदान आणि आर्थिक योगदानासाठी विनंती केली. या चांगल्या कामाला मग अनेकांनी हात पुढे केले, खिसे रिकामे केले. बघता बघता हजार झाडे लागली आणि जवळपास अडीच लाख रूपये जमा झाले. आंबा, लिंब, खैर, जांभूळ, वड, पिंपळ, सीताफळ, बांबू, औदुंबर, बहावा, यासारख्या देशी झाडांची मुख्यत: लागवड करण्यात आली.

लहान मुलांच्या हस्ते वृक्षारोपण

झाडं रूजली पण ती जगली तर पाहिजेतच. मग जमा झालेल्या निधीमधून सर्वप्रथम सर्व झाडांना ताराचे कुंपण करण्यात आलं. मग एक पाच हजार लिटरची पाण्याची टाकी आणून, त्यासाठी सहा– सात फूट उंचीचा लोखंडी मनोरा उभारला. पाईपलाईन करून प्रत्येक झाडाला ठिबक सिंचनाची सोय करण्यात आली. यात एकूण तीन लाख रूपये खर्च आला.

आता दर रविवारी फाऊंडेशनचे सदस्य येऊन इथे श्रमदान करतात. आजपर्यंत जवळपास चारशेहून अधिक लोकांनी इथे श्रमदान केले असून आजी- माजी आमदार, विविध पक्षाचे पदाधिकारी, शासकीय, प्रशासकीय अधिकारी, अनेकांनी इथं येऊन श्रमदान केलंय. फाऊंडेशनचे सदस्य आता त्यांच्या कोणत्याही मित्राचा वाढदिवस हा याच ठिकाणी आणि वृक्षराजीला हातभार लावूनच साजरा करतात. म्हणजे प्रत्येक वाढदिवसाला एक झाड लावून त्या दिवशी सर्वांनी श्रमदान करायचं, वाढदिवसाला काही खर्च करायचा असेल तर तो इतर कोणत्या वस्तूंवर खर्च करण्यापेक्षा झाडांसाठी आणि या वनराईच्या आवश्यक गोष्टींसाठी खर्च करायचा. तालुक्यात कुठेही पर्यावरण संवर्धन- संरक्षणाशी निगडित काहीही काम असलं तरी फाऊंडेशनचे सदस्य हिरिरीने पुढाकार घेतात.

लहान- थोर एकत्र येऊन झाडांची काळजी घेतात

अगदी कोविड साथ आणि लॉकडाऊनच्या अवघड काळातही प्रसंगी टँकर लावून, तरूणांनी ही झाडं जगवली आहेत. म्हणूनच आज मैनपुरीचा डोंगर आणि महादेवाचं मंदिर या वनराईनं अधिकच साजरं दिसतंय.

गणेश डुकरे, जिंतूर, परभणी

Leave a Reply