”एरवी सहज करतो तसाच काही ज्येष्ठ नागरिकांना फोन केला. पण एरवीपेक्षा त्यांना हे खूप खास वाटलं. माझ्या नुसत्या फोननेच त्यांना खूप बरं वाटलं.” वृद्धांसाठी काम करणाऱ्या हेल्पेज इंडिया संस्थेचे महाराष्ट्र आणि गोवा संस्थेचे प्रमुख प्रकाश बोरगावकर सांगत होते.
”वृद्धांची विशेषतः एकट्यादुकट्या राहणाऱ्या वृद्धांशी बोलणं ही सध्या त्यांची प्रमुख गरज आहे.” बोरगावकर सर सांगत होते. ”त्यांचं मनोबल उंचावण्याबरोबरच त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी काय करता येईल, त्याचा विचार झाला पाहिजे. हेल्पेज इंडियाही त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. वेळ घालवण्यासाठी अनेक ज्येष्ठांनी वेगवेगळे मार्ग शोधले आहेत. त्यांच्याशी बोलल्यावर आपल्याही माहितीत भर पडते. जुने अल्बम बघणं, जुन्या डायऱ्या यात छान वेळ जात असल्याचं काही सांगतात.”
मुंबई आणि उरण परिसरात हेल्पेज इंडियानं ज्येष्ठ नागरिक, स्थलांतरित मजूर, वस्त्यांमध्ये, बेघर आणि तृतीयपंथीय अशा चार हजारांहून अधिक जणांना अन्न पुरवलं आहे. काही ठिकाणी धान्य आणि स्वच्छतेसाठी आवश्यक गोष्टी दिल्या आहेत. त्याचबरोबर सध्याच्या स्थितीत काय काळजी घ्यावी, कशी स्वच्छता राखावी याविषयीही जागृती केली जात आहे. हेल्पेज इंडिया देशाच्या विविध भागात काम करत आहे.