नाशिकमधील मनीष राणा (नाव बदलले आहे) आणि शिल्पा राणा (नाव बदलले आहे) यांची ही गोष्ट. मनीष यांची पहिली पत्नी गरोदर असताना दोघंही एड्स पॉझिटिव्ह असल्याचं कळलं. मेहुणीच्या साखरपुड्यासाठी विजया नागपूरला गेल्या होत्या. तिथं शिवणकाम केल्यामुळे पोटावर ताण येऊन त्यांना रक्तस्त्राव सुरू झाला. लगेचच त्यांना दवाखान्यात दाखल केलं गेलं. रक्ताची चाचणी केल्यानंतर एड्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याने विजया यांच्या जवळही कुणी फिरकेना. मनीष जळगावहून नागपूरला पोहोचेपर्यंत वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने विजया यांचा मृत्यू झाला. बाळाला आजी आजोबांकडे ठेऊन मनीष जळगावला परतले. गेल्या चार महिन्यांपासून त्यांनी एड्सबद्दल घरी सांगितलं नव्हतं. पण, मोठ्या बहिणीला सत्य कळलं. लहान भावंडांची लग्ने व्हायची असल्याने तिने मनीष यांना नाशिकला स्थायिक व्हायला सांगितलं. त्याच दरम्यान विषबाधा होऊन मनीष यांचं बाळ मृत्युमुखी पडलं. पत्नी, बाळाचा अकाली मृत्यू, स्वत:चा एड्सचा त्रास सहन करत मनीष नाशिकमध्ये जगत होते. सकाळी ९.३० ते ६ वाजेपर्यंत ते कामात मग्न असायचे. मार्केटिंगची नोकरी असल्याने लोकांशी बोलणं व्हायचं, त्यातून दिवस कसातरी सरायचा पण घरी पोहोचल्यावर दुसरा दिवस उजाडेपर्यंत त्यांना रात्र खायला उठायची. सतत विचार, निराशेने त्यांना घेरून टाकलं होतं. अशात रेडीओची गाणी थोडा दिलासा द्यायची. असे सहा महिने गेले. २०११ मध्ये मनीष यांनी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यायला सुरवात केली. तिथं ‘महिंद्रा आणि महिंद्रा’कंपनीच्या यश फौंडेशनची माहिती मिळाली. यश फौंडेशनच्या रवींद्र पाटील, संगीता मॅडम, जया मॅडम, ज्योती मॅडम, जिल्हा रुग्णालयातले डॉक्टर, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधल्यामुळे, मेळाव्यांना हजेरी लावल्यानंतर एड्ससह जगणारे आपण एकटे नसून अनेकजण आहेत हे प्रत्यक्षात जवळून पाहता आलं. तब्येत थोडी बरी झाल्यावर पुनर्विवाहाचा विचार सुरू झाला.तेव्हा मनीष यांना जिल्हा रुग्णालयातून मधून शिल्पाबद्दल समजलं. शिल्पादेखील एड्स बाधित असून पती निधनानंतर एकट्याच आहेत असं समजलं. शिल्पा यांना भेटल्यावर, बोलल्यावर त्यांनी विवाह निश्चित केला.
२०१२ साली लग्न झालं. कोर्टात विवाह नोंदणीही केली. मोजक्या सामानासह दोघांचा संसार सुरु झाला. शिल्पा यांना मूल हवं होतं तर मनीष हे ‘जिथं आपलंच भविष्य अधांतरी आहे तिथं बाळ कसं जन्माला घालायचं?’ असा व्यवहारी विचार करत होते. काही महिन्यानंतर शिल्पा यांच्या आग्रहामुळे मनीष शहरातील चांगल्या स्त्रीरोग तज्ञांकडे गेले. दोघांच्या तपासण्या झाल्या आणि शिल्पा यांच्या गर्भनलिकेत दोष असल्याचं कळलं. तरीही शिल्पा बाळासाठी आग्रही होत्या. त्यामुळे काही महिन्यानंतर दत्तकासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला. तिथंही पदरी निराशा आली. काही दिवसांनी अचानक शिल्पा गर्भवती असल्याचं तपासणीतून समजलं. आठव्या महिन्यात शिल्पा यांच्याकडून थोडेसे वजन उचलले गेल्याने पोटावर दाब येऊन रक्तस्त्राव सुरु झाला. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर थोड्या वेळाने डॉक्टरांनी दोघांपैकी एकालाच वाचवता येईल असं सांगितलं. पत्नीला वाचवा अशी विनंती मनीष यांनी केली. पत्नी बरोबर मुलगीही वाचली. तो दिवस होता ३० नोव्हेंबर २०१५. ती केवळ दीड किलो वजनाची असल्याने तिला पेटीत ठेवावं लागलं. ३ दिवसानंतर दोघीही सुखरूप घरी आल्या. विशेष म्हणजे मुलगी एड्स निगेटिव आहे. आज ही परी 6 वर्षाची असून मजेत आणि लाडाकोडात वाढते आहे.
नियमित गोळ्या, औषधं, आहार, व्यायाम, पथ्य यांची काळजी घेत असल्याने मनीष आणि शिल्पा यांची प्रकृती उत्तम आहे. करोनामुळे ठिकठिकाणी नोकर कपात केल्याने मनीष यांची नोकरी गेली. सध्या ते लहानमोठी कामे करत उदरनिर्वाह करत आहेत. लॉकडाऊनमध्ये तीन महिने यश फौंडेशनकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत मिळाल्याने ते कृतज्ञता व्यक्त करतात. आपल्या मुलीला चांगले शिक्षण देऊन मोठं करायचं हे त्यांचं स्वप्न आहे. आज दोघंही एड्स बाधितांच्या मेळाव्यात अभिमानाने आपली संघर्ष कहाणी सांगतात. सकारात्मक विचार ठेवून जगण्यासाठी इतरांना प्रेरित करतात.
– भाग्यश्री मुळे, नाशिक